![](https://www.gauravprakashan.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231016-WA0017.jpg)
युद्धाची अनवट छाया..!
मात्रावृत्त – विधाता
(२-८-४ ! २-८-४)
( | – | प | – + | ! | – | प | – + | )
युद्धाची अनवट छाया अंधार घेउनी येते,
भीतीच्या मांडीवरती भेसूर कुणी का रडते ?
अतिरेकी अभद्र इच्छा टोकाची विचार नीती,
खाईत ढकलते आहे सृष्टीला, मानव जाती
संवादे मार्ग निघावा, हे कुणास का ना कळते ?
शस्त्रांच्या कुरघोडीने भळभळा रक्त ओघळते
निष्पाप अभागी जनता संभ्रमात भेदरलेली,
सांत्वनाच वरवर नुसती अगतिकता गुदमरलेली
हा विनाश समोर दिसतो पण थांबत नाही कोणी,
हट्टाने पेटुन सारे मरणाची लिहिती गाणी
हे युद्धच साऱ्या जगता अंताची देते ग्वाही,
विजयाचे गाणे गाण्या उरणार कुणीही नाही
– विजो (विजय जोशी)
डोंबिवली (मालवण-सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२