
नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह
व्यक्तीच्या अवतीभवती बऱ्याच बरेवाईट घटना घडत असतात. त्यातून त्याची जडणघडण होते. परिणामी एक विशिष्ट व्यक्तिमत्व घडत जाते. संवेदनशील व्यक्तीच्या मनावर अशा घटना परिणाम करतात. आलेले अनुभव अशा संवेदनशील व्यक्तीला शांत बसू देत नाही. परिणामी आपल्या अनुभवांचा उपयोग होऊन समाजाला दिशा मिळावी, पुढील पिढ्याना आपल्या अनुभवाचा उपयोग व्हावा, यासाठी धडपड सुरु होते. यातूनच लेखक संदीप राक्षे यांच्या ‘नि मि त्त मा त्र’ कथासंग्रहाचा जन्म झाला असावा. असे मला वाटते.
बुधवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव येथे आयोजित संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला चाकूरकर, हास्यकवी संजय कावरे यांचे शुभहस्ते तसेच यावेळी सन्मानित होणारे ‘ज्ञानरत्न पुरस्कार’ प्राप्त साहित्यिक तसेच प्रमुख पाहुणे भानुदास महाराज कोल्हापूरकर, लेखक संजय गोराडे, उद्योजक सागर शिंदे, कवी ज्ञानेश्वर शिळवणे, कामगार नेते रवींद्र शिंदे, आर्किटेक्ट महेश साळुंके, शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर, उद्योगपती मोहन लबडे, भजन सम्राट सदानंद मगर, शिल्पकार स्वाती साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील ‘परिस पब्लिकेशन्स’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करत आहे. तर लोककवी विजय पोहनेरकर, कवयित्री अलका बोर्डे, चित्रकार अरविंद शेलार, उद्योजक प्रकाश चव्हाण हे या सोहळ्याचे आयोजक आहेत. विशेष म्हणजे हा सोहळा संत ज्ञानोबारायांच्या जन्मभूमीवर, त्यांच्या पवित्र मंदिरात पार पडत आहे.
आपल्या जीवन काळात समाजात वावरत असताना अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या भेटीगाठी होतात, सहजच एकमेकांशी संवाद साधला जातो. विचारांची व अनुभवांची देवाणघेवाण होते, यातून व्यक्तीला आलेल्या अनुभवांचे/ विचारांच्या शिदोरीचे संचयन होत राहते. काही अनुभव इतके प्रभावी असतात की ते ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनात घर करून राहतात. पर्यायाने ते आलेले अनुभव व भेटलेल्या प्रभावी व्यक्तींची माहिती इतरांना गरजेनुरूप कथन करावीशी वाटते. कधी कधी ही साखळी इतकी मोठी असू शकते की असे अनुभव कथा बनून जातात. यातूनच या कथांचा उदय झाला असावा. हे नक्की… एका विशिष्ट स्थळ काळी पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे वास्तवदर्शी चित्रण म्हणजे कथा होय. हे आपणास विदित आहेच.
साहित्याला समाजाचा आरसा समजले जाते. साहित्य वाचल्याने वाचकांचे भावविश्व संपन्न होण्यास मदतच होते. वाचकांना येणाऱ्या अनुभवांचे कथन साहित्यात वाचावयास मिळत असल्याने वाचकाला असे साहित्य वाचताना स्वर्गीय आनंद तर मिळतोच व मनोरंजनही होते. परिणामी वाचक वाचण्यात गुंग होऊन जातो. असाच अनुभव मला या कथासंग्रहातील सर्वच कथा वाचताना आला.
