
कराड : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत अनुदान प्राप्त साहित्यिक, गीतकार, कवी, ट्रान्सलेटर, ब्लॉगर, युट्युबर म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या नाशिक येथील सोमनाथ पगार यांना त्यांच्या ‘कारुण्यबोध’ या कवितासंग्रहासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यस्तरीय स्व. राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कराड शहरातील वेणूताई चव्हाण स्मृती सदन येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साम टीव्ही न्यूजचे संपादक निलेश खरे, प्रेरणादायी वक्ते डॉ. विनोद बाबर, महंत अहिल्यागिरिजी महाराज, सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे, दिग्दर्शक अरुण कचरे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, पत्रकार सेजल पुरवार, सिनेअभिनेते योगेश पोवार, सिनेअभिनेत्री प्राजक्ता नवनाळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संदीप डाकवे होते. प्रास्ताविक त्यांनीच केले, सूत्रसंचालन सौ. अंजली गोडसे यांनी केले तर आभार चंद्रकांत चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात कु. माधुरी करपे हिच्या गणेश वंदनेने झाली. या वेळी निलेश खरे म्हणाले, “डॉ. संदीप डाकवे यांच्या नेतृत्वाखाली स्पंदन ट्रस्ट समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे. अशा पुरस्कार उपक्रमांमुळे साहित्य क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा आणि नवा उत्साह निर्माण होतो.”
‘कारुण्यबोध’ हा कवितासंग्रह कोविड महामारीच्या काळातील भयावह परिस्थिती व मानवी संवेदनांचा साहित्यिक दस्तऐवज आहे. या कवितासंग्रहातून समाजमनात करुणा, संवेदना आणि मानवतेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. सोमनाथ पगार यांनी प्रधानमंत्री चित्रपटासाठी गीतलेखन केले असून, या चित्रपटातील त्यांच्या गीतांना सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे यांचा स्वरसाज लाभला आहे. सरतापे यांच्या उपस्थितीतच पगार यांना हा सन्मान मिळाल्याने हा क्षण विशेष ठरला.
सन्मान स्वीकारताना सोमनाथ पगार म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ एक सन्मान नाही, तर सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा प्रेरणास्त्रोत आहे. या मान्यतेमुळे पुढील साहित्य कार्यासाठी मला नवचैतन्य मिळाले आहे.” सोमनाथ पगार हे गीतकार, कवी, ट्रान्सलेटर, युट्युबर, ब्लॉगर तसेच ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर आणि इंग्लिश लँग्वेज ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, स्क्रीन रायटर्स असोसिएशन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मराठी साहित्य परिषद आणि विश्व मराठी परिषद यांचे सभासद आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल डाकवे, सुरेश मस्कर, सत्यवान मंडलिक, समाधान पाटील, जालिंदर येळवे, चंद्रकांत चव्हाण, बशराज चल्लान, गुलाब जाधव, भीमराव धुळप, ओमकार धुळप, रेश्मा डाकवे, शीतल दवणे, गौरी डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!