
या वाटेवरून जाताना..!
नाशिकच्या प्रसिद्ध कवयित्री मा गीतांजली सटाणेकर यांची नुकतीच एक कविता वाचनात आली. कविता वरवर जरी साधी दिसत असली तरी ती गर्भित अर्थ घेऊन आली आहे. या वाटेवरून जाताना हा जीवनाचा मार्ग कायम ठेवून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. बालपण -कुमारपण-तरुणपण- गेल्यानंतर वृद्धापकाळ येतो हा मानवी जीवनाचा शेवटचा टप्पा असतो. हा काळ भोगत असताना गतकाळातील संदर्भ आठवून मनाला अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरे त्यावेळी द्यायचा प्रयत्न मनुष्य करतो पण तोपर्यंत क्षण हातातले निसटून गेलेले असतात. मी ज्या ज्या काळातून गेलो तो क्षण मी का भोगला नाही ज्याची आता मनात सारखी आठवण का येते हे प्रश्न कवयित्री या ठिकाणी विचारत आहे.
या वाटेवरून जाताना
या वाटेवरून जाताना, मन अवखळ का होते ?
बालपण आठवते
या वाटेवरून जाताना, मन तरुण का भासते ?
फुलपाखरू सम भिरभिरते
या वाटेवरून जाताना, मन उनाड का होते ?
गीत प्रीतीचे गाते
या वाटेवरून जाताना, मन गतस्मृती का आठवते ?
आसवात भिजते
या वाटेवरून जाताना,मन श्रद्धाळु का होते ?
भक्तीरंगात रंगते
या वाटेवरून जाताना, मन हळवे का होते ?
सहज माहेरी धावते
-गीतांजली सटाणेकर
नाशिक
७८८७९५६१२७
* रसग्रहण
मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यु येईपर्यंत तहहयात सुखी जीवनाचा मार्ग शोधत असतो. अशा वेळी आयुष्याची खडतर वाट चालत असताना अनेक संकटांशी सामना करावा लागतो. कधी कधी अशी संकटे येतात त्यावेळी आपल्याला बालपण आठवते, आणि मनात आपोआप शब्द येतात की लहान चांगले होते , ते अवखळ जीवनच बरे होते. ही लहानपण हरवल्याची भावना निर्माण होते. म्हणूनच कवयित्री म्हणतात की “या वाटेवरून जाताना, मन अवखळ का होते ? बालपण आठवते”
जसं जसे माणूस वृद्धात्वाकडे झुकू लागतो तसतसे त्याला आपल्या तरुणपणाची आठवण येत असते. या तरूणपणात आपण काहीच काम केले नाही.. आईबापांच्या जीवावर स्वच्छंदी जीवन जगलो.. कर्तव्य काय असते ते कधी समजून घेतले नाही, केवळ फुलपाखरांसारखे ईकडे तिकडे फिरत राहिलो आणि आता ती कर्तव्याची घडी बसवायला अवघड जात आहे, म्हणून कवयित्री म्हणतात की- “या वाटेवरून जाताना, मन तरुण का भासते ? फुलपाखरू सम भिरभिरते”
असा प्रश्न मनात येताच कवयित्री पुन्हा एका प्रश्नाने उल्हासित होतात. या जीवन वाटेवरच्या प्रवासात सहजीवनाचे जे प्रेमाचे गाणे गायले ते प्रीतीचे गाणे जे मनात रूजवले होते ते प्रीतीचे गाणे आता गात आहे.. पण तो क्षण आता निघून गेला आहे. म्हणूनच कवयित्री म्हणतात की – “या वाटेवरून जाताना, मन उनाड का होते ? गीत प्रीतीचे गाते”
हे सारे आठवत असतात मन गतस्मृतीत हरवून जाते, त्या गतवैभवाची क्षणाक्षणाला आठवण येते… पण आता ही आठवण का येते असाही प्रश्न मनाला पडतो अशा वेळी आपोआप डोळ्यांच्या पापणीला आसवांचा भार पेलवत नाही. पापणींचा बांध फोडून आसवे गळू लागतात. म्हणूनच कवयित्री म्हणतात की -“या वाटेवरून जाताना, मन गतस्मृती का आठवते ? आसवात भिजते”
जोवर तरूण होतो तोवर कशाचीही पर्वा केली नाही, कधी परमार्थ केला नाही, कधी कुणाला चांगलं बोललोच नाही, कुणाच्या मदतीला धावून गेलो नाही.. फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार केला. आयुष्यभर स्वार्थ मनात ठेवून माणूस जगत असतो तो स्वार्थ आता बाजूला ठेवून जगावे लागणार आहे आणि आता या वृद्धापकाळाच्या वाटेवरून जाताना सोबत कोणीच नाही.. मनाला आता वाटते की आता संसार सोडून भक्ती मार्गाला लागावे… मन श्रद्धाळू बनत जाते, भक्ती रंगात रंगून जावे असे वाटते म्हणून कवयित्री म्हणतात की-
या वाटेवरून जाताना,मन श्रद्धाळु का होते ? भक्तीरंगात रंगते”
मनुष्याच्या जीवनातील शेवटची घटका म्हणजे मृत्यू समीप येण्याचा काळ.. हा काळ अतिशय कठीण असतो.. या काळात आपलं शरीर थकलेलं असतं, मुले निसर्गाच्या नियमानुसार त्यांच्या प्रपंचात गुंतलेले असतात, नातवंडे, सूना देखील आपापल्या कामात गुंतलेले असतात अशा वेळी आपल्याकडे बघायला कुणालाच वेळ नसतो. मन हळवे होते, मनाला धाव लागते ती माहेराची.. लाक्षणिक अर्थाने माहेर म्हणजे ज्या विधात्याने आपल्याला हा मानवी जन्म दिला त्याच्या चरणी लागावे.. म्हणजेच माहेरी जावे ईतका गर्भित अर्थ यातून दिसून येतो. हे माहेर कुणालाच चुकले नाही.. मन सहज या माहेराकडे धावत असते… त्या विधात्याच्या आठवणीने मन हळवे होते त्याच्या ओढीने मन धावत असते… म्हणूनच कवयित्री म्हणतात की – “या वाटेवरून जाताना, मन हळवे का होते ? सहज माहेरी धावते”
कवयित्री गीतांजली सटाणेकर यांनी या कवितेत मानवी जीवनाचा सार सांगितला आहे.. मनाला पडलेले प्रश्न आणि त्यांची उकल त्यांनी सहजगत्या केली आहे… अतिशय अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारी रचना कवयित्री सटाणेकर यांनी मांडली आहे…
रसग्रहण
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क -७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
सर
खूप छान रसग्रहण प्रकाशित केले…
आपण सतत नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहात.. स्वतः पुढाकार घेऊन आपण काळजीपूर्वक साहित्यिकांना प्रकाशात आणत आहात
धन्यवाद सर
मनापासून धन्यवाद 🙏💐सन्माननीय सर माझ्या रचनेचे रसग्रहण केले. इतका भावपूर्ण विचार सूंदरशब्दात मांडला माझी कविता मलाच नव्याने आवडली आणि समजली असे रसग्रहण वाचल्या वर वाटल खूप आभार
नमस्कार सर मी गीतांजली सटाणेकर भावपूर्ण रसग्रहण माझी रचना मी नव्याने जाणली सुंदर शब्दात विचार मांडले हृदयस्पर्शी