“व्यक्तीच्या जीवनात निमित्त या शब्दाला बरेच महत्व असते. हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकायला वा वाचायला मिळतो. अनेकदा आपण एखादी गोष्ट करण्याचा विचार मनाशी बाळगतो, पण ती प्रत्यक्षात उतरते ती एखाद्या प्रसंगामुळे, एखाद्या क्षणामुळे किंवा एखाद्या छोट्या धाग्यामुळे ज्याला आपण निमित्त म्हणतो. हाच धागा पुढे कथा, कविता, प्रवासवर्णन, साहित्य अशा सर्जनशीलतेच्या रुपात उलगडत जातो. माझ्या बाबतीतही असंच झालं… माणसांच्या कहाण्या, समाजातील विसंगती, दुख, चढउतार यांनी माझं मन हलवलं. आणि या सर्वातूनच कथा लिहण्याची प्रेरणा उमलली.” असे स्पष्ट स्पष्टीकरण लेखकाने प्रांजळपणे आपल्या मनोगतात मांडले असल्याने वाचकाला कथा वाचायला व समजून घ्यायला अडचण येत नाही.
‘कुणीतरी कुणाच्या तरी जीवनात येतं आणि जीवन बदलून जातं,’ हेच मुळ आशयसूत्र या कथांमध्ये दडलेलं आहे. ध्येयवेड्या व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे ‘नि मि त्त मा त्र’ या कथासंग्रहातील कथा होय. या व्यक्तिरेखा लेखकाला आपल्या जीवनात कधीतरी भेटल्या, त्यांचे कार्य व कर्तुत्वाने लेखक भारावून गेल्याने हे सारं समाजाला उपयुक्त ठरू शकेल, असे वाटल्याने लेखनाने कथारूपाने वाचकांच्या समोर या व्यक्तिरेखा मांडल्या. जीवनाचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या या कथा वाचताना आपणही असेच कुणाच्या जीवनात किंवा असेच कुणीतरी आपल्या जीवनात निमित्तमात्र आले व आपले जीवन बदलून गेले याची जाणीव करून देणाऱ्या या कथासंग्रहातील सर्वच कथा आहेत.
साहित्य हे केवळ लिखित शब्द नसून त्यात लेखकाने आपल्या अनुभवांच्या सहायाने भावविश्व उभे केलेले असते. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा एक वेगळा विषय घेऊन वाचकांना समृद्ध करतात. प्रत्येक कथेतील पात्रांचे एक वेगळे विश्व आहे. विशेष म्हणजे यातील सर्वच पात्रे आपल्या जवळचे, आपल्या अनुभव विश्वातले भासतात. काही पात्रांना मी स्वतः भेटलो आहे किंवा त्यांच्याशी मला संवाद साधण्याचे भाग्य लाभले आहे. त्यामुळे त्यांना मी ओळखतो आहे. उदा. विनोद भाऊ चौधरी. वानगीदाखल काही कथा पाहू,
पहिल्याच ‘नि मि त्त मा त्र’ या शीर्षक कथेत सुरवातीलाच “गावातील जुना वाडा” हे वाक्य लक्ष वेधून घेत वाचन सुरु होते. लेखक स्वतः नायकाच्या रूपाने संवाद साधत असल्याने, ते स्वतः जसे आहे तसे ‘सेम टू सेम’ (वाचकांना) भेटतात. या कथेतून या कथासंग्रहातील सर्व कथांचा आशय विषय स्पष्ट होतो. आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्य पर्यंतचा प्रवास, या प्रवासात अनेक व्यक्ती भेटतात. काही सोबत राहतात तर काहींची साथ सुटते. यातून काही बिघडतात तर काही घडतात. तथापि, या प्रक्रियेत आपण निमित्तमात्र असतो, हे नक्की… जीवन प्रवास मात्र निरंतर सुरु राहतो !
‘स्वप्नांची बीजे’ या कथेत विनोदची दुर्दम्य इच्छाशक्ती वाचकांना प्रेरित करते. साध्या गावातील मुलगा स्वप्न पाहतो आणि आयुष्य उजेडमय करतो. पॉलिस्टर यार्न उत्पादनापासून सुरु केलेला उद्योगाचे पुढे शाळा, महाविद्यालयं, तंत्रशिक्षण संस्था, सौर उर्जा, पवन उर्जा वीज प्रकल्प, खाद्यप्रक्रिया उद्योग, विमान वाहतूक क्षेत्र अशा वेगवेगळ्या उद्योगरुपी वटवृक्षात रुपांतर होते. भावी तरुण पिढीला हे निच्छितच प्रेरक व मार्गदर्शक आहे.
