कवी संदीप राठोड यांना राष्ट्रीय गोर बंजारारत्न पुरस्कार जाहीर
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : निघोज येथील ‘भूक छळतेकार’ युवा कवी संदीप राठोड यांना डॉ. रामराव महाराज बंजारा समाजातर्फे संत डॉ. रामराव महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय गोर बंजारारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना नुकतेच पुरस्कार निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे.
‘भूक छळते तेव्हा’ कवितासंग्रहाच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांच्या ज्वलंत प्रश्नांना जगासमोर मांडणारे कवी संदीप राठोड यांच्या साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक स्तरावरील विविध उल्लेखणीय कार्याची दखल घेऊन बंजारा समाज विकास फेडरेशनने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक सौ. अर्चना राठोड यांनी पुरस्काराची घोषणा केली आहे.
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाणारे पोहरादेवी ता. मानोरा, जिल्हा वाशिम येथे 11 जानेवारी रोजी सदर पुरस्कार वितरण सोहळा धर्मगुरु बाबुसिंगजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून राज्याचे जलसंधाण मंत्री संजय राठोड, कर्नाटकातील खासदार कुलबुर्गी उमेश राठोड, माजी खासदार हरीभाऊ राठोड, आमदार इंद्रनिल नाईक, हरियाणातील माजी आमदार कुलवंत बाजीगर, पोहरादेवी महंत कबीरदास महाराज, महंत यशवंत महाराज, महंत सुनिल महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरबंजारारत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कवी संदीप राठोड हे काव्य लेखनासोबतच शिक्षण संस्था स्थापन करून विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहेत. आधुनिक जगातही मुलांनी संस्काराच्या वाटेवरून चालावे यासाठी विविध साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रम ते सतत राबवत असतात. भटक्या विमुक्तांच्या संघर्षावर भाष्य करणारा, गतवर्षी प्रकाशित झालेला त्यांचा ‘भूक छळते तेव्हा’ कवितासंग्रहाला वर्षभरात विविध सात राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राठोड यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
आज खऱ्या अर्थाने आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. आपण आत्तापर्यंत एकनिष्ठेने केलेल्या कार्याची दखल जेव्हा आपला समाज घेतो अन् समाजातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानासाठी आपली निवड होते याचा आनंद शब्दांकित करता येणे खूपच अवघड आहे असे प्रतिपादन कवी संदीप राठोड यांनी केले.