स्त्रियांना विविध क्षेत्रात संधी मिळण्यासाठी समाजाचा पुढाकार आवश्यक – सहायक पोलीस आयुक्त पुनम पाटील
- ‘नवदुर्गा: जागर स्त्रीशक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
गौरव प्रकाशन
अमरावती, (प्रतिनिधी) : पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. त्यांनी स्वत:च्या क्षमता ओळखून स्वविकासावर भर द्यावा. पुरुषांप्रमाणे स्त्रियांना संधी दिल्यास त्या निश्चितच प्रगती करतात. स्त्रियांना विविध क्षेत्रात संधी मिळावी यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त पुनम पाटील यांनी आज येथे केले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संत ज्ञानेश्वर सांकृतिक सभागृहात ‘नवदुर्गा : जागर स्त्री शक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी श्रीमती पाटील बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, माजी नगर सेविका सुरेखा लुंगारे, गंगा खारकर, अनिता तिखिले, कार्यक्रम संयोजिका स्मिता देसाई-नायर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
नवरात्रीच्या निमित्ताने राज्यातील दहा ठिकाणी ‘नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलाविषयक योजनांची माहिती देण्यात आली. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाची महिलाविषयक विविध धोरणे स्त्रियांना संगीत तसेच नृत्याच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आली. या स्त्रियांनी ही माहिती आपल्या कुटुंबियातील, परिचयातील स्त्रियांना द्यावी. जेणेकरुन शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू स्त्री पर्यंत पोहोचेल, असा विश्वास श्रीमती पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजना जसे ‘बेटी बचाव’, ‘बेटी पढाओ’ या योजनेबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून यावेळी माहिती देण्यात आली. साडेतीन शक्तीपीठाच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्राची भूमी म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. अन्यायाविरुध्द आवाज उठवून राज्याचे तसेच देशाचे संरक्षण करणाऱ्या शक्तीमाता आपल्या आसपास आहेत. या शक्तीमातांची थोरवी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकसंस्कृती, लोककला आणि पारंपारिक कला तसेच नृत्यविष्कारातून स्त्रीचे उलगडणारे विविधांगी रुपे आणि त्यामाध्यमातून शासनाच्या महिलाविषयक योजनांची माहिती रोचक आणि नृत्य, संगीत या कलाविष्काराच्या माध्यमातून देण्यात आली. विद्या वाघमारे, संदेश पाटील दिग्दर्शित सदाबहार नृत्य विष्कारातून विद्या सदाफुले, विनोद गायकर आणि शर्मिला राजाराम शिंदे यांनी बहारदार नृत्य सादर केले.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चौरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्री वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहायक संचालक समन्वयक भुषण देसाई उपस्थित होते.
राज्यातील 6 महसुली विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी (मुंबई, पुणे, नाशिक, छ.संभाजीनगर, अमरावती व नागपूर) तसेच साडेतीन शक्तीपिठांच्या ठिकाणी (कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, वणी ) नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमाव्दारे राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणाऱ्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लघुनाटिका, नृत्य, स्लाईड शो आदीव्दारे राज्य शासनाचे महिला विषयक योजना व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच यावेळी नाट्यगृहात उपस्थित महिलांसाठी प्रश्नमंजुषाही घेण्यात आली. मंगळागौरीच्या फुगड्याही यावेळी रंगल्या. विजेता महिलांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे दिग्दर्शन भुषण देसाई यांनी तर संचालन विनोद गायकर यांनी केले.