महात्मा फुले – जागतिक किर्तीचे समाज क्रांतिकारक
महात्मा जोतीराव फुले हे जागतिक कीर्तीचे समाजक्रांतिकारक,विचारवंत,दार्शनिक,लेखक आणि वयाच्या २१ व्या वर्षी १८४८ साली भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळेची सुरुवात करणारे शिक्षण महर्षि होते. कामगार नेते, स्री-अस्पृश्यता मुक्तीचे प्रणेते, कृषीतज्ञ, अर्थतज्ञ, उद्योगपती, अभियंता, आद्यमराठी नाटककार, कवी,शाहीर, साहित्यिक, शिवचरित्रकार,इतिहास संशोधक,प्रकाशक,सत्यशोधक समाज व सार्वजनिक सत्यधर्म संस्थापक,सामाजिक क्रांतीचे उद्गाते आणि रागडावर शिवरायांची समाधी शोधून प्रथम शिवजयंती साजरी करणारे शिवरायांचे वैचारिक वारसदार…इ. कितीतरी उपाद्या आणि वेगवेगळे विशेषण लावून ज्यांचे कार्य वर्णना करता येईल असे बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच क्रांतिसूर्य महात्मा फुले.त्यांनी जेव्हा शैक्षणिक चळवळ सुरू केली तेव्हा भारतात साक्षरांची संख्या अवघे अडीच टक्के होती. आजही एवढी वर्षे झाली पण शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट काही पूर्ण झालेले नाही. १८९२ मध्ये हंटर शिक्षण आयोगापुढे त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वत्रिक आणि सक्तीचे करण्याची मागणी केली होती. स्त्री शिक्षणाबद्दल बोलताना त्यांनी १५ सप्टेंबर १८५३ च्या मुलाखतीत ‘ज्ञानोदय’ला सांगितले होते, “आईच्या योगाने मुलांची जी सुधारणूक होते, ती फारच चांगली असते. जोतिराव आणि सावित्रीबाई हे दोघेही पूर्णवेळ आणि विनावेतन शाळांमध्ये काम करीत असत. जोतिरावांचा आग्रह होता, की सर्व मुला-मुलींना शेती आणि उद्योगाचे शिक्षण सक्तीचे असले पाहिजे. ‘औद्योगिक विभाग हा शाळेला संलग्न असायला हवा. त्यामुळे मुले उपयुक्त ‘ट्रेड’ आणि ‘क्राफ्ट’ शिकतील आणि नंतर स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, त्यांचा हा विचार आजही उपयुक्त आहे.
शेतकऱ्याचा आसूड व अन्य लेखनातून फुलेंनी शेतकऱ्याच्या समस्या व त्यावरील उपाय यांचे सखोल व पोटतिडकीने विवेचन केले आहे. थॉमस पेन यांच्या मानवी हक्कावर आधारित पुस्तक वाचल्यानंतर ते प्रभावित झाले. या पुस्तकाचा त्यांच्या पुढील आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला.१८७३ साली ‘गुलामगिरी’ हे प्रस्थापित व्यवस्थेवर मार्मिक भाष्य करणारे,जळजळीत वास्तव मांडून वर्णव्यवस्थेला नेस्तनाबूत करणारे विचार मांडले. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी होमरचे प्रसिद्ध वाक्य वापरले होते. “ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो.त्या दिवशी त्याचे अर्धे सद्गुण हिरावले जातात” त्यांनी हे अत्यंत पुराव्यानिशी व चिकित्सक पद्धतीने धार्मिक गुलामगिरी ही घातक असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांच्या काळात मानववंशशास्र किंवा पुराणवस्तूशास्र इतके प्रगत नव्हते परंतु तर्काने केलेली त्यांची मांडणी इतिहासाच्या कसोटीवर आज खरी उतरली.यावरूनच त्यांची दुरदृष्टी आणि प्रचंड सामाजिक अभ्यास दिसून येतो. यांनी आपल्या जीवनकाळात शिक्षणाला पराकोटीचे महत्व दिले होते. साहजिकच त्या ध्ययाने प्रेरित होऊन त्यांनी साहित्याचे वेगवेगळे प्रकार हाताळले. त्यातूनच तृतीय रत्न हे नाटक, शिवरायांवरील एक हजार ओळींचा पोवाडा लिहिला. ब्राम्हणाचे कसब, गुलामगिरी,शेतकर्यांचा आसूड, इशारा,दीनबंधु (मुखपत्र) आणि अभंगाच्या धर्तीवर त्यांनी अखंड रचले.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
राजर्षी शाहू महाराजांनी फुले यांच्या कार्याची महत्ती ओळखून त्यांना ‘महराष्ट्राचा मार्टिन लुथर’ असे संबोधले होते. तर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी ‘हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन’ म्हणून गौरवद्गार काढले होते. जेष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे महात्मा फुले या गौरव ग्रंथात म्हणतात…”गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्मात जे एक सूत्र आहे.तेच सूत्र फुल्यांना गुरु मानून त्याच्याकडून प्रेरणा घेणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या Annihilation of cast आणि The Budhha and his Dhamma या दोन ग्रंथात आहे. यातील समान सूत्र म्हणजे सामाजिक क्रांती” फुले यांनी अभ्यासाअंती काही निरिक्षणे नोंदवले होते. आजपर्यंत लिहिलेले सगळ्याचे सगळे धर्मग्रंथ किंवा ईश्वराच्या नावावर बनावट लिहलेले ग्रंथ अज्ञानी,शुद्र यांना लुटून त्यांचे शोषण करणारी मांडणी करतात. एकाही ग्रंथात आरंभापासून ते शेवटपर्यंत सारखे सार्वजनिक सत्यधर्म असलेले नाही. असे त्यांचे स्पष्ट आणि परखड मत होते. काही लबाड मानसं लोकवर्गणीतून पैसा जमा करून तो धर्माच्या नावावर,मंदिराच्या नावावर खर्च करतात पण त्यामागे त्यांचाच स्वार्थ दडलेला असतो.यासाठी फुले खूपच चपखल उदाहरण देतात. ईश्वराच्या बाबतीत पोकळ नामस्मरण व्यर्थ असून जसे कि,अनुष्ठानाने पर्जन्य आणि नवसाने अपत्य इ. प्राप्त होते हे परंपरागत मान्य असलेले मिथक त्यांनी नाकारले आणि त्यावरही परखड भाष्य केले…
जातीमारवाडी गरीबा नाडिती | देऊळ बांधिती | कीर्तीसाठी
देवाजीच्या नावे जगाला पीडिती | अधोगती जाती | निश्चयाने
जप अनुष्ठाने पाऊस पाडिती | आर्य का मरती | जळावीण ?
