ग्रामीण संस्कृतीतील पारंपारिक प्रथेचा जागर – धूनीवरल्या गोठी
नाशिकच्या लेखिका प्रा. गंगा गवळी-पवार यांच्या “धूनीवरल्या गोठी” हे शीर्षक असलेल्या एका कलाकृतीचे मुखपृष्ठ नुकतेच पाहण्यात आले. अतिशय कल्पकतेने साकारलेले मुखपृष्ठ पाहताच लहानपणीचे दिवस आठवले.. ग्रामीण जीवन संस्कृतीत असे उपक्रम/ उत्सव/ सण होते जे आता लोप पावत चालले आहे. पूर्वी ग्रामीण भागात नदीवर पाणवठा होता, तो आता राहिला नाही. विहिरीवर दोन, चार, सहा बैलाने ओढल्या जाणाऱ्या पाण्याच्या मोट होत्या त्या विद्युतपंप आल्याने बंद झाल्या, सार्वजनिक विहिरीवर कपडे धुण्यासाठी महिलांसाठी व्यवस्था असायची आता तशा विहिरी राहिल्या नाहीत. रात्रीच्या वेळी कुटुंबातील सदस्य अथवा गावातील सदस्य एकत्र येवून शेकोटी पेटवून गप्पांची मैफल बसवायचे ती शेकोटी राहिली नाही. पण या ग्रामीण संस्कृतीतील पारंपारिक प्रथेचा जागर घालणारी एक ग्रामीण आदिवाशी भाषेतील ललित कथानक असलेली कलाकृती प्रकाशित होत आहे त्यानिमित्ताने या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील संदर्भाचे ग्रामीण जीवनाशी काही संबंध आहेत का यावर विचार करत असतांना खूप काही संदर्भ या मुखपृष्ठातून दिसून आले. काय आहे या मुखपृष्ठावर ? याचा आधी आपण विचार करू.
“धूनीवरल्या गोठी” या कलाकृतीचे शीर्षक सरळ न घेता नागमोडी, म्हणजेच त्याला वेगळ्या आकारात घेतले आहे तसेच शेकोटीच्या ज्वाला तरंग उठल्यासारखे हवेत विरून जात आहेत असे दाखवले आहे. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दाखवला असून या चंद्राच्या उजेडात काही स्री पुरुष शेकोटी समोर बसले आहेत, शेजारी शेळी आणि पलीकडे गाय दाखवली आहे., सभोवताली काळाकुट्ट अंधार पसरलेला आहे. अशा या चित्राचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर यातून भारतीय संस्कृतीच्या पाउलखुणा जपतांना दिसून आल्या आहेत. या मुखपृष्ठावरील प्रत्येक संदर्भाचा उलगडा करणार आहोत.
“धूनीवरल्या गोठी” या शब्दाचा अर्थ आधी समजून घेऊ. “धूनी म्हणजे लहान शेकोटी किंवा होळी, आणि गोठी म्हणजे गप्पागोष्टी. पूर्वी म्हणजेच साधारणतः १९९०-९५ आधी ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी कुटुंबातील सदस्य अथवा गावातील सदस्य एकत्र येवून कोणीतरी उकिरड्यावरचा कचरा गोळा करून आणायचा या कचऱ्याला आमच्याकडे “सासू” म्हणतात आणि हा कचरा पेटवून त्याभोवती बसून गप्पांची मैफल बसवायची… गोळा करून आणलेला कचरा संपला की चेष्टेने कुणातरी “ये जा रे तुझी सासू घेऊन ये” आणि मग तो जाऊन परत नवीन वाळलेले गवत,काडीकचरा गोळा करून आणायचा आणि धूनीत थोडा थोडा टाकायचा आणि गप्पा, चेष्टामस्करी करत विचार आदान प्रदान करायचे.. सर्वात जास्त अशी धूनी जव्हार, मोखाडा, बागलाण, पेठ, सुरगाणा या आदिवासी ग्रामीण भागात जास्त प्रमाणात पेटवली जाते. या धूनीभोवती फेर धरून नाच गाणे, जागरण, गप्पागोष्टी असे सुगीच्या दिवसात केले जाते. आजही थोड्याफार प्रमाणात अशी धूनी पेटवून कौटुंबिक अडीअडचणींची चर्चा केली जाते, बायाबापडे एकत्र बसून दिवसभरातील कामाचा आढावा घेतला जातो आणि उद्याच्या कामाची तयारी केली जाते हा मुळ उद्देश या धूनीतून दिसून येतो. आता ही धूनी संस्कृती जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्याची जपणूक करावी हा संदेश लेखिकेने यातून दिला असावा. लेखिका भूतकाळात डोकावून पहात आहे, धूनीचे अनुभवलेले क्षण आपल्या लेखणीतून समाजासमोर आणत आहेत असा अर्थ मला जाणवला.
