अमरावती (प्रतिनिधी ) : शेतकरी बांधवांनी कर्जखात्याचे विहित मुदतीत नवीनीकरण करून घ्यावे जेणेकरून नवे कर्ज व व्याज सवलत योजनेचा लाभ मिळू शकेल, असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे सांगितले.
दरवर्षी मिळणा-या कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक असते. परतफेड न झाल्यास पुढील वर्षी कर्ज उपलब्ध होण्यास अडचण येते. कर्जफेड करणा-या शेतक-यांना नवीन वर्षासाठी पुन्हा कर्ज दिले जाते. मुदतीत परतफेड न केल्यास कर्जखाते थकित होते. थकित खातेधारकांना बँका पीककर्ज देत नाही. त्यामुळे मुदतीत कर्जाची परतफेड करून खात्याचे नवीनीकरण करणे आवश्यक आहे. येत्या 31 जुलैपूर्वी शेतकरी बांधवांनी आपल्या मागील पीककर्जाची परतफेड करून खाते नवीनीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
नवीनीकरण केलेल्या शेतक-यांना पीकविमा योजनेचा लाभ घेता येतो, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ मिळू शकतो. वाढीव कर्ज घेण्यास शेतकरी पात्र होतात. कर्ज खाते नवीनीकरण केलेल्या शेतक-यांना बँकांच्या इतर कर्ज योजनांचा देखील लाभ होतो.