‘टोपीवाला’ हे नाव मुंबईत विशेषत: गिरगाव, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, मुलुंड आदी परिसरातील रहिवाशांना चांगलेच परिचि त आहे. टोपीवाला ले धन, टोपीवाला थिएटर, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, टोपीवाला कॉलेज ही मुंबई शहर आणि उपनगरातील काही नावाजलेली ठिकाणे. हे टोपीवाला म्हणजे कोणी पारशी किंवा गुजराथी उद्योगपती असतील आणि त्यांच्या दातृत्वामुळे मुंबईत काही संस्थांना मदत मिळाली असेल असा सर्वसाधारण समज रुढ आहे. मात्र कोकणभूमीत जन्मलेली अनंत शिवाजी देसाई उर्फ टोपीवाले देसाई उर्फ टोपीवाला ही ती कर्तृत्ववान व्यक्ती.
त्यांचे शिक्षण जेमतेम तिसऱ्या इयत्तेपर्यंत झाले. घरच्या गरिबीने त्यांना मुंबईचा रस्ता दाखविला. पैसे नसल्यामुळे त्यांनी शिडाच्या जहाजातून मुंबईचा पल्ला गाठला. मुंबईत आल्यावर अनेक प्रकारचे शारीरिक कष्ट करत त्यांनी आपल्याकडील कल्पकतेने अनेक उद्योग केले आणि शेवटी टोप्या बनविण्याच्या व्यवसायात असा जम बसवला की, मुंबईकर त्यांना ‘टोपीवाले देसाई’ म्हणूनच ओळखू लागले. १८ ऑक्टोबर १८५३ ला मालवणच्या जवळ वालावल गावात देसाई कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत देसाईंना तत्कालीन ब्रिटिश सरकारने ‘रावबहादूर’ हि पदवी बहाल केली होती.