- *”चांदणफुले ” हा कविता संग्रह म्हणजे निखळ कैवल्यरुप,सौंदर्यतत्व स्वाती नक्षत्रातील तेजस्वी काव्य मोतीच होऊन रसिकांच्या मनाला भुरळ घालणा-या कवितांचा खजिना.”
वाय. के शेख म्हणजे पारदर्शी व्यक्तिमत्त्व, साहित्य, कविता,गझल,यात रमत शेतीमातीवर प्रेम करणारा भीमाकाठचा कवी.अर्थशास्त्राची पदवी घेवूनही शेती आणि किराणा दुकान चालवता चालवता साहित्याच्या इंद्रधनुसम रंग देणारा कवी,मितभाषी,साधे सरळ वागणे, राहिणीमानही तसेच,प्रेम ,वात्सल्याचा झरा अविरत जिभेवर पाझरत सहवासात सर्वांना क्षणात आपलेपणाच्या गंध कोशित जायबंदी करणारा कवी,साहित्यप्रेमाने ओतप्रोत भरलेला सरांचा परिवार अे.के. शेख,वाय.के.शेख,आय के शेख हे तीन भाऊ,गझलकार,सरांचा मुलगा समीर कवी व गझलकार,सरांची कराड मधील मुलगी डाॅ.सामिया शेख, कवयित्री , महाराष्ट्रातील पनवेल,पुणे,पारगाव,कराड अशा चतुरस्त्र सीमा पार करीत गझल, पंचाक्षरी, षडाक्षरी,अष्टाक्षरी,लावणी,अभंग,हायको, मुक्तछंद, गीत यांच्या अमृतकुंडातील काव्यमध सर्वत्र वाटणारे कौठुंबीक सदस्य म्हणजे वाय के शेख, गुरुमहिमा, आई, गाव, शिवार, लेक., शेतकरी, संसार, झोपडी,घर,बंगला,गाव ते शहर, माय मराठी, मुंबई, सरकार,बळीराजा,वाट,निवडणूक बालपण, हरवलेले क्षण,वर्तमान काळातील स्थिती,राजकिय आक्रमणतेच्या प्रवृत्तीचा उपहास,ग्रामीण व शहरी स्त्रीयांच्या वाट्याला येणारे दुःख ,दैनदिन जीवनातील सर्वत्र दिसणारी शोषिकता व त्यातून जगण्यातील अस्वस्थता अशा अनेक जाणीवांचा पट कवितेत शेख सर विणत जातात. समकाळातील स्पंदनांना सहज सोप्या समर्पक शब्दात काव्य गुंफता गुंफता मानवी जगण्यातील नाळ जोडणारी कविताच या संग्रहात भेटते, कवितेला मानवी मूल्याची झालर असलेने वाचकास ती आपली कविता वाटते अन् वाचता वाचता तो कविता गुणगुणत क्षणभर आपले दुःख क्लेश,नैराश्य, एकाकीपणाचा विसर पडतो अन् आपणही कोणासाठी तरी जगलं पाहिजे ही भावना जाग्रत होऊन कवितेच्या रसस्वादानी ह्दयात उल्हास भरतो.
या अल्लाह, परमपित्याला अंहकार. ,संसार,भवरोग,भ्रमाचे भुवन,हूर हूर ,वादळ काहूर अशा स्थितीयही मनोमन प्रार्थना करुन
- “दाव पूल तीर , थकले रे तन
- चालून चालून, या अल्लाह”
अशा शब्दात विधात्याला जीवनाचे दान मागत,आपला संसार सुखी समाधानी व्हावा कारण संसार म्हणजे दोन दिलाचा बेपार,आपल्या घड्याचा आकार, बैलगाडीचे चकार,सरीतेची धार,तळपती तलवार,मनाचा करार असे म्हणून,
- “अरे संसार संसार
- मन मनाचा करार
- येते संसार सांधता
- रडू थोडे हसू फार”
असे जीवनाचे सूत्र वाचतांना बहिणाबाईची आठवण होते. घाव सोसीत छन्नीचे स्वतःला मढवुन, घडवून,मोती होण्यासाठी जळात बुडवून ,मातीमध्ये रुजवून,पावसात भिजवून घेत पुण्यकर्मात स्वतःला हरवून घेण्यास कवी सांगतात.कारण भारतीय संस्कृतीचे चित्र त्यांना वेगळेच दिसते. वास्तव किती भयानक आहे ते वाचतांना क्षणभर आपणही नि:शब्द होतो.तरीही जीवन अनमोल आहे कारण प्रेमाचा धागा तुटला तर बाकी शून्यच राहते.असा अनमोल संदेश कवी देतो.मात्र कामगाराची व्यथा मांडतांना,
- “शाळा नाही पाटी नाही
- मी जीवन गाणे गातो
- दोन “खाडे “होता,मालक
- चार मांडत जातो.”
