आयुष्याला समजून घेणे सोपे नाही. जन्मापासून मुत्यू- पर्यंत आयुष्य ही आपली पाठशाळा आहे आणि ती सतत, छडी घेऊन अनुभवाचा फळा आपल्या समोर ठेवून कधी सुखाचे तर कधी दुःखाचे धडे शिकवत जाते.. आपल्या कळत नकळत ती आपला अभ्यास करून घेते. आपल्या बुद्धिमत्ते्नुसार आपण तिचे किती आकलन करतो ते आपल्यावर अवलंबून आहे. पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या बुद्धीला चालना मिळते आणि त्यातून मिळालेलं “सज्ञान” आपल्याला आपली वैचारिक प्रगल्भता वाढविण्यासाठी कामात येतं. “पुस्तक जन्माला येतं ते अनुभवाच्या कसोटीवर, आणि अनुभव देतात ते आयुष्य..”
जीवन जगण्याच्या परिक्षेचा तपशील लक्षात आणून देण्यासाठी अनुभव आपल्या सावलीत क्षणोक्षणी उभे असतात. घोड्यासारखा चाबूक घेऊन मागे धावतात, ‘ऊठ, तुला जिंकायचे आहे, पडला तर सावरायचे आहे, जिंकला तर पुढील परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे अगदी शेवटपर्यंत.. न संपणाऱ्या अनुभवाचा पेपर हातात देवून परत परत सोडविण्यासाठी!!
माणूस कितीही मोठा झाला, त्याच्या भोवतीचे वलय कितीही टणक असेल तरीपण जीवनाची पाठशाळा त्याला विद्यार्थी दशेतून बाहेर येवू देत नाही, माणूस तिच्या पेक्षा मोठा कधीही होऊ शकत नाही.. कारण समुद्राची खोली, आकाशाचे व्यापक रूप मोजण्याचे यंत्र या विज्ञान युगातपण त्याला प्राप्त झाले नाही..
आयुष्याची डायरी लिहितांना शेवटपर्यंत “उजेड आणि अंधार यामध्ये झुजनारे” न संपणारे पान उघडले की, वेदनेने ठसठसणाऱ्या हृदयाचे उसासे, चढउतार, खाचखडगे, गोट्या, माती, सिमेंट, डांबर तुडवत चालणाऱ्या रोजच्या वाटेने ठेचाळलेल्या, सोललेल्या पायाचे ठसे नशिबाच्या आराखड्यावर तसेच्या तसे उमटतात. जन्म मृत्यूच्या मध्ये अधांतरी लटकत फिरत राहतात कधी किंचाळत, कधी हसत कधी धुमसत, कारण भावनेच्या पिजंऱ्यात ऋणानुबंधाचे भोवती वेटोळे बांधून फिरतांना सुटका नसतेच माणसाची! हृदयाच्या कप्प्याने आधीच प्रेमाचे वलय निर्माण केलेले असतात. गरज, सवय, स्वभावाला चिकटून असते गेचुडासारखी. यातून अलित्प राहू न शकलेला माणूस. सुखदुःखाचा खांद्यावर शेला घेऊन फिरत राहतो घरभर.. कुणी किती डागण्या दिल्या याचा हिशोब करत.. आणि परत त्याच वाटेवर जातो मनाचे सांत्वन करण्यासाठी नात्याच्या आतली ओल शोधण्यासाठी, सुटलेल्या गाठी परत परत गाठ मारून आणि भावनेला रप्पू करून एक नवीन अनुभवाचे पान आपल्या आयुष्याच्या डायरीत जोडण्यासाठी..
कधी असावधपणे चालतांना अचानक दगडाखालचे विंचू चावतात. मध्ये येणारा खड्डा पाय लडखडला की, पाय मुरगळतो तेव्हा माणसाने केलेले खड्डे माणसालाच वेदनेच्या खाईत लोटते. बेसावध डंख आपल्याला मरण यातना देतो. सावध, बेसावध इशारे जीवनाचा पाठ वाचून जीवन असेच आहे, “तू फक्त सज्ञान रहा” जीव तोडून सांगत राहतात.. “पाय पोळल्याशिवाय आणि हात भाजल्याशिवाय जीवनाचे खरे स्वरूप कळत नाही.
वेदना आणि प्रेम या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात एकाच वेळी नसत्या, फक्त प्रेम किंवा फक्त वेदना असत्या तर मानवाला जीवन जगण्यात काहीतरी अर्थ आहे. त्याचे काहीतरी दायित्व आहे. हे कुठे कळले असते!
निसर्गाची जी काही जडण घडण आहे ती मानवी संघर्षमय जीवनाला जगण्याचे बळ देणारे ऋतुचक्र आहे. खूप कमी पाऊस आणि खूप जास्त पाऊस दोन्ही हानीकारकच.. म्हणून अती प्रेम आणि कमी प्रेम दोन्ही गोष्टी संसाराला बाधक आहे.. अनुभवाचा फळा हाच तर समतोल साधायला शिकविते.. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही आयुष्याचे गणित शिकविणारे पान असते.. ठेच लागल्याशिवाय माणसाला चालतांना सावधगिरी कशी बाळगायची कळणार नाही, प्रेम झाल्याशिवाय भावना कळणार नाही आणि शत्रू असल्याशिवाय वेदना कळणार नाही. अनुभव आल्याशिवाय अनुभूती येणार नाही
. कारण अनुभव हा आपला गुरु आहे. तो माणसे ओळखायला शिकवितो. जेव्हा तो शिकवितो तेव्हा त्रास नक्की होतो. काळजाच्या वेदना असह्य होतात. “गुरु हा गुरुदक्षिणा मागतोच. “एकलव्यला पण अंगठा द्यावा लागला होता.”
तेव्हा यातून लवकर सावरता आले तर पुढील दिशा मिळते! “गरम चुल्ह्यावर शेकलेली भाकर दाह सोसूनही दुसऱ्यांची भूक भागवते, म्हणून आपले माणूसपण कधीही हरवू द्यायचे नाही.” दगडातही देव आहे याची अनुभूती येण्यासाठी प्रथम अनुभव घ्यावा लागतो तेव्हा अनुभूती येते. प्रत्येक अनुभव वेगळा त्यानुसार अनुभूती घेता आली तर प्रत्येक सकारात्मक प्रतिसाद आपल्या हृदयातून निर्माण होतात. दुःखाच्या धुराळ्यातही सुखाचा उजेड दिसायला लागतो! उन्हाळा डोक्यावर असतांना देखील गारवा जाणवतो. जीवन हे असेच आहे त्याला अनुभायचे असते आणि खूप काही शिकायचे असते म्हणूनच!!!
ठेच लागल्यानंतर दगडाला दोष न देता सावधपणे चालायला शिकले की उपेक्षा, अपेक्षा, आनंद, गोडवा, कटुता, स्वार्थ, चांगुलपणा प्रेम, नैराश्य छलकपट, अहंकार, द्वेष, मत्सर या सर्व अनुभवांचं गाठोड बांधून वेळोवेळी कधी कुणाशी कसे वागावे हे फक्त आपले आपण ठरवायचे.. स्वभावातील देवपण आणि माणसातील माणूसपण जपता आले की, आयुष्याचा विविधांगी प्रवास सुकर होतो..
सौ निशा खापरे
नागपूर
7057075745