सत्यशोधक
“महात्मा ज्योतिबा फुले दाम्पत्यां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी सत्यशोधक चित्रपट बघावाच ” परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तनाला विरोध करणे हा मानवाचा स्थायी स्वभाव आहे. परिवर्तन भलेही मानवाच्या कल्याणासाठी असले तरी मानव ह्या परिवर्तनाला विरोध करणारच. कारण की, घडणारे परिवर्तन हे त्याच्या अनुरूप असेल की नाही ? त्या परिवर्तनात त्याचा टिकाव राहणार की नाही ? त्याचे अस्तित्व संपून जाणार का ? ह्या भितीखाली तो सतत वावरत असतो व परिवर्तनाला सतत घाबरत असतो.
समाज व्यवस्थेचे सुद्धा तसेच आहे. वरचा समाज खालच्या समाजाला नेहमीच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. कारण की, ह्या खालच्या समाजाने उठाव केला तर ह्यांची मक्तेदारी संपुष्टात येईल आणि खालच्या समाजांवर इतक्या वर्षांचे अन्याय झाले असतात की, त्यांना कशाला न्याय, योग्य की अयोग्य म्हणतात हे कळतच नाही आणि त्या भानगडीत तो पडतच नाही.
नुकताच ५ जानेवारी, २०२४ ला निलेश रावसाहेब जळमकरचा ‘सत्यशोधक’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. वाटले हा सिनेमा जरूर बघावा. दि. १० जानेवारी, २०२४ ला ठरल्या प्रमाणे पी.व्ही.आर. पनवेल पॉश मॉल थियेटर मध्ये दुपारी १.३० च्या शो ला गेलो. वेळेत जावे म्हणून अर्धा तास सवयी प्रमाणे अगोदर पोहोचलो. काहीच गर्दी नव्हती. एकटाच होतो. वाटले की, आजकालच्या जमान्यात ऑनलाईन तिकीट घेतल्या असतील सिनेमा हॉउसफ़ुल्ल असेल. थियेटर मध्ये गेलो तर काय, मी एकटाच. एकदा वाटले की मी किती श्रीमंत आहे संपूर्ण थिएटरचे भाडे भरून एकटाच चित्रपट बघतो आहे. परंतु दुसऱ्याच क्षणाला फार दुःख झाले. एका समाजसुधारक दाम्पत्याने एव्हढ्या खस्ता ज्यांच्यासाठी खाल्ल्या तेच चित्रपट बघायला नाही आले. का बरं हे असे होत असेल ? का बरं अजूनही अन्यायाची जाणीव आम्हाला नसावी ? हीच आपली अन्याय सहन करण्याची मानसिकता राहणार आहे का ? आहे त्या स्थितीत आम्हाला फार बरे वाटते. नको ते बंड, नको तो स्वाभिमान, आहे ते बरे आहे. कशाला सुखाचा जीव दुःखात घालायचा.
तसे बघितले तर चित्रपटाची उत्पत्ती ही समाजप्रबोधनासाठीच झाली आणि नंतर ह्यात बराच बदल होऊन ह्याचा कल मनोरंजन व प्रेम-कथा कडे वळला. ह्याला अधिक प्रसिद्धी मिळू लागल्यामुळे हे अशाप्रकारचे चित्रपट अधिक निर्माण होऊ लागले व समाज प्रबोधनाचे चित्रपट मागे पडले व त्याला कमी प्रसिद्धी मिळू लागली. समाजप्रबोधनाचे चित्रपटामध्ये जणू काही रोगावर एक कडू औषध, एक इलाज असा समाजाचा समज झाला आणि काळाच्या ओघात अशा चित्रपटाची निर्मिती कमी झाली. शेवटी आर्थिक बजेट हा मोठा प्रश्न असतोच.
सत्यशोधक चित्रपटामध्ये विविध पैलूंवर फार जवळून प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याकाळी अस्तित्वात असलेल्या भ्रष्टाचार प्रथेला बिमोड करण्याचा. पुण्यातील लोकांना व भविष्यातील पिढीला पाणी मिळावे म्हणून महात्मा ज्योतिबा फुले खडकवासला धरणाला जे जातीने लक्ष्य घालतात व त्यांच्या लक्षात येत की धरण बांधतांना कामाच्या गुणवत्तेत चालढकल केल्या जात आहे व जेव्हा ते हे संबंधित अधिकाऱ्याच्या लक्षात आणून देतात तेव्हा ते अधिकारी ज्योतीबांना सुद्धा लाच देण्यासाठी मागेपुढे बघत नाहीत. तेव्हा ज्योतिबा त्यांना खडसावून सांगतात की लोकांच्या जीवनाशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. मानव हा श्रेष्ठ आहे. वेळीच होऊ घातलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे ज्योतिबा उखडून टाकतात. आजच्या ह्या भ्रष्टाचाररूपी युगाला किती चांगला मौलिक संदेश चित्रपटाने दिला आहे.
