देवीची दासी : श्रद्धा की अंधश्रद्धा
दिवसाचे बारा सवाबारा वाजले तरी हुडहुडी जात नव्हती. घरासमोरील जांबाच्या व बदामाच्या झाडावर वानरांची एक टोळी धूमाकूळ घालून जवळच्याच आंब्याच्या झाडावर विसावली होती. मध्येच खारूताई चिक चिक असा आवाज करत धिंगाणा घालत होती . दोन्ही पायावर थांबून हात जोडून विनंती करत होती की यांना येथून हाकला म्हणत होती का त्यांना जांबं खाऊ द्या म्हणत होती हे मला समजत नव्हते . काही वानरांच्या हातात जांबं होती.लहान मंडळी आईना सतावत उगीच उडया मारत होते.काही पिल्ले तर मलाच वाकुल्या दाखत होते.मी त्यांना भिती दाखत होतो तर ते सर्व मला भिती दाखवत होते,का मला पाहून हासत होते हे कळायला मार्ग नव्हता. त्यांचे पांढरेशुभ्र दात मला दाखवत होते.
मी त्यांना हातात काठी घेवून भिती दाखविलो.छतावर जमा केलेले बदाम त्यांच्या अंगावर फेकून पाहिलो ;पण ते लईच चलाख. फक्त फांद्या बदलत होते.पिल्यांनी तर चि चि चिर्र s Sअसा आवाज करत आकाशच डोक्यावर घेतले होते.शेवटी मीच कंठाकून छतावरुन खाली आलो.घरात वेळ घालवण्यासाठी काहीतरी लिहावं म्हणून डायरी व पेन घेवून टेबल जवळ खुर्ची सरकावून बसलो.
घरात आम्ही दोघंच चिमणी चिमणाची जोडी.चिमणी भांडे घासण्यात मग्न होती.मी माझ्या खोलीत बसलेलो.बाहेरुन आवाज आला ” माई ओ माई.माई ओ माई.घरात कोणी नायी का ?मायी ओ मायी.” भांडयाच्या आवाजामुळं कदाचीत तिला ऐकू आलं नसेल म्हणून घरातून तिनं काही उत्तर दिलं नाही.मला आवाज ऐकू येत होतं ;पण तिची गल्लीतील कोणी मैत्रिन असेल तर ती घरात येवून तिला बोलेलच म्हणून मी तिच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलो.
शेवटी त्या बाईने थोडं जोरातच आवाज दिलं,”ओ माई ओ माई.” मी विचार केलो माई म्हणणारी कोण असेल म्हणून मी माझ्या खोलीतून बाहेर आलो. तेवढयात माझी बायकोही स्वयंपाकघरातूनबाहेर आली.पहातो तर समोर काळ्या सावळ्या रंगाची,मध्यम उंचीची, थोडीशी जाडजूड अंगाची बाई गुलाबी रंगाची नऊवारी घालून, डोक्यावर परडी घेवून थांबली होती.काळी सावळी होती पण नाकी डोळी सुंदर होती.कपाळ हळदीने व कुंकूने भरलेलं होतं.
तिला पाहून मला खरं तर खूपच राग आला.कारण ती सरळ मुख्य दार ओलांडून पहिल्या माळ्यावर आली होती.मी थोडं रागतच म्हणालो,” काय हो ताई तुमाला काही कळतय का ?तुमी कुणालाबी न इच्च्यारता वर कसं काय आलाव ? चला निघा इतून.” ती बाई माझ्या चेहऱ्याकडे पहात म्हणाली ,” भाऊ असं का बोलून राहीले. म्या चंद्रपूर येतून येऊन राहीले ना.”
