आपला जन्म हा मानव कल्याणासाठीच हा विचार रुजविणारे – महात्मा ज्योतिराव फुले
ज्योतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी कटगुण, सातारा जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे चिमणाबाई होते. त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे होते. त्यांचे फुले पुरविण्याचे काम असल्यामुळे त्यांना लोकं फुले म्हणून ओळखू लागले. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती. अँटोनिमा ग्राम्सी या प्रसिद्ध तत्ववेत्याने महात्मा फुले याना “सेंद्रिय बुद्धिवंत” असे संबोधले होते. त्यांचा शाळेत शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिक होता.
ज्योतिराव मुळात एक उद्योगपती होते. ते पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्ट कंपनीचे कार्यकारी संचालक होते. ही कंपनी बांधकाम आणि व्यापारी क्षेत्रात कार्यरत होती. पुणे-नगर रस्त्यावरील येरवड्याच्या (बंड गार्डन) पूल बांधण्याचा १८६९ सालच्या कामाचे उपकंत्राट त्यांच्या या कंपनीला मिळालेले होते. १०० वर्षे मुदतीचा हा पूल आज १४१ वर्षांनंतरही मजबूत आहे.
सामान्य माणूस आणि महामानव यांच्या विचारात खरोखर खूपच तफावत असते असे त्यांना अभ्यासल्या नंतर आपल्या लक्षात येते. सामान्य माणूस जन्म घेणार, शिक्षण घेणार, नौकरी किंवा एखादा उद्योग करणार व आपल्या कुटुंबाचा विचार करून कुटुंबाचे पालनपोषण करणार. बस झाले सामान्य माणसाचे जीवन आणि विचार. परंतु महामानवाचे तसं नसतं ते काही तरी वेगळा विचार करणार.
आता महात्मा ज्योतिबा फुल्यांचे बघा ना भरपूर शिक्षण घेतलेले, तल्लख बुद्धिमत्ता असलेले व श्रीमंत असलेले. एखाद्या सामान्य माणसाने विचार केला असता आपले कुटुंब धनसंपन्न आहे, आपल्याला आता काही करायची गरज नाही. चांगले ऐषोआरामात जीवन जगात येईल. पण नाही आपल्या सोबत समाजात गरीब, दीनदलित व निरक्षर लोक राहतात, त्यांना सुद्धा ही संधी मिळाली पाहिजे हा ज्योतिबा फुल्यांचा विचार. कुठून येत असतील हो असे विचार? असे आपण आपल्या रोजच्या जीवनात वॉचमन पासून, सफाई कर्मचारी, भिकारी, कष्टकरी, मोलकरणी आपण रोज बघतो. पण आपल्याला हांच्या बद्दल कधीही मनात विचार शिवत सुद्धा नाही.
सध्याचे जीवन आपले खूपच धकाधकीचे आहे. तसेच आपण खूपच स्वार्थी सुद्धा आहोत. आपली अजिबात मदत करण्याची इच्छा होत नाही. परंतु दुर्बल घटकाला आपण मदत केली पाहिजे हा विचार मनात सुद्धा येत नाही. मी, माझे आणि मलाच पाहिजे हेच विचार मनात शिवत असतात. कसे विचार आले असतील हो ह्या महामानवाच्या मनात? म्हणूनच ते महात्मा झाले ना.
आपले विचार हे रूढीपरंपरावादी असतात. आपण जी समाजाने चाकोरी बांधून दिली आहे त्याच्या बाहेर कधीही विचार करत नाही. महात्मा फुल्यांनी गोरगरिबांना शिक्षण मिळाले पाहिजे ह्यासाठी शाळा उघडल्या. हा किती मोठा क्रांतिकारी विचार. त्याकाळी स्त्रियांना शिक्षण घेणे वर्ज होते. परंतु स्त्रियांनी सुद्धा शिक्षण घेतले पाहिजे हा उदात्त विचार त्यांच्या मनात कसा आला असेल हो? हा एक विचार आला आणि आज स्त्रियांनी किती मोठी प्रगती केली, क्रांती केली. किती त्यांना विरोध झाला. किती अपमान झाला तरी पण त्यांनी माघार घेतली नाही. आज स्त्रिया शेती कामापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत पोहचलेल्या आहेत. हे केवळ आणि केवळ महात्मा ज्योतिबा फुले यांच्याच विचारांमुळेच शक्य झाले. किती मोठा त्याग केला स्त्री शिक्षणासाठी महात्मा फुल्यांनी. त्यांना कुटुंबाने, समाजाने नाकारले. परंतु हे एव्हढे सगळे करून सुद्धा आजच्या स्त्रियांना त्याची जाण नाही आहे आणि त्या जाणून घेण्याच्या भानगडीत सुद्धा पडत नाही आहेत.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
महात्मा फुल्यांचे खूप उपकार हे स्त्री जातीवर आहेत. परंतु खंत ही वाटते की स्त्रिया त्यांचे नाव सुद्धा स्मरत नाहीत. किती कष्टमय जीवन होते स्त्रियांचे आणि आज बघा किती सन्मानाने त्या जगत आहेत.