- हे भयानक वास्तवही समोर मांडतात.सामान्य माणसाच्या अपेक्षा जास्त नसतात हेही कवीच्या नजरेतून सुटत नाही.
- “सायकलीवरून वाड्यावस्त्या
- ऊनवा-यात फिरत असतो
- हुलगं, मटकी देता थोडी
- गोड मनाने गाली हसतो”
असा हा पाच वेळा नमाज पढणारा अल्लाहचा बंदा.छान व्यक्तीचित्रण रेखाटतात.शेतकऱ्यांची पोर हरिणीसारखी शेतात फिरते तिच्या हाती विळा आहे धामिणसारखी बांधावर फिरते. कवितेतील निसर्गसौंदर्य व त्यातील भाव, निडरता,चपळता,निरागसता,कष्टातील आनंद हे भावसौदर्श स्त्रीच्या सृजनशील अस्तित्वाला मोठे स्थान देत शब्दचित्र उभी करणारी कविता,मार्मिक, प्रत्ययकारी,मुक्त,कायम प्रभाव टिकवून ठेवण्यात कवी यशस्वी होतात हाच कवितेचा “आत्मा”असून तो जिवंत व सजीव वाटतो. “बेसण “कवितेतला अनुभव आपणापैकी प्रत्येकाला आला असणारच दुस-याचे दु:ख दूर करण्याच्या प्रयत्नात बेसणामुळे स्वप्नातील रंगाचे बेरंग होतात. हे वाचतांना नकळत हसू आल्याशिवाय राहत नाही. बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दीन -दलितांचे अश्रू पुसत,अनाथाना कपडे ,पूराच्या वेळी धावून अनेकांचे प्राण वाचवतो,शाळेत मुलांना वही पेन, खाऊ देत पाण्याची बाटली वाटतो,वादळवा-यात पडझड झालेल्यांचे सांत्वन करतो, वृद्धाश्रमी भेट देतो,अंधासाठी चष्मे,लाल काठ्या देतो,रक्त, अवयव दान शिबिरे घेतात अशी अनेक जनसेवेची कामे फक्त बाबांच्या आत्मशांती कवी करत सामाजिक भाव, ऋण फेडण्याच्या कार्यामुळेच त्यांची कविता सामाजिक रुप घेऊनच येते म्हणून ती समाजभिमुख होते.हाच मुलमंत्र शेख सर जपतात म्हणून ते*” समाजाचे”* कवी कवी होतात.कधी पावसाच्या आठवणी सांगत,
- “प्रेम गीत गात राणी
- पर्णे झंकारीत आला
- मनोमनी चांदण्याचा
- धुंद झुलवीत झुला”
असं निसर्ग मनात भरवत भरवत बळीच्या पाचवीला दु:ख पुजलेले अाहे, पेरलेली बीयाने आसवात भिजतात,बहरलेल्या पिकावर टोळ धाड पडते,मुखातला घास पावसात भिजतो,पूरात सर्वस्व जाते कवी हे सारे पाहून व्यथित होतो,
- “कधी भणंग वारा तू
- सुसाटसा का आणितो
- मळ्यातील पिक सारे
- जमिनीस मिसळतो”
असा विधात्याला सवाल करतो.पूरात वाहत जाणारा तान्हा मात्र पाळण्यात हसत खेळत राहतो. विधाता काय करील सांगता येत नाही हेच खरे.म्हणूनच पाण्याची किमया वर्णन करतात आकाशाकडे जातांना “वाफ”,खाली येतांना “पाणी”,सागरात” खारे”,नदीत “गोड”,गवतावर” दव”, हवेत “धुके”,गोठतांना “बर्फ”,हवेत उडता “तुषार”,खडकात” पाझर”,वाहता “झरा,ओहळ,नाला,नदी”,साचता “डबके”,कड्यावरुन येता ‘धबधबा”,पत्र्यावेवरुन “धार’,डोळ्यात “अश्रू “,श्रमातून” घाम”,पानात “अर्क”,शिंपल्यात मोती,कारल्यात कडू,नारळात “गोड”,स्तनातून “दूध”,सर्पाच्या तोंडात “विष” अन् संताच्या थोडी “अमृत” अशा अनेज रुपात पाण्याचे कवी दर्शन घेतात .पावसाला कवी म्हणतात,
