समाजाच्या ह्दयाची स्पंदने टिपून माणसाच्या जगण्यातील अनुभवाच्या अभिव्यक्तीचे कथा रुपाने साहित्यात मांडण्याचे प्रामाणिक प्रयत्न प्रा.यशवंत माळी करीत आहेत.
शेतीमातीतील श्रमाघामाची,शोषणाची,अवतीच्या भवतीच्या मानवी जीवनाचे चित्रण करणारे अस्सल व.पु.काळेच्या लेखनीची बरोबरी करणारे ग्रामीण कथाकार यशवंत माळी होय त्यांचा ‘उलघाल ‘ हा कथासंग्रह होय.नक्कीच एकदा वाचण्याचा मोह झाल्यावाचून राहत नाही.
यशवंत माळी यांचा उलघाल हा कथा संग्रहाचा आस्वाद घेण्याचा योग आला. सर्वच कथासंग्रह वाचनीय असून मनावर प्रभाव पाडणारा आहे.कथेची निवड ,विषय, आशय या बाबी ग्रामीण जीवनातील संस्कृतीचे ,तेथील लोकमनातील भावनाचे जगतना होणारी उलघाल अतिशय प्रभावीपणे रेखाटतात.जीवनातील प्रसंग व ते मांडण्याची पध्दत कौतुकास्पद आहे .कथा उभी करतांना कोठेच नकलीपणा वाटत नाही.मानवी मन त्या भोवतालचा परिसर, निसर्ग, भाषा,म्हणी,वाक्यप्रचार, बोलण्यातील लखबी, विषयाची निवड, कथेचा शेवट मनाला चटका लावून जातो. मन अस्वस्थ होते.क्षणभर काहीच सूचत नाही. वाचलेल्या कथे भोवती,कथेतील पात्रा भोवती,आपण तरंगत राहतो.मनात हळहळ निर्माण होते.कथेतील मोजके संभाषण मनात उलघाल करत मनात थायलंडची तुळस प्रतिकात्मक रुपाने बहरते.कथेतचा प्रवास हा न सुटलेलं कोडं वाटू लागतो मग पंचवेदला गवसणी घालते.ईच्छामरणाचा रतीब सावलीत विसावा घेतो.आपण दिशाहीन होत विचाराचे स्थलांतर पेन्शनच्या इगतपुरीत निर्णयाचे शूटिंग करत निवडणुकीच्या सत्कारात मनाचा उलघाल सोडवत बसतो.
खेडे गावाभवतालचे वातावरण झपाट्याने बदलत आहे.पण कधी कधी परिस्थितीने काही लोक त्या नविन बदलापर्यंत पोहचत नाहीत कारण त्याच्या जीवनात होणारी घटना त्यांना त्याच्या जीवनाच्या सीमारेषा ओलांडून देत नाही समस्याच्या भोव-यामध्ये ते गरगर भिरत राहतात. चाकोरीतले जीवन ते सोडू शकत नाहीत.
माणसातील हट्टी न बदलणारा ,आपल्याच गुरमीत रमत जाणारा स्वभाव,वागणे,चालीरीती,गरीबी,त् यांच्या वाट्याला आलेले जीवन, जगतांना होणारी अवहेलना, दु:ख,अपमान,लाचारी,फसवेगीरी या सा-या आसूडाचे मार ते सहन करीत जगतांनाचे वर्णन यशवंत माळी फारच अप्रतिम करतात.