स्त्रिया विधवा झाल्यावर त्यांचे खूप हाल व्हायचे. सतीची पद्धत होती. केशकर्तन करावे लागायचे. स्त्रियांचे संपूर्ण सौंदर्य नष्ट व्हायचे, त्यांना घराच्या बाहेर पडता येत नसे. काही तरुण स्त्रिया विधवा झाल्यावर गरोदर राहायच्या. त्यांचे बाळंतपण करण्याचा व त्यांचे मुलं सांभाळण्याचा विचार महात्मा फुले दाम्पत्याच्या मनात आला आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. किती मोठा मौलिक विचार होता हा स्त्रियांच्या बाबतीत. आज स्त्रियांवर भरपूर अन्याय होतात. तेव्हा आपली मान ही शरमेने खाली गेल्या शिवाय राहत नाही. परंतु आज कुणालाही ह्याची काही पडली नाही. ह्याची सुद्धा फार खंत वाटते.
सामान्य माणूस हा मी शिक्षण घेतले बस झाले हा त्याचा विचार असतो. परंतु महात्मा फुलेंनी गोरगरिबांना शिक्षण मिळाले पाहिजे हा विचार रुजविला. कसा काय विचार येत असेल हो यांना? हा विचार आला आणि आज शिक्षणात क्रांती झाली. मध्यंतरी बरे चालू होते. गोरगरिबांना सरकारी शिक्षण मिळत होते. आता तर सरकारी शाळाच बंद होत आहेत. सरकारी शाळेच्या अवस्थांची फारच दैना आहे. महात्मा फुल्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि आज काय परिस्थिती आहे?
महात्मा फुल्यांचे विचार हे खरोखरच महान होते. ज्या धरणाचे काम सुरु होते, त्यासाठी त्यांना भ्रष्टाचाराची लालूच देण्यात आली होती. परंतु त्यांनी ती नाकारली आणि स्पष्ट सांगितले की मानवी जीवनासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही. बघा हा त्याकाळात त्यांचा विचार होता. भ्रष्ट्राचाराचा बिमोड करण्याचा तो विचार होता. परंतु आज पावलो पावली भ्रष्टाचार होतो आहे. तो अधिकारी काही मागो की न मागो, सामान्य नागरिकच त्याला म्हणतो, ‘साहेब काही असेल तर सांगा, तशी सोय करता येईल’. म्हणजे बघा किती भ्रष्ट्राचार रुजून शिष्टाचार झाला आहे.
महात्मा फुले हे एक आदर्श शिक्षक, साहित्यिक व समाजसुधारक होते. त्यांची खूप मोठी माहिती संपदा आहे. ती आपण सर्वांनी ग्रहण केली पाहिजे. त्यांचे विचार रुजविले पाहिजे.
जयंती म्हणजे पूजा, अर्चा, हार-तुरे नाही तर त्यांनी रुजविलेला विचार आपण आत्मसात करून तो समाजात रुजविला, तरच आपण खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुल्यांचे खरे वारसदार होऊ.
सगळ्यात मोठा गुण महात्मा ज्योतिबा फुल्यांकडून घेण्याचा आहे तो म्हणजे कितीही आपला अपमान झाला तरी आपण आपल्या चांगल्या विचारांपासून परावृत्त न होता, ना उम्मेद नाही झाले पाहिजे.
आजही महात्मा फुले यांचे विचार मानव जातीला आवश्यक व प्रेरक आहेत. त्यांनी जो विचार रुजविला की, ‘आपला जन्म हा आपल्यासाठीच नाही तर मानवकल्याणासाठी असला पाहिजे’ हे खरेच आहे.
महात्मा ज्योतिराव फुले हे फार निडर होते. त्यांचे लिखाण निर्भीड आणि समाजाला आरसा दाखविणारे होते. त्यांची नाटकं, पोवाडा, पुस्तकं, निबंध आणि अहवाल अशी २२ ग्रंथ संपदा होती. तर त्यांच्यावर ५० पेक्षा जास्त पुस्तके लिहिल्या गेली आहेत. आजच्या पत्रकारितेने त्यांच्या पासून बोध घेतला पाहिजे. आजच्या पत्रकारितेचा श्वास मोकळा नाही हे आपल्याला वारंवार जाणवते आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असून खुल्या मनाने व्यक्त होता येत नाही आहे. ह्यासाठी महात्मा फुल्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.
आजपर्यंत महात्मा फुल्यांवर ७ नाटके आणि चित्रपट प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या ह्या महान कार्याबद्दल लोकांनी मुबईच्या सभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यानंतर ज्योतिराव फुले हे ‘महात्मा फुले’ ह्या क्रांतिकारी नावाने ओळखले जाऊ लागले.
एक समाजसुधारक, स्त्रियांच्या शिक्षणासाठी अफाट कार्य, लेखन साहित्य, जाणता राजा शिवाजी महाराज यांची समाधी रायगडावरील शोधून काढून (१८६९) त्यांच्यावर पोवाडा लिहिला. असे महान कार्य असून सुद्धा ह्या महामानवाला ‘भारतरत्न पुरस्कार’ नाही, ह्याची खरोखरच खंत वाटून मान शरमेने खाली जाते. भविष्यात लवकरच त्यांना ‘भारतरत्न पुरस्काराने’ गौरविले जाईल ही अपेक्षा करूया.
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणाचे महत्व पटवून देतांना म्हणतात हे खरचं आहे ;
विद्याविना मती गेली,
मतिविना नीती गेली,
नीती विना गती गेली,
गतिविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले.

अरविंद मोरे,
नवीन पनवेल (पूर्व) मो. ९४२३१२५२५१
ReplyForwardAdd reaction |