- “विषमतेची आग विझू दे पण
- समतेची ज्योत जळू दे “
- असाही भाव प्रकट करत काजळ रात्रीचे वर्णन अप्रतिम करतात पहा ना!,
- “सागराच्या दारी त्याची
- होती पेन्सिल नि पाटी
- शाळेला सुट्टी म्हणुनी
- निजला अवसेच्या ओटी”
म्हणत जीवन जगण्याची मज्जा सांगतात,थंडीत कुडकुडणे,सर्दीने बेजार होणे, काकडी,कलिगड, कैरीची चव,दही ताक,लिंबू लस्सी,कोकम,नीरा,ऊसाचा रस,द्राक्षे, फणस,जाभुंळ,फणस यांचा स्वाद घेत विहिरीत सुळकी घेत,तर कधी कोकिळेसवे वसंत आगमनाचं गीत गात,अनेक खेळात रमत दिवस कधी जातो ते कळत नाही मात्र रात्री गाढ झोपेच्या अधीन होत स्वप्नात रंगून जातानाचे वर्णन कवीच्या नजरेतून सुटत नाही.
- “नयनांच्या निरजनातील
- भिजून गेल्या वाती
- तुझे नाव घेत सखये
- विझून गेल्या राती “
असा सुर आळवत मधुगट जीवनी होतील भ्रमर दिवाणी होतात,कवी हसता दुःख पळून जाते, तो सखीला हास असा सल्ला देतो.वीर पत्नीचे मनोगत ह्दयास स्पर्शल्या शिवाय राहत नाही.ती म्हणते, “तुच भक्ती,शक्ती,सहारा,सौख्य, मोहर,रोमरोमी समाचार असतो,”
- “भारत “भू “चा पुत्र शूर,राबतो देश कारणा
- दिनरात जागतो ,सलाम तुझ्यअभिमाना
- भाग्य जपते जिवापाड रे,उदरात तुझ्या खुणा
- रोम रोमी शहारते तुझ्या प्रीतीत साजना “
अशा “चांदणफुलांनी नभ अंगण भरून येते अधिर मनाने सखीला भेटण्याचे क्षण मोजत राहतो.मात्र आईच्या विषयी असीम श्रद्धा कवीच्या मनात आहे,
- “जन्मो जन्मी मी रे देवा
- तिच्या पोटीच जन्मावे
- अन् आईसाठी माझ्या
- “पायपुसणी “रे व्हावे”
अशा आईच्या चरणांची धुळ कपाळी लावतांना कविचे मन भरून येते .आई सुखाचा सागर,अमृताची धार,सावली,वैभव,मायेचा पाऊस,दयेचा रस,समतेचं गाव,ममतेचं नाव,गुणांची खाण,फुलांचे बन,रुण झुण गाणं,नभाचे अंगण,शितल चांदणं,समईची ज्योत,जाग्रत दैवत,स्वर्गाचे द्वार,जगाचा उद्गार अशा अनेक रुपात आईला पाहत, ज्ञानज्योती फातिमा माईसही कवी याच भावनेने पाहतो,”सावित्रीच्या खंबीर साथीला” पुण्याची” पुण्याई. असे वर्णन करतात.आई समईची ज्योत कधी जळाली कळले नाही म्हणत,
- “काहिलीत तू बरसुन गेली कधी रातीला
- “आभाळमाया “ढाळीत होतीस कळले नाही “