‘विज्ञानाचे सृजन- ज्ञानेश्वरी’ या कथेत विज्ञान व अध्यात्माची सांगड घातलेली दिसून येते. ज्ञानेश्वरी केवळ भक्ती ग्रंथ नसून विश्वातील गुप्त उर्जेचे शास्त्रीय कोडे आहे. याची उकल वाचताना होत जाते.
‘नवस्वराज्य’ कथेत जातीपाती पेक्षा शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार यांचं महत्व सुधीरच्या व्यक्तिरेखेतून साकारलेलं आहे. ‘कर्मातला ईश्वर’ या कथेत कर्म व श्रद्धा दोन्ही महत्वाचे असतात. हे समजते. ‘देवदासी’ या कथेत रंगुच्या व्यक्तीरेखेद्वारे देवदासी या वाईट प्रथेवर लेखकाने आसूड ओढला आहे. कथा वाचता वाचता अंतर्मुख होऊन जायला वेळ लागत नाही. ‘हिरवी प्रतिज्ञा’ कथेतील पर्यावरणाचे महत्व भावी पिढ्यांसाठी दिशादायी आहे. ‘आर्त हाक मुलींची’ कथेत कन्याचं नव्हे तर कन्या बचाव अभियान किती महत्वाचे आहे?, हे समजते. ‘हरिपाठाची दिव्यशक्ती’ तून उमजते कि, हरिपाठ केवळ मंत्राचा पाठ नसून आत्म्याशी जोडणारा बंध, जीवन जगण्याचा दिव्य मार्ग आहे. ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’मधून आजच्या व्यावसायिक पत्रकारीतेच्या युगात अन्यायाचा पराभव करण्यासाठी लेखणी खरी तलवार आहे. हे उमगते. हीच आशय श्रुखला शेवटच्या कथेपर्यंत टिकवून ठेवण्यास लेखक यशस्वी झाल्याचे वाचताना आपल्या सहज लक्षात येते.
‘भ्रष्ट यंत्रणा’ या कथेत महाराष्ट्रातील सद्यस्थितीचे वर्णन केले असून कुणीतरी देवदूत येईल आणि ही भ्रष्ट यंत्रणा उलथून टाकील, हा आशावाद लेखक उराशी बाळगून असल्याचे जाणवते. खरोखर ही यंत्रणा म्हणजे मोठी कीड आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०१४ साली अधिव्याख्याता-इंग्रजी, शासकीय तंत्रनिकेतन, म.तं.शि.सेवा, गट-अ या पदी माझी स्वतःची निवड झाली असून मी सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहे. आजवर ना इथले प्रशासन ना नियुक्ती देऊ शकले ना इथली न्यायव्यवस्था न्याय…
प्रभावी संवादातून तसेच काव्यात्मक पेरणीतून विषयांची विविधता लेखकाने लीलया हाताळली आहे. तृतीय-पुरुषी कथन या कथासंग्रहातील बलस्थान म्हणता येईल. उत्तम कथानक, साधी, सोपी मात्र काळजाला भिडणारी, वाचताना सहज समजणारी भाषाशैली तसेच आपल्या परिचयाचे आपलेच वाटणारे पात्र, स्थळ, काळ यामुळे या कथा आपल्याच वाटल्या शिवाय राहत नाही.
अध्यात्म, विज्ञान, सामाजिक रूढी परंपरा, जिद्द, संघर्ष, सहकार, एकात्मता, निसर्ग, राजकारण, मानवी मनोवृत्ती यांसह बदलत्या समाजातील वास्तव मांडत, अंतर्मनाचा शोध घेत तसेच श्रद्धा, निसर्ग, पर्यावरणाचे महत्व, समाजकारण अशा सर्वच विषयांना या कथा सहजच हात घालत वाचकांचे मनोरंजनासह समाज प्रबोधन करत अनेक स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाबी या कथांमधून पानोपानी नजरेस पडतात.
