“ताळा चुकला, या जगण्याचा, क्षणभर आपण हसलो नाही”
विदर्भातील कवी तथा गझलकार रामहरी पंडित यांच्या “पादाकुलक” मात्रागणवृत्तातील ८+८=१६ मात्रा असलेली गझल काही दिवसांपूर्वी वाचनात आली होती. या गझलेतील एक शेर मनाला खूप भावला. मानवी जीवनाचा सार सांगणा-या अर्थपूर्ण शेराची उकल करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
“ताळा चुकला, या जगण्याचा” “क्षणभर आपण, हसलो नाही”
गझलकार- रामहरी पंडित (चंद्रांशू)
कारंजा जि.वाशिम
संवाद – ९७६५०११२५१
अत्यंत अर्थपूर्ण अशा वरील शेरात गझलकार यांनी मानवी जीवनाचा सार दोनच पंक्तीत मांडला आहे.
मानव जन्म एकदाच येतो, चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून जन्म झाल्यानंतर मानवाला जन्म मिळतो असे पुराणकथांमधून आपल्याला वाचायला मिळते… कीर्तनातून, प्रबोधनकारांकडून ऐकायला मिळते , तो नेमका कधी मिळतो हे सांगणे तसे अवघड आहे मात्र हा जन्म एकदाच मिळतो हे मात्र त्रिकाल सत्य आहे.
या जन्मात आल्यावर असं म्हणतात की जन्माच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पाचवीला सटवी येते आणि सटवीचा टाक टाकून जाते, म्हणजे काय तर तुमच्या मरेपर्यंतच्या आयुष्याचा हिशोब लिहून जाते. सृष्टीच्या नियमानुसार जन्म आणि मृत्यू या दोन अवस्थातून प्रत्येक सजीवाला जावे लागते. उत्पत्ती आणि लय या दोन अवस्थांमधील जी स्थिती आहे ती म्हणजे तुम्ही जगत असलेले आयुष्य. जन्म आणि मृत्यू यांच्यामधील अंतर म्हणजे तुमचं आयुष्य. या काळात तुम्ही जे जे कराल ते सटवीने आधीच लिहून ठेवले आहे. ती वाईट कधीच लिहीत नाही पण तुमच्या हातून नकळत काही तरी चुकीचे घडून जाते आणि मग आपलं विधिलिखित बिघडून जातं. म्हणूनच गझलकार म्हणतात की- “ताळा चुकला” आणि तिथून पुढे सारी घडी विस्कळीत होत जाते. जगण्याचे सारे ताळतंत्र बिघडून जाते. जगण्याचे गणितच बिघडून जाते आणि मनुष्य मग ती घडी बसवण्यासाठी पुन्हा धडपड करू लागतो. एक सुख मिळविण्यासाठी हजारो धडपडी कराव्या लागतात. आणि या धडपडीत पुन्हा काहीतरी चुकतं आणि पुन्हा नव्याने जीवनाची घडी बसवण्यासाठी प्रयत्न केले जातात. जगणं खूप अवघड आहे, या जीवनाची घडी बसवायला संपूर्ण आयुष्य वेचले तरी घडी बसत नाही. काही ना काही उणिवा राहून जातात. जे काम उभारी घेण्याच्या काळात करावे लागते ते होत नाही, जणू काही “या जगण्याचा” ताळा चुकला की काय असे वाटू लागते. जर हा ताळाच चुकला नसता तर संपूर्ण आयुष्य सुखात गेले असते म्हणून गझलकार “ताळा चुकला, या जगण्याचा” असे शेरात गुंफण करून आपली खंत व्यक्त करतात.
अमृतवेल या कादंबरीत वि.स.खांडेकर म्हणतात की- “एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्य सृष्टीत उतरावं म्हणून धडपड करणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि अशा वेळी ते स्वप्न भंग पावणं, भग्न स्वप्नांच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पावलांनी चालत जाऊन ते तुकडे गोळा करणे आणि पुन्हा नवीन स्वप्नं पाहणं यातच मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच” म्हणून गझलकार म्हणतात की आपण या धडपडीत जगण्याचा आनंदच हरवून बसलो आहे.
या प्रचंड धडपडीत माणूस स्वतःसाठी जगतांना दिसत नाही. हा माझा, तो माझा, ते माझे, हे माझे या तुझे माझे करण्यातच आणि जपण्यातच माणूस हरवून जातो.प्र त्येकाच्या भावना जपत जपत माणूस जगत असतो. आधी आईवडीलांना, त्यांच्या मनाला पटेल असेच वागायचं, त्यांचा मान राखायचा, त्यांच्या वयाच्या वडीलधा-या माणसांचा आदर करायचा , अशावेळी जरी नोकरी लागली तरी खर्च त्यांना विचारल्याशिवाय करायचा नाही. पुढे लग्न झाल्यावर बायका मुले यांच्यासाठी कमवायचे, मुलामुलींच्या लग्नासाठी , त्यांच्या भविष्यासाठी काही तजवीज करायची, जगायचं तरी कुणासाठी, आईबाप, बायको /नवरा – मुले, सासू सासरे, नातेवाईक यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे. यात एखादी बाब विसरलो अथवा नाही केलं तर हे सर्व करत असताना समाज काय म्हणेल, परिवारावर काय संकटं येतील या एका विचाराने माणूस पुन्हा एकदा त्या समस्या सोडवण्यात गुरफटून जातो. समाजात दोन टोकं आहेत एक नवकोटनारायण आणि दुसरा अठराविश्व दारिद्र्यात पिचलेला या दोन्हींच्या मध्ये जो मध्यमवर्गीय , शेतकरी, छोटे छोटे व्यापारी असा जो वर्ग आहे तो या समस्या सोडवण्यात गुरफटून जातो. त्याला स्वतःकडे बघायला वेळ नसतो. तो नेहमी इतरांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यात आपला वेळ घालवत असतो. नेहमी तणावात असतो. त्याच्या मनाला गारवा कुठेही मिळत नाही , सुख मिळत नाही , सारी धावपळ सुखाच्या शोधात असते , त्यामुळेच त्याचे हसणेही विरळ होत जाते. सुखाने परिवारात रममान होऊन हसून खेळून जगणे माणूस विसरत चालला आहे. आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजोपर्यंत त्याला क्षणभर हसायला मिळत नाही . म्हणजे सुखाची अनुभूती येत नाही. या शेरात गझलकार “आपण” हा शब्द अधोरेखित करतात. “आपण” या शब्दाला ते सर्वसमावेशक करतात. एकट्याला उद्देशून घेत नाहीत तर समस्त मानवाला या पसाऱ्यात हसायला वेळ नाही म्हणजेच सुखाची अनुभूती नाही म्हणून गझलकार आपल्या मतल्यात म्हणतात की – “क्षणभर आपण, हसलो नाही” एवढं आयुष्य संपलं पण क्षणभर विसावा मिळाला नाही, म्हणजेच क्षणभर ओठांवर हासू आले नाही इतका सुरेख आणि गर्भित अर्थ मला या शेरात जाणवला
गझलकार रामहरी पंडित यांना पुढील अशाच दर्जेदार लेखनीसाठी हार्दिक शुभेच्छा
रसग्रहण – प्रशांत वाघ “(पॅसिफिक टायगर)”
संपर्क – ७७७३९२५००० (“तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार”)