अशी खंत व्यक्त करतात.जात्यावरच्या ओव्यांची आठवणीत कवी रमून जातो.माता पिताच पहिले गुरु,दुजे गुरु शिक्षक, तिसरा गुरु पारखून घ्यावा,जीव ओवाळुनी”कुरआन “जाणतो, निसर्ग गुरु, शेवटी सद्गुरू जीवनास मार्ग दाखवतात. एकंदरीत हा काव्य संग्रह चाचणीत असून यामध्ये भाषिक व व्याकरणदृष्ठ्या आणि यमकदृष्ठ्या अप्रतिम असून जुन्या जाणत्या कवींचा जास्त प्रभाव दिसून येत असला तरी कवी कोणाचे अनुकरण करत नाही.आपले विचार स्पष्टपणे मांडतात.ता संग्राहातील सर्वच कविता पावसाच्या थेंबासारखे आपले आगळेवेगळे अस्तित्वाचे वर्तुळ निर्माण करते .”*आई,सुखी संसार,ज्ञानज्योती फातिमा,गुरु महिमा, दसरा, माय मराठी, हरवले ते बालपण, शेजारी, हायकू, वेसण, मुंबई, बळी, पाण्याची किमया, बळीराजा, निवडणूक, भारत,सोळावे वरीस,कर्म मन ज्ञान, ताजमहाल,जनम जनन का साथ,टिपू सुलतांन,चांदणफुले “* या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत .या कविता संग्रहासाठी रोहिदास पोटे,माजी शिक्षण सहसंचालक म.रा.पुणे यांची प्रस्तावना अप्रतिम अशी लाभली आहे शिवाय कवी,गझलकार,अे.के शेख सरांचे रसपुर्ण असे मलपृष्ठावर मनोगत कविता संग्रहाचे मुलमंत्रचं सांगून जाते.
हा कविता संग्रह *”ज्यांच्या पंखाखाली गझला व कविता ऐकत मोठा झालो ते आदरणीय सुप्रसिद्ध ज्येष्ठ गझलकार, अे. के. शेख सर,व सौ. फरिदा वहिनी,व माझ्या रोशनी परिवारातील सर्व कुटुंबियांना विनम्रपणे समर्पित “* करुन आपले कुटुंबाप्रती प्रेम, ऋण, आस्था दाखवण्यात कवी यशस्वी होतात.नेहा महाजन,पुणे यांनी,महाजन पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशन करुन सर्व हक्क अस्लम युनुस शेख मुलगा यांच्या स्वाधीन केले आहे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी अप्रतिम असे काढून कविता संग्रहासाठी योग्य न्याय दिला अाहे. वाचक वर्ग व सारस्वत या कविता संग्रहाचे स्वागत करतीलच हाच आशावाद ठेऊन सरांच्या कविता संग्रहाचा *”आस्वाद “*घेण्याचे मी धाडस केले तेही सर मोठ्यादिलाने वाचतील व माझ्या प्रयत्नाचे स्वागत करतील हाच विश्वास मनात ठेवत सरांना पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा देतो.
- *”चांदणफुले”
- कवी : वाय के शेख
- प्रकाशक : नेहा महाजन
- महाजन पब्लिशिंग हाऊस,पुणे
- मुखपृष्ठ : संतोष घोंगडे
- स्वागतमुल्य :२०० रुपये
- मो.९८ ६० २९ ९४ ९१.
- …………………………………….
- *आस्वादक
- मुबारक उमराणी
- सांगली
- ९७६६०८१०९६.
…………………