समाजाचं वास्तवदर्शी चित्रण या कथांमध्ये असल्याने असे लिखाण वाचकांना भावते हे नक्की. साहित्य क्षेत्रात लेखक संदीप राक्षे यांचे यापूर्वी वारसा शिल्पकलेचा, हेमलकसा एक रोमहर्षक सफर, लेण्यांचा महाराष्ट्र व भटकंती इत्यादी पुस्तके प्रकशित झालेली आहेत. विविध प्रकारच्या कथांनी हा संग्रह बहरलेला असून पुन:पुन्हा वाचाव्या अशा या कथा आहेत.
शब्दांच्या उगमस्थानाला, आयुष्याच्या मूळ गाभाऱ्याला, श्वासामागील सामर्थ्याला अर्थात त्यांची आई मुक्ताबाई राक्षे यांना त्यांनी ही त्यांची साहित्यकृती अर्पण केली असून लेखक संजय द. गोराडे यांची प्रस्तावना तसेच लेखक, समीक्षक, चित्रकार असलेले सचिन देवकाते यांची शुभेच्छा, हे या कथासंग्रहाचे विशेष आकर्षण आहेत. याचबरोबर साहित्य विश्वात मोठे नाव असलेले, चित्रकार अरविंद शेलार यांनी त्यांच्या अफाट व सखोल कल्पकतेने ‘निमित्तमात्र’ या कथासंग्रहाचं मुखपृष्ठ साकारलेलं असून या मुखपृष्ठावर आध्यात्मिक दृष्टीचा आभास देणारा संत ज्ञानोबारायांचा गोपीचंदन टिळा तसेच भक्तिभावाने उभे संतश्रेष्ठ तुकोबाराय यांचे दोन्ही हात वर, जणू दैवी शक्तीला अर्पण करताना. त्यांच्या देहातली ती आनंदमग्न मुद्रा आणि पार्श्वभूमीतील रंगांची लय सांगते “मी काही करीत नाही, करतो ते श्रीविठ्ठल! मी फक्त ‘निमित्तमात्र”, हे असं सारं वाचकाला पाने पालटून कथा वाचायला प्रेरित करते.
या कथासंग्रहात निमित्तमात्र, स्वप्नांची बीजे, विज्ञानाचे सृजन- ज्ञानेश्वरी, नवस्वराज्य, कर्मातला ईश्वर, देवदासी, हिरवी प्रतिज्ञा, आर्त हाक मुलींची, हरिपाठाची दिव्यशक्ती, लोकशाहीचा चौथा स्तंभ, भ्रष्ट यंत्रणा, आजाराचा बाजार, नको नको मना, ब्रम्हांड ऐकते मनाची हाक, सह्याद्रीचं रत्न, साहित्य सोनियाची खाणी, यशस्वी अभिनेता, गानोबाची देवराई, अरण्यऋषींचा वारसदार, धगधगते नेपाळ, न लगती सायास, इनाबाची पाऊलवाट, सोयीचे नाते, नीतिमंत श्रीमंत, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, समस्येत अडकलेलं गाव, स्टेट्सने दुभंगलेली नाती अशा एकूण सत्तावीस वाचनीय कथा वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
वाचकांनी हा कथासंग्रह आवश्यक वाचावा हा आग्रह तसेच लेखक सन्माननीय संदीप राक्षे यांना पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
आस्वादक: सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९
पुस्तकाचे नाव :- नि मि त्त मा त्र (कथासंग्रह)
ISBN :- 978-81-991734-1-5
लेखक :- संदीप राक्षे, संपर्क. : ८६५७४२१४२१/ ९८५०२१७८४४
प्रस्तावना :- लेखक संजय द. गोराडे
शुभेच्छा :- लेखक, समीक्षक, चित्रकार सचिन देवकाते
प्रकाशक :- परिस पब्लिकेशन्स, सासवड, ता- पुरंदर, जि- पुणे
मुखपृष्ठ :- चित्रकार अरविंद शेलार
स्वागत मूल्य :- ₹ ४००/- मात्र (सवलत मूल्य व टपालखर्च यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा)
आस्वादक: सोमनाथ आवडाजी पगार (सॅप), नाशिक
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संवाद:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com
चित्रपट गीतकार/ कवी, लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट (Engineer), इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ट्रान्सलेटर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.