आपल्या अंत:करणातील सलत राहणा-या विचाराची बीज ते कथातून पेरत राहतात.पेरतांना त्यांची लेखनीची कुरी कोठेही अडखळत नाही ते सहज कथाबीजे आपल्या कथेतून रुजवण करीत राहतात हीच कथा कस्तुरी बनून वाचकांच्या मनात कथाबीज सुगंधाची कुपी खोलत राहते त्याचा चटका दर्प मनाला अस्वस्थ करतो.कथा पुन्हा वाचन्याचा मोह होतोच. पुन्हा वाचतांना त्या कथेतील नव चेतना नविन रुप घेऊन मनात उलघाल निर्माण करते.म्हणूनच यशवंत माळी सरांच्या कथा साहित्य विश्वात नवी वाट निर्माण करीत व.पु.काळे,पु.भा.भावे,फडके,खां डेकर, आण्णाभाऊ साठे,माडगुळकर,प्रा.कमल देसाई या सर्वांचा वारसा होण्याचे कार्य यशवंत माळी सर करीत आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही.त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या मनात साहित्याची नव चेतना निर्माण केली.मंदिराच्या सोप्यात,वळचणीला, लिंबाच्या निवा-याच्या संस्कारक्षम कथेला व्यासपीठ करुन लाकडी कुलुपबंद पेटीतील ग्रंथालयातील पुस्तकामध्ये त्यांना लेखनाचे लावण्य प्राप्त करुन अस्सल जीवनवादी दृष्टिकोन यशवंत माळी यांच्या रक्तपेशीत रुजला,बहरला आणि लेखनीच्या रुपाने कथारुप होऊन साहित्याचे लेणे निर्माण केले.
सुरुवातीच्या काळात कथेला बक्षीस मिळाले की, त्यांचे मन आनंदाच्या हर्ष शिखरावर उड्या मारु लागे .कथा लेखनाबद्दल प्रा.यशवंत माळी सर लिहितात ,*” गर्दीच्या या दुनियेत मुखवटे धारण करणारी खुजी ,आपमतलबी माणसे सतत भेटायची मनात खुपत राहायची ह्दयावर आघात करणा-या घटनांनी ग्रामीण परिसरातील नवनव्या प्रश्नांनीकाळीज विदीर्ण व्हायचं, राजकारणाचे अड्डे असणाऱ्या शिक्षणसम्राटांच्या तोंडी जिभा छाटण्याची आणि वर हात कलम करण्याची भाषा मन विदीर्ण करायची.त्यापेक्षा आपल्या शेतातील ढोरकष्ट बरे वाटायचे.शेती थोडी होती.पाणी नव्हतं.पाण्याचा शोध घेत व पाण्याचे स्त्रोत निर्माण करत खरोखर जिंदगी बर्बाद झाली.बैल थंडपणे औत ओढायचे.मी मनातून असंख्य कथा लिहायचो.खांद्यावर चाबूक घेण्याची कधी गरज वाटली नाही.
चारुतासागरांचा सहवास लाभला.ग्रामीण साहित्यिक वाचनात भेटत होते.डाॅ.आबासाहेब शिंदे , कोरे गुरुजी यांचा सहवास हा तर साहित्याचा सहवास होता.माझ्या अनेक विद्यार्थ्यांचे संग्रह बाजारात येत होते. मन अभिमानानं भरून जायचं अन् मृगाच्या हलक्या धारा शब्दतुषार होऊन कागदावर बरसू लागायच्या, कथाचा परीमळ माझ्या अंत:करणात पाझरत राहायचा.*” व्वा सर,म्हणूनच आपण सच्चा साहित्यिक आहात.हे सिद्ध होतं.माणसाच्या मर्मात शिरून मानवत्वाच्या अथांगापर्यंत आपली लेखनी नक्कीच पोहचते.माणसा -माणसातील उसवलेल्या माणुसकीच्या नात्यांना सांधण्यासाठी ,माणसातील माणुसकीला निर्वानाची हाक आपण कथेतून देत मराठी संस्कृतीच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या प्रवृत्तीवर आपल्या कथा लढत राहतात.झगडत राहतात.अस्वस्थ मनाचा ठाव घेत शोषणाविरूद्ध बंड फुकारतात.कथातून स्त्री जीवनाचा संघर्षपट प्रा.यशवंत माळी आपल्या कथेतून उभा करतात. त्यांची प्रत्येक कथा नवीन संदर्भ घेऊनच येते.सहज ओघवती भाषेतून सोप्या शब्दालंकारी कथेला नवा साज देतात.
