फासेपारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज.!
पारधी हे एका आदिवासी जमातीचे नाव असून या जमातीचे लोक वन्यप्राण्यांची व पक्षांची शिकार करून त्यांचा खाद्य आणि विक्रीसाठी उपयोग करून जगत आहे.आजही भारताच्या काही राज्यात फासेपारधी शिकार करण्याचे आपले परंपरागत काम करतांनादिसतात.समाजाकडू न दुर्लक्षित राहिलेला हा समाज आजही परंपरागत शिकार करून आपली गुजराण करत आहे.त्यांना शिक्षणाचा गंध नाही..शिक्षणा अभावी योग्य अयोग्य,चांगल वाईट त्यांना कळत नाही.सरकारद्वारे ज्या योजना आखण्यात येतात त्या त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही..त्यामुळे या समाजाला विकास योजनांचा फायदा होत नाही.या जमातीच्या विकासाच्या योजनांचा फायदा या संवर्गातील इतर समूहांना होत असून हा समाज अजूनही विकासापासून व समाजाच्या मुख्य प्रवाहा पासून फार दुर आहे..शिक्षणा अभावी त्यांचे राहणीमान गलिच्छ असल्यामुळे त्यांना रोजगार व नोकरी मिळत नाही..यामुळे हा समाज समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतो.त्यामुळे हा समाज शिकारी शिवाय चोरी व वाटमारी करतात.अनेक गुन्ह्यात हा समुदाय सापडला असून अनेकांवर गुन्हे दखल आहेत.इंग्रजांच्या राज्यात विविध भटक्या जमातींना गुन्हेगार जमाती कायदा १८७१ नुसार गुन्हेगार ठरविण्यात आले होते. तेव्हापासुन आजतागायत या जमातींवरचा हा अन्यायकारक ठपका पुसल्या गेलेला नाही.
सरकार या समाजासाठी अनेक योजना आखत आहे.मात्र त्याचा लाभ या समाजाला करून घेता येत नाही.शिक्षणा अभावी या लोकांना सरकारच्या योजना कळत नाही.महाराष्ट्रातील पारधी आदिवासी समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, पारधी समाजाचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागातर्फे सन २०११-१२ या वर्षापासून पारधी विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत पारधी समाजाला घरकुल, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण तसेच व्यवसाय यासाठी अर्थसहाय्य्य देणे, पारधी समाजाच्या वस्त्या मुख्य रस्त्यांशी जोडणे असे विकासात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
राज्यातील बहुतांश पारधी समाजाला या योजनेचा लाभ होत असून नागपूरमधील अकोला, वाशिम जिल्ह्यातील कानशिवणी, पाराभवानी, पिंपळगाव आणि वडाळा गावात पारधी आदिवासींनी या योजनेच्या माध्यमातून आपली घरं वसवली आहेत. पारधी समाज मुळातच भटक्या जमातीत येत असल्याने या आदिवासी समाजाला एका गावात घराची सोय करून देत त्यांच्यात स्थैर्य आणणे हे या विकास कार्यक्रमाचे यश ठरत आहे.मात्र अजूनही पाहिजे तशी अंमलबजावणी होत नसल्याने म्हणावा तसा फायदा होत नसल्याचे वास्तव आहे.
फासेपारधी जरी वन्यप्राण्यांची व पक्ष्यांची शिकार करीत असले तरीही त्यांच्या शिकारीचे काही नियम आहेत जे पक्षांची संख्या कमी होऊ देत नाही असे दिसुन आले आहे. उदा.पक्षांच्या कमी होत असलेल्या संख्येमुळे फासेपारधी शिकार सोडुन इतर व्यवसाय करू लागले आहेत.ही एक आनंदाची गोष्ट आहे.गरज आहे त्या समाजाला समजून घेण्याची व तशा संधी उपलब्ध करून देण्याची.
