मुंबई (प्रतिनिधी) : “नीट लक्ष देऊन ऐकलं आणि मन लावून बघितलं तर तिथली शांतता, तिथला निसर्ग, तिथला डोंगर, तिथली लेणी, आजही आपल्याला त्यांच्या गोष्टी सांगताहेत असे मला दर वेळी कान्हेरीच्या भेटीला गेल्यावर वाटत असते” असे उद्गार विलेपार्ले येथील ‘साठ्ये महाविद्यालयातील’ (स्वायत्त) प्राचीन भारतीय संस्कृती विभागाचे प्रमुख, प्राध्यापक डॉक्टर सूरज पंडित यांनी काढले.
भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरीवली भाग व बोरीवली सांस्कृतिक केंद्राच्या वतीने गेले आठ महिने, महिन्यातून एकदा आयोजित केल्या जाणाऱ्या इतिहास कट्टा: गप्पा इतिहासाच्या: गोष्टी माणसांच्या या लोकप्रिय उपक्रमांतर्गत सुरु असलेल्या साष्टीच्या गोष्टी गोष्ट आठवी: गोष्टी कान्हेरी लेण्यांच्या या कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम बोरीवलीतील देवीदास रोड वरील ‘ब्रम्हा कुमारी उद्यान’ या रमणीय ठिकाणी नुकताच आयोजित करण्यात आला होता. कान्हेरी लेणी हा विषय डाॅ. सूरज पंडित यांनी अत्यंत रसाळ भाषेत सांगताना श्रोत्यांना दीड तास खिळवून ठेवले होते.
कान्हेरी लेणी निर्माण करण्याची प्रेरणा देणाऱ्या भिक्खु संघाचा प्रभाव जवळजवळ सोळाशे वर्षे टिकून होता. बौद्ध धर्माच्या परंपरेतील अशा प्रकारचे हे एकमेव उदाहरण असावे, असे प्रा. सूरज पंडित यांनी सांगितले. जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठात बौद्ध धर्माचे प्रगत शिक्षण घेण्याआधी कान्हेरीच्या विहारात मूलभूत व पायाभूत शिक्षण घेणे, हे महत्वाचे मानले जात असे, असेही एक उदाहरण देऊन त्यांनी सांगितले.
आपल्या गप्पांचा समारोप करताना डॉ.सूरज पंडित म्हणाले की, बोरीवली परिसरातील कान्हेरी हा लेणी समूह मुंबईच्या प्राचीन इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण साक्षीदार आहे. येथील १२८ बौद्ध लेणी इसवीसन पूर्व पहिल्या शतकापासून ते साधारण सहाव्या शतकापर्यंत कोरली गेली. येथील बौद्ध भिक्षूसंघ पुढे पोर्तुगीजांच्या आगमनापर्यंत कार्यरत होता. या भिक्षूसंघाची कीर्ती सुदूर देशांमध्ये पोहोचली होती. तिबेट, चीन, नेपाळ, जपान व मध्य आशियातील देशांतील भिक्षू, दानकर्ते आणि कलाकार कान्हेरीला भेट देत होते. कान्हेरी हे एक बौद्धधर्माचे शिक्षण देणारे महत्वाचे केंद्र होते. या भिक्षूसंघाच्या देखरेखीखाली निर्माण झालेल्या या लेण्यांची रचना, येथील जलव्यवस्थापन, मूर्ती वैभव अशा अनेक सांस्कृतिक पैलूंचे दर्शन होते.
समारोपाच्या शेवटी डॉ.सूरज पंडितांनी सर्वांना असे आवाहन केले की कान्हेरी लेण्यांच्या या इतिहासातून योग्य तो बोध घेऊन या जागतिक वारसा स्वरूपातील लेण्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहून संघटितपणे प्रयत्न व पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे उपाध्यक्ष रविराज पराडकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले, तर बोरीवली भागाचे अध्यक्ष सुरेंद्र तन्ना यांनी प्रास्ताविक केले,तर बोरीवली सांस्कृतिक केंद्राचे उपाध्यक्ष सुनील गणपुले यांनी इतिहास कट्ट्याचे स्मृतीचिन्ह देऊन प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सूरज पंडित यांचे स्वागत केले व इतिहास संकलन समितीच्या सौ.पुजा कुलकर्णी यांनी डॉ. सूरज पंडित यांचा सविस्तर परिचय करून दिला.