विकलांगच्या कवना कोणी समजून घेईल काय?
आज आपण पाहतो की रस्त्यारस्त्यावर वा मंदीर परीसरात आपल्याला काही लोकं भीक मागतांना दिसतात. त्यात वयोवृद्ध व काही विकलांग लोकं असतात. विकलांग याचा अर्थ मतीमंद (वेडसर), आंधळे, अपंग(लंगडे), मुके, बहिरे. का त्यांचं विकलांग असणं हा शाप आहे काय? यावर लिहिलेला एक विशेष लेख.
विकलांग बाळ. विकलांग या गटात अनेक प्रकार मोडतात. ज्यांना बरोबर बोलता येत नाही. म्हणजेच ज्यांच्यात वाचा दोष आहे. ज्यांना बरोबर ऐकता येत नाही. म्हणजेच कर्णदोष आहे. ज्यांना बरोबर डोळ्यांना दिसत नाही. दृष्टिदोष आहेत. ज्यांना बरोबर चालता येत नाही. म्हणजेच जे अस्थीव्यंग आहेत. तसंच ज्यांची बरोबर बुद्धी विकसीत नाही. ते मतीमंद. मतीमंद असणं हा एक अभिशापच मानवी जीवनाला लागलेला आहे. मतीमंद बाळ होणं हा काय जन्म घेणा-या बाळाचा गुन्हा असतो काय किंवा विकलांग बाळ जन्माला येणं हा तरी त्या बाळाचा गुन्हा असतो काय? तर याचं उत्तर नाही असंच आहे. मतीमंद बाळ निपजणं हा बाळाचा गुन्हा नाही वा विकलांग बाळ जन्माला येणं हाही बाळाचा गुन्हा नाही.
मतीमंद बाळ याचा अर्थ असा की ते असे बाळ की ज्या बाळाचे सर्व अवयव हे सक्षम असतात. त्यांना बरोबर ऐकायला येतं. बरोबर पाहता येतं. मात्र बुद्धी तेवढी सक्षम नसते. असे बाळ. विकलांग या प्रकारात हे सर्व दोष मोडत असतात. तसंच हे दोष कोणत्याही व्यक्तीला असू नयेत. कारण असे दोष ज्या व्यक्तीमध्ये असतात. त्या लोकांवर त्यांचा मुळातच दोष नसतांनाही दोषारोपन केलं जातं. कोणी तर त्यांना मागील जन्माच्या पापाचा परिणाम मानतात. म्हणतात की मागील जन्मात पाप केलं असेल, म्हणून हा असला जन्म मिळाला.
हे सर्वच दोष वाईटच. हे दोष कोणात असू नयेत. परंतू त्याहीपेक्षा सर्वात वाईट दोष आहू मतीमंद असणं. कारण आंधळा, मुका, बहिरा, अस्थीव्यंग या सर्व प्रकारात सर्वच व्यक्तींचा मेंदू शाबूत असतो. त्यामुळं अशा व्यक्तीला घर परिवारानं कुठंही नेवून सोडून दिल्यास तो व्यक्ती परत आपल्या घरी येवू शकतो किंवा ज्यानं कोणं त्याला जिथं सोडून दिलं. त्याला तो पोलिसात तक्रार देवून धडा शिकवू शकतो. परंतू मतीमंद या प्रकारात त्या व्यक्तीचा मेंदूच शाबूत नसतो. त्यामुळं त्याला कोणीही कुठंही सोडून दिलं तर तो व्यक्ती ज्या व्यक्तीनं सोडून दिलं, त्याची पोलिसात तक्रार दाखल करून त्याला धडा शिकवू शकत नाही वा तो व्यक्ती परत आपल्या घरी येवू शकत नाही.
मतीमंद या प्रकाराला पर्यायानं सांगायचं झाल्यास वेडसर व्यक्ती म्हणता येईल. वेडेपणा हा व्यक्तीच्या अंगात कधी जन्मापासूनच असतो. म्हणजेच काही व्यक्ती जन्मापासूनच वेड्या असतात तर काही व्यक्ती या जीवनाच्या कोणत्याही वयात वेड्या होवू शकतात. त्या वेडेपणाला वेळ व काळ लागत नाही. बाकी दोषाचं मात्र असं नाही. क्वचितच प्रसंगी तसे दोष उद्भवू शकतात.
शारीरिक विकलांगता हा काही दोष. या दोषावर लोकं दोषारोपन करतात. तसंच त्या विकलांग पणाला शाप समजतात. त्यामुळंच बरीचशी पालक मंडळी अशा व्यक्तींकडून जबरदस्तीनं भीक मागून घेतात. कधीकधी त्या व्यक्तींचे मायबाप जिवंत असतात. तेव्हापर्यंत बरं असतं. त्यानंतर अशा विकलांग व्यक्तींचे हालहाल करुन टाकतात काही नातेवाईक.