मी : तुमी कुटून का येईनाव तूमी अगोदर खाली उतरा.” ”मी मायीच्या गावावून आलाव भाऊ . पोच्यामाई मंदिर बारडला राताव .चंद्रपूरच्या महाकाली देवीची मी दासी हाय. तूमी असं का बोलून राहीले .घरासमोर येणारा कोण कोणत्या रूपात येतय ते तुमाले कळून रातय का? “ती बाई धीटपणे म्हणाली व जाग्यावरून तसूभरही हालली नाही. मला वाटलं या बाईला चार शिव्या घातल्याशिवाय ही खाली उतरणार नाही.पण तिला शिव्या काय व कोणत्या द्याव्या हा प्रश्न मला पडला.मी गुपचूप थांबलो .माझ्याकडे पाहून माझी बायको हळूच गालातल्या गालत हसली .मी मात्र शांत उभा राहिलो.
तेवढयात माझी बायको म्हणाली , “ताई बसा.” त्या बाईला बरं वाटलं. ती माझ्याकडे तिस्कार नजरेने पहात फथकल मारून दारासमोरच बसली व म्हणाली, ” माजी माय चांगली हाय .दयाळू हाय.परेमळ हाय.” आता मी मात्र तिच्यापुढे दुष्ट ठरलो.
बायकोनं विचारलं , ” कुटून आलाव माय ?” ती : “म्या चंद्रपूरच्या देवीची सेविका हाय. चंद्रपूरवून आलोय. ” हे वाक्य ऐकून माझी मंडळी तर खुष होवून म्हणाली ,”आमी याच वर्षी आलताव की चंद्रपूरला. दहा बारा जणी होतो आमी माय.” खरं तर त्या बाईचं मला राग येत होतं.पण त्या निरक्षर बाईचं मानसशास्त्र मात्र भलतच चांगलं होतं. ती म्हणाली,” माय तूज्या हातात लईच पुण्य हाय बग.खरं तर माय तू चांगल्या घरची बाईलेक पण तुला गरीबाच्या घरात दिल्यावरही तू सुखानं संसार केलीस व करुन रायलीस बग.आलेल्या गेलेल्या पावूण्यांना पावून तू कदीच तोंड वाकडं केली नायीस व करणारबी नायीस. माज्य माईच्या कपाळावर कदीबी आटया पडत नायीत. माज्या मायीच्या हातात लईच दान हाय. तू भाग्यवान हाईस माय. तुजी सर्व लेकरं सुखानं जगोत असी म्या देवीजवळ मागणी मागून राहीलोय. मायी तू सगळ्याचं भलं करतेस पण तूला एक दोन लोकं वाईट मणतातच. तूज्या लेकराचं भलं व्हणार हाय मायी.तूजे लेकरं नौकरीला लागतात माय.तू नेमीच नवऱ्याचं, लेकाराबाळाचं चांगलं व्हावं. ते सर्व सुखी रावेत मणुन देवाकडे मागणी मागतेस. सोतासाठी कायीबी मागत नायीस माय . सगळयालाच सुखी ठेव मणुन देवासमोर तू नेमीच हात जोडतेस. खरंच मायी तू मावली आहेस मावली.”
येवढी स्तुती केल्यावर कोणती बाई आनंदी होणार नाही मला सांगा बरं.मी माझ्या बायकोचा चेहरा न्याहाळून पाहिलो.चेहरा आनंदाने उजाळला होता. चेहऱ्यावर हसू पसरलं होतं. चेहऱ्यावर समाधान झळकत होतं.आता त्या देवीच्या भक्तीनिला नाराज करण्याची हिंमत माझ्याकडे उरलीच नाही. मी दोघांचं बोलणे ऐकत बाजूला थांबलो गुपचूप.
थोडयावेळानं मी म्हणालो, “ताई तुमचं नाव काय ?ती म्हणाली, “चंद्रकला. ” मी : गाव कोणतं ? म्हणजे तुमचं माहेर सांगा .”ती :माजं गाव व्हय आकोल्या जिल्यात हाय. ” मी : तुमाला दिलेलं गाव ? “ती म्हणाली, “देवीला सोडलेल्या बाया लगीन करीत नायीत.” मी : वयात आल्यावर लग्न करायची इच्छा झाली तर ? “ती थोडावेळ शांत बसली. काय विचार करत होती हे मला कळत नव्हते. बहुधा काय उत्तर द्यावं असे ती विचार करत असावी.