*उलघाल*कथासंग्रहात एकूण सोळा कथा आहेत.पण या सोळा कथा सोळा रुप घेऊन येतात अन् सोळाआण्याचा बंदा रूपाया व्हावा तसा हा संग्रह साहित्यातील बंदा रुपाया आहे हे कथा वाचल्यावर वाचक मान्य करेलच यात शंका नाही.प्रा.यशवंत माळी यांच्या लेखणीची धार वाचक मनाला भुरळ घालते .कथेतील आकलन असीम असून कथासुत्रात विचाराची सुसूत्रता पहावयास मिळते.प्रांजळ जीवनव्यवहार त्याच्या ध्येयात आणि श्वासात असलेने कथा मनाचा ठाव घेतात.
संग्रहातील पहिलीच कथा उलघाल जी संग्रहाचे नावरुप घेऊनच आपल्या भेटीला येते. त्याची सुरवातच पहा ना, “चावी फिरवल्याबरोबर नळातून पाणी यायच्या आधी भसा -भसा वावटळासारखी हवा आणि पाण्याच्या फवा-याबरोबर नुसताच आवाज यावा तसं बडीमाँचं बोलणं.तसेच भिंतीवरच्या घड्याळातला सेकंद काटा छोट्या बेडकासारख्या उड्या मारत पाण्यात पळत होता.अशा अनेक वाक्यातून प्रा.यशवंत माळी याच्या प्रतिभेची आणि प्रतिमाची व निरीक्षणाची झलक दिसून येते कथेतील बडीमाँ,मनजीत, अबोली.यांची चित्रफीत वाचकाच्या मनातच भिरभिरत राहते.त्याच्या मनातील ‘उलघाल ‘मनाला चटका लावून जाते. अबोलीचे स्वत्वाची जपत,स्त्रीत्व जपत कथा मनात उलघाल घालत राहते.ताजी टवटवीत, वेड लावणाऱ्या रूपात, दारोदार फिरणा-या भटक्या पण सात्विक चिंध्या पांघरलेल्या रुपगर्वितासारखी उन्हातान्हात हिडूनसुध्दा ढग पांघरलेल्या सोनेरी किरणांसारखी .. ..प्रकाशमान! या कथेच्या द्वारे लेखक मानवी जीवनाला कुरुपतेच्या दलदलीतून सहीसलामत वाचवण्याचा संदेश देतात.सात्विक भावनेचा जय होतो.
न सुटलेले कोडे ही दुसरी कथा गर्भ श्रीमंतीचा भरदारी जुना इनामदारांचा वाडा, पतझड झालेल्या वाड्यात माया इनामदार तिची आई दोघीचं राहायच्या वाड्यासारखी श्रीमंतीची घमेंड, वाड्याच्या बुरुजावर बांडगुळं उगवलेली.अशा वाड्यात माईलेकी जुन्या वाड्याच्या विदीर्ण झालेल्या अवस्थेसारख्या राहायच्या. आयुष्याच्या महावस्त्रात नकोसे वाटत राहिलेल्या मृत्यूच्या वाटेवर ठिगळ चिटकवल्यासारख्या मायाची आई पडून होत्या.वखवखल्या नजरेने मायाला करमरकर साहेबांनी नोकरी दिली पण करमरकर मायाला आपल्या प्रेममय जाळ्यात फसवणेच्या प्रयत्न असफल होतो तिची बदली होते पण त्याही ठिकाणी नवा मुजूमदार साहेब दोअर्थी बोलणारे पण मायाला आपल्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न.शेवटी अफरातफर करुन ते निघून जातात.अशा चक्रव्यूहात फसलेली मायाचे सौंदर्य अभिशाप बनते. कथेची गुंफन फारच छान.
थायलंडची तुळस ,प्रवासवर्णन करणारी व थायलंडचे वर्णन करणारी, तेथील निसर्ग, सागरकिणारा,अवती भवतीचा प्रदेश ,प्रवासातील गंमती याच बरोबर गाईड गोड आवाजाची किमी, तिचे लेखककाशी संपल्याचे वागणे.हसतखेळत, क्षणभर भेटीत आपलेसे करण्याची पध्दत, आनंदी जीवन जगण्याची शिकवण देत कथा मनाला जीवनसंदेश देऊन जाते.किमीला तुळशीच्या रुपात पहात आत्मतृप्त मंजि-यानी बहरलेली तुळस,मौनचा हुंकार, दरवळणारा गंध, खातेवेळी आठवणीने उर भरून येते अन् दारातली तुळस जणु किमीच वाटू लागते.