“धूनीवरल्या गोठी” या कलाकृतीचे शीर्षकाचा ढाचा सरळ न घेता नागमोडी म्हणजेच त्याला वेगळ्या आकारात, तरंग उठल्यासारखे दाखवले आहे तसेच शेकोटीच्या ज्वाला हवेत विरून जात असल्याच्या दिसत आहेत यावरून प्रथमतः लेखिका गंगा गवळी-पवार, नाशिकचे वैशाली प्रकाशनचे व्ही पोतदार आणि मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांना सलाम करतो की अत्यंत कल्पकतेने, अर्थपूर्ण संकल्पना घेऊन या मुखपृष्ठाला रंगवले आहे. याचा अर्थ असा की – या शेकोटीच्या बाजूने विविध विचारांचे, अनेक मतप्रवाहाचे माणसं बसलेली आहेत, ते कधी कधी शाब्दिक मतभेदाने रागात शेकोटीच्या तप्त आगीप्रमाणे, भडकणाऱ्या ज्वालांप्रमाणे प्रचंड भडकत असतील, भांडत असतील, एकमेकांना चिडून किंबहुना हमरीतुमरीवर येत असतील परंतू क्षणात धगधगत्या शेकोटीतील आगीच्या ज्वाला जशा नागमोडी वळणे घेत हवेत विरून जातात तसे अंधाऱ्या रात्रीच्या थंड हवेत या लोकांच्या मनातील राग क्षणात विरून जातो आणि पुन्हा एकत्र येवून एकोप्याने ही मंडळी गप्पा गोष्टी करतात हा गर्भित अर्थ मला यातून जाणवला आहे.
“धूनीवरल्या गोठी” हा शब्द आदिवासी भागात जास्त वापरला जातो, याचा अर्थ हे मुखपृष्ठ याच भागातील जनजीवन, तेथील परिस्थितीला अनुसरून केले असावे म्हणूनच मुखपृष्ठावर एक पुरुष कपडे न घातलेला दाखवला आहे तर एकाच्या अंगात कोपरी दाखवली आहे तर वयोवृद्धाच्या डोक्याला मुंडासे बांधलेले आहेत. आर्थिक परिस्थितीचे वास्तव दर्शन घडावे, म्हणून दूरवर एकच गाय व शेजारी एकच बकरी दाखवली आहे.. बसलेल्या माणसांच्या चेहऱ्यावरील भाव देखील कुठल्यातरी विवंचनेत, परिस्थितीने गांजलेले दिसत आहेत. मुखपृष्ठावरील हे संदर्भ आर्थिक दुर्बल घटकाचे प्रतिनिधत्व करतात. जर परिस्थिती चांगली असती तर येथे एखादी माडीही दाखवता आली असती, जनावरे ऐवजी चारचाकी दाखवली असती. आजही आपण या भागातील ग्रामीण वाडी वस्त्यांवर गेलो तर अशीच काहीशी परिस्थिती दिसून येते आणि म्हणूनच मुखपृष्ठचित्रकार यांनी वास्तवाला कल्पनेची जोड देवून समयसूचकता आणि स्थळ काळाचे संदर्भ लक्षात घेऊन या ठिकाणची आर्थिक, सामाजिक परिस्थिती अधोरेखित केलेली असावी असे मला जाणवले.
लेखिका मा गंगा गवळी- पवार यांना पुढील लेखनीसाठी खूप खूप शुभेच्छा…!
परिक्षण
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)