फासे पारधी” समाज हा भारतातील जंगलात शिकारी करून जगणाऱ्या समाजापैकी एक विशिष्ट समाज आहे.पारधी समाज हा आदिवासी आहे. इंग्रजांनी भारतातील जंगलातून शिकारींवर मोठ्या प्रमाणावर बंदी घालून जंगलाबाहेर काढलेला हा समाज, भारताच्या ग्रामीण भागाने मुख्य प्रवाहात सामील करून न घेतल्यामुळे, उपजीविकेसाठी गुन्हेगारीच्या मार्गास लागला. इंग्रजांनी विशेष कायदा करून त्यांना जन्मजात गुन्हेगारी जमात हा ठसा मारला. इंग्रजांच्या काळात त्यांच्याकडून दिवसा शासकीय वेठबिगारी कामे करून घेतली जात आणि रात्री कडा पहारा ठेवून त्यांना वस्तीबाहेर पडण्यास पूर्ण बंदी घातलेली असे. स्वातंत्र्यानंतर आदिवासींना जन्मजात गुन्हेगार ठेवणारे कायदे बंद करून त्यांचा अनुसूचित जमाती जमातीत समावेश केला. कागदोपत्री त्यांच्याकरता बऱ्याच योजना राबवल्या जाऊनही पोलीस आणि समाजाने त्यांना मुख्य प्रवाहात व्यवस्थितपणे सामावून घेतले नाही. बहुसंख्य पारधी समाज भटका असल्यामुळे मतदारयादीतील नोंदणी, रेशनकार्ड आणि त्यापरत्वे मिळणाऱ्या शासकीय सुविधंपासून आणि शिक्षणापासून वंचित रहात आला आहे. अनुसूचित जमाती जातिबांधवांचे पारधी समाज हे एक अंग आहे. त्या समूहात ५४ जमाती, जवळपास पावणेदोनशे पोटजमाती आणि त्यांच्यात सामावलेला सुमारे दोन-अडीच कोटींचा जनसमूह आहे.
गावाच्या बाहेर वेशीवर,उघड्यावर यांच्या पाली, टेंट दिसतात..कुठेही चोरी झाली तर पोलीस सरळ यांना गुन्हेगार समजून पकडतात..कायमच अपराधी ठरविण्यात आलेल्या या समुदायाला समजून घेण्याची गरज आहे.सरकार,सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेवून त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास पुढाकार घ्यायला पाहिजे.समाजातील देणगीदार दाते, समाज सेवक,शिक्षण संस्था चालक,शिक्षण प्रेमी व तज्ञ लोकांनी पुढाकार घेऊन या समाजाला मुख्य समाजाशी जोडले पाहिजे..अमरावती जिल्ह्यात मतीन भोसले या शिक्षकाने स्वतःची सरकारी नोकरी सोडून या समाजाच्या मुलांसाठी आश्रम शाळा
ऊघडलीआहे.मतीन भोसले यांनी अमरावती येथे ‘आदिवासी फासेपारधी सुधार समिती’ स्थापन केली. फासेपारधी समाजाची सामाजिक, आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असल्यामुळे ही जमात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. अठरा विश्व दारिद्रय, भीषण आर्थिक दैनावस्था, गरीबी, दारिद्रयात व गुन्हेगारी प्रवृत्तीत खितपत पडलेल्या कुटुंबातील भटक्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्राथमिक शिक्षण देण्याचे विधायक कार्य प्रस्तुत संस्थेच्या माध्यमातून भोसले करत आहे. फासेपारधी समाजातील वंचित व दुर्लक्षित बालकांना शिक्षण देण्याच्या हेतूने मतीन भोसले यांचे कार्य विधायक, रचनात्मक व क्रांतिकारी आहे. फासेपारधी समाजातील बालकांना शिक्षण देण्याचा निर्णय महत्त्वाचा असून भोसले यांचे कार्य मैलाचा दगड ठरेल.सेवाभावी संस्थांनी मतीन भोसले यांचा आदर्श ठेवून या समाजातील मुलांना शिक्षण दिले तर निश्चितच या समाजाची दैना संपण्यास फारसा वेळ लागणार नाही.
-प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६
ReplyForward |