प्रा.यशवंत माळी यांच्या सर्वच कथा एकापेक्षा एक सरस आहेत.कथेची भाषा कथेच्या पाश्वभुमीला शोभेल असेच आहे .कल्पनतेने कथाच्या जोडीला निसर्गाचे वर्णन कथेला नवा साज चढवत जातो.यातून यशवंत सर मानवी जीवन व निसर्ग याचे जगतांना किती आवश्यक आहे .निसर्गविना जीवन आपण जगूच शकत नाही.निसर्ग देत राहतो.पा मानव आपल्या खालची, अंहमपणाच्या विळख्यात अडकून जीवन जगण्यातला आनंद घेत नाही.
या संग्राहातील थायलंडची तुळस,पंचमवेद,इगत,रतीब,शूटिंग, प्रवास, सावली, पेन्शन,स्थलांतर ,निवडणूक, सत्कार,निर्णय या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत.कथेत जागोजागी अनेक ग्रामीण भाषेतील शब्द जे शब्द लोप पावत चालले आहेत त्याचा वापरानेच कथेला आगळी साज चढली आहे.
फक्त पहिली कथा तीन पात्रात असून ती तीनही पात्रे एकसंघ न वाटता अलग अलग वाटतात.कथासुत्र चांगला असून कोठतरी चुकल्याचा भास होतो.बाकीच्या सर्वच कथा अप्रतिम आहेत.
उलघाल कथासंग्रह साहित्याक्षर या प्रकाशन संस्थेच्या सौ.क्रांती देविदास राऊत,जनतानगर,संगमनेर,जिअहमदनगर येथून प्रकाशित केला आहे.मुखपृष्ठ सरदार यांनी उलघाल कथासंग्रहास शोभेल असे चित्र काढले आहे.आतील रेखाचित्रे अप्रतिम आहेत.प्रत्येक कथेच्या शीर्षकानंतर कथासंग्रहाचे नावाचा उल्लेख केला आहे कारण पुस्तक वेगळे झाले तरी कोणता कथासंग्रह आहे हे नक्कीच वाचकाच्या लक्षात यावे हाच उद्देश असावा असे वाटते.मलपृष्ठावर मा.वसंत केशव पाटील सरांची पाठराखन फारच समर्पक व कमी शब्दात कथासंग्रहाचा मागोवा घेतला आहे .मनोगतात प्रा.यशवंत माळी सरांनी विस्ताराने साहित्याचा प्रवास वाचकासाठी दिला आहे ही या कथासंग्रहाची जमेची बाजू आहे.तसेच अर्पणपत्रिकेत आपल्या गुरुप्रती आस्था व आदर व्यक्त करत सर,लिहिताना ‘माझ्या प्रत्येक वाचकाला फक्त. साहित्यिक चर्चा करणारे माझ्या सर्व कथांचे पहिले वाचक माझे मित्र आदरणीय कै.रामचंद्र कोरे (गुरुजी) यांना अर्पण करुन आपले साहित्यिक जडणघडणाची साक्षीदारास श्रेय देतात.स्वागत मुल्य २५०रुपये मात्र असून १५ आँगष्ट २०२२ ला प्रकाशित केला आहे. आपल्या संग्रही असावा असा हा काव्य संग्रह आहे.
कथासंग्रहाचे नाव : उलघाल
लेखक. : प्रा.यशवंत माळी
मोरगाव
मो. : ९३ ७२ ३९ २३ ७७.
मुखपृष्ठ. : सरदार
प्रकाशक. : साहित्याक्षर
सौ.क्रांती देविदास राऊत,जनतानगर, जि.अहमदनगर.
प्रथमावृत्ती : १५ /०८/२०२२२.
स्वागतमुल्य. : २५० रुपये.
आस्वादक*
-मुबारक उमराणी
सांगली,
मो.९७६६०८१०९७
(शब्दसंख्या १२१४)