शिक्षण ही एका घटकाची मक्तेदारी नाही तर ती माणूस म्हणून सर्वांना सामान संधी दिली पाहिजे. त्याकाळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अपमान सहन करून मुलींना शिक्षण दिले, शिक्षणाचा पाया रोवला म्हणूनच आज सर्व क्षेत्रात स्त्रिया उजळ माथ्याने नौकरी करीत आहे. म्हणजेच काय तर संधी व प्रतिनिधित्व मिळाले की माणूस हा प्रगतीपथावर जातोच. त्याला दाबून ठेऊ नका. त्याला संधी मिळाली की तो आपोआपच उभारून येईलच. आज राष्ट्रपती पदा पासून तर कॉर्पोरेट क्षेत्रात जी प्रगती स्त्रिया करीत आहे ती देण ह्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचीच आहे. पण आपले दुर्दैव घ्याची माहिती व जाण आजच्या स्त्रियांना नाही आहे. ह्यासाठी ह्या चित्रपटात योग्य प्रकाश टाकला आहे व ह्याचा बोध स्त्रियांनी घेतलाच पाहिजे.
असे किती जीव स्त्रियांचे गेले असतील त्याकाळी असलेल्या रूढी परंपरेने ह्याची आपल्याला जाणीवच नाही. एक खूप चांगला संदेश चित्रपटाने दिला तो म्हणजे ह्या व्यवस्थेला स्त्रियांच्या भावना व त्यांची शारीरिक गरज समजत नाही आणि ह्यातून काही विपरीत घडले तर त्याला सामावून घेण्याची समाजात व्यवस्थाच नाही. आज समाजात भरपूर साधने आहेत वैद्यकीय विज्ञानाने प्रगती केल्यामुळे कदाचित ही समस्या मोठी आज वाटत नसेल परंतु ती त्याकाळी खूप मोठी समस्या होती. ही स्त्री समाजाची अडचण जाणलेच नाही तर त्यावर उपाय पण शोधला पाहिजे. नवजात मुलांचे व स्त्रियांचे प्राण त्यांनी वाचवले हे किती मोठे मानवतेचे काम ह्या फुले दाम्पत्यांनी समाजाचा विरोध असतांनी सुद्धा केला.
मुलं होत नाही म्हणून स्त्रियांना दोष देणे हा खूप भावपूर्ण संवाद ह्या चित्रपटात बघायला मिळतो. फुले दाम्पत्याला मुलं होत नाही म्हणून ज्योतीबांना दुसरं लग्न करायला सांगतात. त्यावर ज्योतिबा म्हणतात की, कशा करून सावित्री मध्ये दोष असेल, त्यांच्या (ज्योतिबा) मध्ये सुद्धा असू शकतो. मग अपत्यासाठी सावित्री पत्नीने लग्न करण्यास काय हरकत आहे ? काय हा विचार झाला तो ही त्याकाळात म्हणजे फुले दाम्पत्य समाजाच्या टीकाटिप्पणीचा विचार न करता एकमेकांच्या भावनांचा विचार करतात हे पती-पत्नीच्या प्रेमातून जाणवतं. हा एक चांगला संदेश सत्यशोधक मध्ये देण्यात आला आहे.
हा चित्रपट का बघावा तर महात्मा फुल्यानी ब्राम्हणाचे कसब, गुलामगिरी व सत्यशोधक ग्रंथ लिहिले. ह्यातून त्यांनी समाजप्रबोधन केले. हे ग्रंथ आपण कधी वाचणार वा कधी समजून घेणार. लेखक-दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर यांनी अगदी सहजपणे व कौशल्यपूर्ण सर्वांना समजेल अशी सत्यशोधक मध्ये मांडणी केली व फुले दाम्पत्यांचे विचार समजा पर्यंत पोहचले. आपल्याला फक्त सिनेमा गृहामध्ये जाणून सत्यशोधक बघणे आहे. त्यासाठी निलेश जळमकरांचे अभिनंदन व खूप-खूप शुभेच्छा. सध्याच्या इंटरनेटच्या युगात त्यांनी हे धाडस केलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तसेच संदीप कुलकर्णी, अभिनेता व राज्यश्री देशपांडे, अभिनेत्री यांनी सुद्धा खूप चांगली भूमिका पार पाडील त्यांचे सुद्धा अभिनंदन. महाराष्ट्र सरकारने सत्यशोधक सिनेमा टॅक्स फ्री केला खूप खूप धन्यवाद व सरकारचे आभार. तसेच हा चित्रपट प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा दाखविला पाहिजे ही एक विशेष विनंती कारण की ती तशी समाजाची गरज आहे.
आता समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की, सत्यशोधक बघून सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची सर्व समाजाने एकोप्याने हातभार लावला तरच क्रांती ही होऊ शकते. चला तर मग सत्यशोधक चित्रपट सर्वांनी एकदा बघून, विशेष करून मुली व महिलांनी फुलें दाम्पत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया.
आपला इतिहास जर आपल्याला माहित नसेल तर आपण असॆ लढणार. ही लढण्याची प्रेरणा प्रत्येक स्त्रीला सत्यशोधक मधून नक्कीच मिळेल. चित्रपटाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलें शोधून काढतात ह्या प्रसंगातून होते तर महात्मा फुलेंचे राहिलेले काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधाना द्वारे पूर्ण करतात हे अगदी मनाला भावून नेणारे आहे. धन्य ते फुलें दाम्पत्य व्यर्थ नाही होणार तुमचे ते बलिदान. सत्यशोधक सत्याचा शोध घेणारच.
अरविंद सं. मोरे,
अतिथी संपादक,
गौरव प्रकाशन, अमरावती
————————-
अरविंद सं. मोरे,
नवीन पनवेल
९४२३१२५२५१