
काल रात्री मी वर्ध्याहून ट्रेनने बडनेरा स्टेशनला पोहोचलो. स्टेशनच्या बाहेर ऑटो रिक्षाची वाट बघत उभा होतो. तेवढ्यात, एक रिक्षावाले एका सीनियर सिटीझनशी बोलताना दिसले. ते सीनियर सिटीझन म्हणाले, “मला चपराशीपुऱ्याजवळ सोडा.” रिक्षावाले म्हणाले, “सौ रूपये होंगे!” ते सीनियर सिटीझन म्हणाले, “सौ रूपये आपको पुरता नही!” त्या ड्रायव्हरला ती गंमत वाटली.
त्याने त्यांना निग्लेक्ट केलं. मग दुसरा ऑटावाला धावत आला. तो म्हणाला, “वो अंकल कहरे, देडसो दुगा!” त्या दोघांनाही ते गंमत वाटत होती; पण मला वाटले की ती गंमत नाही. मग, हळूहळू मी निरीक्षण केलं तर त्यांच्या छातीवर ‘शेतकरी संघटना’ ‘स्वतंत्र विदर्भ राज्य’ असे दोन बिल्ले मला दिसले. ते मला म्हणाले, “त्याला शंभर रुपयांत परवडणार नाही.” मग मी त्यांना म्हणालो की, रिक्षावाल्यांना ही गंमत वाटते आहे! ते म्हणाले नाही, मला जायचं आहे ते ठिकाण आतमध्ये आहे. रिक्षावाल्याला शंभर रुपयात परवडणार नाही! मी त्यांना म्हणालो, त्यांनी शेअर ऑटोचा दर सांगितला आहे! मग ते तयार झाले आणि ते आणि मी रिक्षात बसलो. रिक्शाचालकाने मागे-पुढे बरेच जण बसवले. आम्ही आक्षेप घेतला नाही.
बोलण्याच्या ओघात त्यांनी माझा परिचय विचारला आणि मग हळूहळू चर्चा सुरू झाली. चर्चेदरम्यान ते हळूहळू बॅगेमधून वेगवेगळी निवेदनं, वृत्तपत्रांतल्या बातम्या, लेख काढून माझ्या समोर ठेवत गेले आणि विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्र यांची आर्थिक स्थिती, मागासलेपणाविषयी जिभेच्या शेंड्यावर असलेली असंख्य प्रकारची आकडेवारी ते माझ्या समोर सादर करत होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील वेगवेगळ्या घडामोडी ते कविता, म्हणी, शायरी, किस्से या रूपांत सांगू लागले. शरद जोशींविषयी आदरभाव मधूनमधून दिसत होता. ते फाईली उघडत तेव्हा मला खूप ठिकाणी ‘आमदार वामनराव चटप’ हे नाव दिसत होतं. मला असं वाटलं की, हे वामनराव चटप यांचे कार्यकर्ते किंवा पीए असावेत. मग खूप उशीरा मी त्यांना त्यांचं नाव विचारलं तर ते म्हणाले, “मी, वामनराव चटप!” तीन वेळा आमदार राहिलेला हा माणूस!
२७ वेळा तुरुंगात गेलेला! शेअर ऑटोमध्ये माझ्यासोबत! मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे निरखून पाहिलं! फार आश्चर्य दाखवता येत नव्हतं, एव्हाना आमचा स्नेह जडलेला होता. त्यांच्याशी नॉर्मल टोनमध्ये चर्चा करत मी त्यांना अनेक प्रश्न विचारले. सर्व प्रश्न संयमाने ऐकून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी समर्पक अशा आकडेवारीसह दिलं. मध्यंतरी, मी ” विधानसभा सदस्य” असे अंडाकृती स्टिकर चिकटवलेल्या एका आलीशान कारच्या मागे गाडी चालवीत होतो. हे महाशय चुकून अचानकपणे सर्वांना धक्का देत निवडून आलेले! मागाहून, संशोधनांती समजले की ती सव्वा तीन कोटी रुपयांची BMW कार आहे. वाळूउपसा, रस्तेबांधणी ही सारी कंत्राटं घश्यात टाकून अल्पावधीत हे महाशय करोडपती झालेले!
इकडे, चटप साहेब शेअर ऑटोमध्ये मला पुस्तकांतील वेगवेगळे उतारे, मोबाईलमधील वेगवेगळे पोस्टर्स दाखवित भरभरून बोलत होते. एक प्रकारचं चर्चासत्रच सुरू झालं होतं! शेवटी, जवळ असलेले एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक त्यांनी मला भेट दिलं! शास्त्राप्रमाणे, एवढ्या मोठ्या माणसासोबत सेल्फी वगैरे मी काही काढला नाही. वामनरावांना परत भेटायचे जे आहे! पुन्हा भेटू, चर्चा करू, असे एकमेकांना आश्वासनं देत आधी त्यांनी आणि मग मी रिक्शा सोडली.
-दिलीप चव्हाण, नांदेड