जप अनुष्ठाने स्रिया मुले होती | दुजा का करिती | मुलांसाठी ?
फुलेंचा ईश्वर हा मानवाचा अंतर्भाव असलेल्या सर्व प्राण्यांसह अखंड विश्वाचा निर्माता आहे. सत्य हाच ईश आणि सर्व माणसे एकाच देवाची लेकरे आहेत.देव त्यांचा आईबाप म्हणजेच आई आणि बाप दोन्हीहि असतो…खरी हीच नीती मानवाचा धर्म | बाकीचे अधर्म | जोती म्हणे
संत तुकाराम म्हणतात…”जगाच्या काल्याना संताची विभूती | देह कष्ठविती परोपकारी” थोडा विचार केला तर त्याचा प्रत्यय आपल्याला अगदी सहज येतो…संत नामदेव यांना संत तुकाराम गुरुस्थानी मानायचे तर छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकारामांना गुरु मानायचे आणि महात्मा फुले हे छत्रपती शिवरायांना गुरु मानायचे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फुलेंना गुरु मानायचे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे गुरूच मानायचे म्हणजेच भलेही ते वेगवेगळ्या स्थानी, वेगवेगळ्या जाती-धर्मात जन्माला आले असतील परंतु निस्वार्थ,निरपेक्ष आणि विश्वशांती करिता आणि समता प्रस्थापित करण्यासाठी सम्यक विचारांचा एक समान धागा हेच त्यांचे मूळ राहिले आहे. संत आणि समाज सुधारक हे सामाजासाठी आपला देह झिजवतात,देशभक्त आपल्या प्राणाची आहुती देतात…कुणी कीर्तनातून ज्ञानाचा दीप लावला.कुणी अभंगातून शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.कुणी कृतीतून-त्यागातून समाज आणि राष्ट्र उभारणीचे काम केले.फुले सारख्यांनी शिक्षणाच्या अभावाने बहुजन समाजाची अधोगती झाल्याचे वास्तव मांडले. डॉ.बाबासाहेबांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध असल्याचे सांगितले तर दीड दिवस शाळेत जाऊन रशियापर्यंत शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे इ. महापुरुषांनी आपल्या समोर आदर्शाचा दीपस्तंभ उभा केला.
मानवांचे साठी बहु धर्म कसे | झाला का हो पिसे | जोती म्हणे
मानवांचे धर्म नसावे अनेक | निर्मिक तो एक | जोती म्हणे
फुले यांचे सर्वसमावेशक कार्य आणि त्यांनी विषमतेवरती आधारलेल्या वर्ण व्यवस्थेवर केलेला जोरदार प्रहार प्रस्थापितांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला म्हणून त्यांना जीवघेण्या संकटाना तोंड द्यावे लागले. परंतु ते डगमगले नाहीच पण अधिक ताकदीने सामाजिक प्रबोधन,अस्पृश्यता व जातिव्यवस्था निर्मुलनाचे कार्य अखंडपणे करत राहिले. सत्यशोधक समाजाची स्थापना करून प्रागतिक विचाराचा समाज घडवण्यासाठी प्रचंड धडपड केली. ‘सर्वसाक्षी जगत्पती | त्याला नकोच मध्यस्थी’ या घोष वाक्या प्रमाणे त्यांनी विचारांना कृतीची जोड देऊन वाटचाल करून अतिशय मोठा वैचारिक वारसा निर्माण केला. आजही त्यांचे विचार तितकेच वस्ताववादी ठरतात.आपण खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांनी सांगितलेल्या विचारांना, तत्वज्ञानाला स्वीकारले,अंगिकारले तरच त्यांना अपेक्षित असलेला आधुनिक समाज निर्माण होईल आणि हेच त्यांच्या विषयी कृतज्ञता पूर्वक अभिवादन ठरेल…!
– रमेश काकासाहेब शिंदे,
छत्रपती संभाजीनगर.
मो.९४२२९७०८९६