धूलिवंदन न खेळता विद्यार्थी करतात १७ वर्षापासून १२ तास अभ्यास
मागील सतरा वर्षापासून धूलिवंदन खेळण्याऐवजी हातात पुस्तक देऊन विद्यार्थ्यांकडून सलग बारा तास अभ्यास करून घेण्याचा आगळावेगळा उपक्रम आंबेडकरी युवा व विद्यार्थी बहुद्देशीय संस्था राबवत आहे.
● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : राज्यासह संपूर्ण भारतात होळी आणि रंगोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. छोट्या बालगोपाळांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच रंगात न्हावून निघाले आहेत. पण त्याचबरोबर तरुणाई नशेच्या आहारी जाऊन मोठ्या प्रमाणात मद्यसेवन करताना दिसून येत आहे. शरीरासाठी घातक असलेल्या रंगांची उधळण होत असताना आंबेडकरी तरुणाई यापासून दूर राहावी, या हेतूनं गेल्या सतरा वर्षापासून रंगाऐवजी हातात पुस्तक देऊन त्यांच्याकडून सलग बारा तास अभ्यास करुन घेण्याचा आगळावेगळा उपक्रम आंबेडकरी युवा व विद्यार्थी बहुद्देशीय संस्था करीत आहे.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
17 वर्षापासून सुरू आहे उपक्रम : “संस्थेमार्फत दर रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत आंबेडकरी बालसंस्कार वर्ग चालवला जातो. अकोला आणि अमरावती जिल्ह्यात एकूण २५ बालसंस्कार वर्ग आहेत. सक्षम समाज निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला संघर्ष विद्यार्थ्यांना बालसंस्कार वर्गातून शिकवला जातो. सण आणि उत्सवांचा इतिहास विविध मार्गदर्शकांकडून सांगितला जातो. होलीका दहन आणि धूलिवंदनाचा इतिहास त्यांना सतरा वर्षांपूर्वी सांगितला. तेव्हापासूनच विद्यार्थ्यांनी पुढील वर्षापासून धूलिवंदन आणि होळी साजरी न करण्याचा निर्धार केला. साधारणतः मार्च-एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात. यामुळं विद्यार्थ्यांना सलग अभ्यासाचा पर्याय दिलाय. 43 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात आज सहाशे विद्यार्थी सहभागी झालेत. हा उपक्रम निरंतर सुरू असल्याचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. रवींद्र मुंद्रे यांनी गौरव प्रकाशन’शी बोलताना सांगितलं.