विकलांग व्यक्तीचा जन्म घेतांना कोणताही गुन्हा नसतो ना त्यांचं कोणतं पाप असतं. जर असे लोकं जन्मापासूनच विकलांग असले तर त्यांचा जन्म हा जनुकीय बदलातून झालेला असतो. परंतू जन्माच्या वेळी जे धडधाकट असतात. परंतू जे जन्मानंतर विकलांग होतात. त्यांचं विकलांग होणं हे त्यांच्यावर त्यानंतर आलेल्या संकटाचा परिपाक असतो. ते संकट जेवढं तीव्र, तेवढी विकलांगता तीव्र.
अलीकडे विकलांगता हा एक अभिशापच ठरलेला आहे. कारण या प्रकारात ग्रासीत असलेल्या लोकांना समाज खुप छळत आहे. त्यांचं जगणं समाजानं असह्य करुन टाकलेलं आहे. त्यांना केवळ नावबोटंच ठेवत नाहीत लोकं तर त्यांना भीक मागायला मजबूत करीत असतात. तसंच अतिशय मेहनतीची कामंही करुन घेत असतात. याही पुढे जावून काही काही मंडळी अशा विकलांग लोकांना दूर असलेल्या मंदीर परीसरात नेतात व त्यांना काही बहाणे सांगून तेथून पळ काढत असतात. त्यानंतर यात काही काही लोकं घरी परत न येता तिथंच स्थिरावतात. कसंतरी जगावं म्हणून फुटपाथवर भीक मागून जगतात. काही मात्र सज्ञान असल्यानं परत येतात. परंतू जे विकलांगतेच्या प्रकारानुसार मतीमंद असतात. ते मात्र आपल्या घरी परतच येवू शकत नाहीत. कारण त्यांना तेवढी बुद्धी नसते. ते तिथंच असलेल्या मंदीराच्या पायरीवर बसून राहतात. त्यातच भूक ही माणसाची मोठी गरज असल्यानं त्याच मंदीराच्या पायरीवर बसून भीक मागतात. त्यांना आपल्या प्रारब्धावर रडणंही जमत नाही.
अलीकडील काळात विकलांगता शाप जरी असला, तरी काही काही लोकांना तो शाप वाटत नाही. आजचा काळ पाहता मंदीर परीसरात एक अशीही टोळी सक्रीय झाली आहे की मानवतस्करी करीत आहे. यात महिलांचीच तस्करी होत आहे. हे एका प्रसिद्ध दैनिकानं म्हटलं. परंतू त्यावरुनच सांगायचं झाल्यास या मानवतस्करीत विकलांग लोकांचाही समावेश नसेल कशावरुन? त्यांचीही तस्करी होत असेलच ही शक्यता नाकारता येत नाही. जी मंडळी या मंदीर परीसरात फिरत असतात. त्यांचा कोणी वाली नसल्यानं त्यांची मानवी तस्करी होतच असावी. परंतू त्यांचा कोणीच वाली नसल्यानं त्यांचं काही वर्तमान पत्रात नामोल्लेख दिसत नाही वा कोणी त्याबद्दल बोलत नाहीत.
महत्वाचं सांगायचं म्हणजे व्यक्ती विकलांग असणं हा गुन्हा आहे काय? तो व्यक्ती विकलांग आहे म्हणून त्याला कुठंही सोडून देणं वा सोडून जाणं हे बरोबर आहे काय? त्या विकलांग व्यक्तीला अर्थपुर्ण जीवन जगण्याचा अधिकार नाही काय? तसाच त्याचा जन्म काही मागील जन्माच्या शापाचा परिणाम आहे काय? या सर्वांची उत्तरं नाही अशीच आहेत. परंतू ते कोण समजून घेणार. कारण आज लोकांकडे वेळच उरलेला नाही कुणाच्या भावभावना समजून घ्यायला. जिथं आपल्याला जन्म देणा-या मायबापाचीच आपण सेवा करु शकत नाही. तिथं हे विकलांग. मग त्यांची सेवा आपण का करणार? आपण फक्त एवढंच करु शकतो की ते दिसले तर त्यांना एकदोन रुपये देवून मोकळे होणे.
महत्वाचं म्हणजे ते विकलांग आहेत हा काही त्यांचा गुन्हा नाही. ते विकलांग आहेत हा त्यांच्या मागील जन्मातील पापपुण्याचा लेखाजोखा नाही आणि ते विकलांग आहेत, म्हणून आपल्यालाही त्यांचा फायदा घेण्याचा अधिकार नाही. आपण एक मानव म्हणून त्यांच्या कवना समजून घ्याव्यात. जगू द्यावं स्वाभीमानानं. हवं तर सरकारनं त्यांच्यासाठी शेल्टर होम काढावेत नव्हे तर त्यांची कोणी छेड काढणार नाही याकडे विशेष लक्ष असावं, सरकारचं आणि आपलंही. त्यातच कोणी त्यांची मानवतस्करी करणार नाही याकडेही सरकारनं, आपण व प्रशासनानं बारकाईनं पुरविण्याची गरज आहे. त्यांनाही स्वाभीमानानं जीवन जगता येईल व स्वातंत्र्याचा पुरेपूर उपभोग घेता येईल यात शंका नाही. जेणेकरुन त्यांनाही वाटावं की भारत माझा देश आहे व सारे भारतीय माझे बांधव आहेत.
-अंकुश शिंगाडे
नागपूर
९३७३३५९४५०
ReplyReply allForward |