Sunday, November 9

मटण खाल्लं पण उधारी गिळली! कोल्हापूरच्या दुकानदाराची भन्नाट उधारी वसुली शक्कल!

कोल्हापूर बहिरेश्वर गावातील मटण विक्रेत्याचा उधारी वसूलीसाठी लावलेला डिजिटल बोर्ड

कोल्हापूर : “मटण खाल्लं पण उधारी गिळली!” हे वाक्य सध्या कोल्हापूर जिल्ह्यात अक्षरशः हेडलाईन बनलं आहे. बहिरेश्वर गावातील चिकन-मटण विक्रेता सदल्या काशिद यांनी उधारी वसुलीसाठी घेतलेली हटके शक्कल आता चर्चेचा विषय ठरली आहे.

ग्राहकांकडून उधारी वसूल होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या सदल्या काशिद यांनी थेट गावाच्या चौकात डिजिटल बोर्ड लावून सर्वांना इशारा दिला आहे. या बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे —

“उधारी लवकरात लवकर जमा करा, अन्यथा दिवाळीमध्ये उधारीवाल्यांची नावं बोर्डवर झळकतील!”

या इशाऱ्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. ज्यांनी कधी ‘फक्त थोडीशी उधारी’ केली होती, त्यांनाही आता आपलं नाव बोर्डावर येईल की काय, अशी धास्ती वाटू लागली आहे.

कोल्हापूर हा रस्सा आणि मटणासाठी प्रसिद्ध जिल्हा. पण आता इथं मटणाबरोबर हिशोबाचाही रस्सा रंगात आला आहे! सदल्या काशिद यांनी लिहिलं आहे —

“तुमची उधारी किती आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्याशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर रक्कम जमा करा.”त्यांच्या या कल्पक प्रयोगाची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. सोशल मीडियावर या बोर्डचे फोटो आणि व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत असून लोक म्हणत आहेत —


“हा माणूस खरंच भन्नाट आहे, उधारी वसुलीचं भन्नाट शस्त्र सापडलंय!”काही जणांनी तर या पद्धतीचं कौतुक करत म्हटलं आहे की, “अशीच पद्धत सर्व किराणा आणि मटण विक्रेत्यांनी लावली, तर उधारीचं साम्राज्य संपेल!”

सदल्या काशिद यांचा हा हटके इशारा आता केवळ गावापुरता न राहता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. काहींना तो विनोदी वाटतो, तर काहींना तो ‘हिशोबाचा धडा’ शिकवणारा वाटतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.