Sunday, October 26

एकतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्टेशनवर ३७व्या जनआंदोलनातून साजरी अनोखी दिवाळी

शकुंतला रेल्वे स्टेशनवर शेकडो दिव्यांनी उजळलेला परिसर, महिलांना साडी वाटप आणि बालगोपालांसोबत साजरी अनोखी दिवाळी — सामाजिक एकतेचा दीपोत्सव

एकतेचा संदेश देत शकुंतला रेल्वे स्टेशनवर एक अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या ३७व्या प्रतीकात्मक जनआंदोलनातून ही दिवाळी सामाजिक एकतेचा दीपोत्सव ठरली. दिवाळीचा उत्सव सामान्यतः प्रत्येकजण आपल्या घरात साजरा करतो; परंतु या वेळेस नागरिक, महिला, बालगोपाल, व्यापारी आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन रेल्वे स्टेशन परिसरातच आनंदोत्सव साजरा केला. विषमतेचा अंधार दूर करून एकतेचा प्रकाश जागविण्याच्या हेतूने शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीने हा अभिनव उपक्रम हाती घेतला.

अचलपूर रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजता स्वच्छता अभियानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती, माहेर फाउंडेशन, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, जमात-ए-इस्लामिक महिला संघटन, मानव सेवा समिती, व्यापारी संघटन आणि क्रांती ज्योती संघटन यांच्या सहकार्याने स्टेशन परिसर झळाळून निघाला. त्यानंतर माहेर फाउंडेशनच्या वतीने महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. सत्याग्रह समितीच्या वतीने नागरिक, महिला आणि बालकांना फराळ, मिठाई आणि फटाके वाटप करून सर्वांना आनंदाचा वाटा देण्यात आला.

संध्याकाळी सहा वाजता रेल्वे ट्रॅकवर आणि परिसरात शेकडो हातांनी शेकडो दिवे पेटवण्यात आले. हारफुले, दिवे आणि रंगीत प्रकाशाने सजलेले शकुंतला स्टेशन एक वेगळाच दृष्य अनुभव देत होते. बालगोपालांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, त्यांच्याकडे वाटण्यात आलेले फराळ आणि फटाक्यांचे पाकीट, या सर्वाने दिवाळीचा खरा अर्थ – ‘सामूहिक आनंद’ – साकार झाला.

शकुंतला रेल ब्रॉडगेजचा डीपीआर मार्गी लागल्याने आणि लवकरच शकुंतला एक्सप्रेस पुन्हा धावेल या बातमीमुळे नागरिकांच्या मनात नवचैतन्य संचारले आहे. सत्याग्रह समितीच्या दीर्घकालीन प्रयत्नांना आता फळ मिळताना दिसत असून, या आनंदाच्या पार्श्वभूमीवरच ही दिवाळी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमात शकुंतला रेल बचाव सत्याग्रही योगेश खानजोड़े, डॉ. राजा धर्माधिकारी, दीपा तायडे, शारदा उइके, संजय डोंगरे, शंकर बारखडे, दयाराम चंदेले, विजय गोंडचवर, राजेश पांडे, मुरलीधर ठाकरे, रामदास मसने, कैलाश ठोसर, सारिका ताई, प्यारेलाल प्रजापती, तसेच जमात-ए-इस्लामिक हिंदच्या महिला मेहरबानो, नझिया खान, नगमा कौसर, मुब्शेर फिरदौस आणि यास्मीन बानो यांची उपस्थिती लक्षणीय होती.

या सामाजिक उपक्रमात अनेकांनी आपापली जबाबदारी स्वीकारून योगदान दिले. प्रकाश दीपाची जबाबदारी राजाभाऊ धर्माधिकारी यांनी, नमकीन चिवड्याची राजेश अग्रवाल यांनी, मिठाईची राजकुमार बरडिया यांनी, तर फटाक्यांची राजेंद्र जयसवाल, संतोष नरेडी आणि कमल केजरीवाल यांनी घेतली. पेयजलाची जबाबदारी शंकर बारखडे यांच्यावर होती. साडी वाटपाची जबाबदारी सौ. दीपा तायडे आणि शारदा उइके यांनी, स्वच्छता अभियानाची संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापती आणि योगेश खानजोड़े यांनी, तर हारफुले सजावटीची विजय गोंडचवर आणि मुरलीधर ठाकरे यांनी निभावली.

या सर्वांच्या एकत्र प्रयत्नातून शकुंतला रेल्वे स्टेशन उजळून निघाले. दिव्यांच्या उजेडात केवळ स्टेशन नव्हे तर सामाजिक सलोखा, प्रेम, एकता आणि मानवतेचाही प्रकाश पसरला. या दिवाळीत शकुंतला रेल्वे स्टेशन खऱ्या अर्थाने एकतेचा दीपोत्सव ठरला.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.