मी विचारलो, ” तुमी किती वर्षाचे असताना तुमाला चंद्रपूरच्या देवीला सोडले ? “ती म्हणाली, ” मी जलमल्याबरोबर. ” हे ऐकून मला नवलच वाटलं . मी म्हणालो , तुमाला तुमच्या आईनं दुध पाजवलं नाही का ? ” ती म्हणाली,”नाही. मंदिरात सोडलेल्या बायानीचं माझं पालनपोषण केलय.” मी : तुम्हाला महाकालीच्या मंदिरात का सोडलं.” तिने उत्तर दिले. ” माज्या आईला बरं वाटत नव्हतं. घरात सुख नव्हतं . माज्यापेक्सा तिन बहीनी मोठया हाईत. दोन भाऊ हाईत. मी सगळ्यात लहान हाय.त्या सगळ्याचं लगीन झालेलं हाय. हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर दुःखाची किणार दिसत होती. मी म्हणालो ,” ताई तुमी वयात आल्यावर लग्न करुन का घेतला नाहीत ? देवीला सोडलेल्या मुलीनां लग्न करता येत नाही का ? ती म्हणाली , ” ज्यांना लगीन करायची इछा झाली त्यांनी देवीची परवानगी घ्यावी लागते. त्याकरिता लगनात लागणारं मंगळसूतर , साडी व इतर साहित्य देवीला आर्पण करुन देवीची परवानगी घ्यावी लागते .देवीने परवानगी दिली तरच लगीन करता येते.”
देवी परवानगी देते म्हणजे काय करते ही बाब माझ्या टकोऱ्यात काही शिरली नाही . जन्मताच स्वतःच्या सुखासाठी आई वडील एका निष्पाप जीवाला देवीला अर्पण का करतात ? जीवनभर ते जीव शारिरीक, मानसिक, कौटुम्बीक सुखापासून वंचित राहून कायमचे भटकत राहतात . माणसं श्रधाळू असावेत ;पण अंधश्रधाळू नसावेत. ही पद्धत बंद झाली पाहिजे. समाजातील वाईट रुढी परंपरा यांना कायमची मुठमाती देण आवश्यक आहें. मी पुढं विचारलो, “तुमी कमावलेला पैसा कोणाला देता ?त्या पैशाचं तूमी काय करता ?
यावर तिने उत्तर दिले, “आमची कमाई आमी देवीला देतोय.” “तुमी आई बाबाकडे जाता का ?ती म्हणाली , “व्हय जाते की चार दिवस रावून येते परत.” आता ती माझं मानसशास्त्रही चांगलं जाणली असावी .ती म्हणाली ,भाऊ तूमी लईच भोळे हाव. तूमी या जलमात कुणालाबी कदीच दुकावले नायीत. तूमी लई लोकांना मदत करुन राहीले. भाऊ तुमाला तुमचे सगळे लोक मानतात .तुमच्या मानतल्या सगळ्या गोस्टी देवी पूर्ण करणार हाय .” मी तिचं बोलणं फक्त ऐकून घेतलो. एक शब्दही बोललो नाही. भिक मागणारे सर्वजण असंच सांगतात.नाही का ? अधुनिक जग चंद्रावर चाललय . काही समाज आणखी अंधश्रधेतच बुडालय. जन्मताच देवीला सोडलेल्या मुलीचं संपूर्ण जीवन कसं व्यतीत होत असेल?
घरी आलेल्यांना आम्ही शक्यतो जेवन करण्याचा आग्रह धरतोत. ती बाई दोन घास घराच्या दारासमोरच बसून जेवली व देवी तूमचं कल्यान करो असं म्हणत पायऱ्या उतरुण दिसेनाशी झाली.
राठोड मोतीराम रूपसिंग
नांदेड -६
९९२२६५२४०७