इस्लामच्या पाच स्तंभाची माहिती देणारी कलाकृती – इस्लाम परिचय
उद्या सोमवारी जगातील मुस्लिम समाजात साजरा केला जाणारा सण म्हणजे रमजान ईद. गेल्या एक महिन्यापासून जगभरात रमजान या पवित्र सणाच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांचे उपवास चालू आहेत. अतिशय खडतर असणाऱ्या या उपवासाची सुरुवात ज्या दिवशी चंद्राची कोर दिसेल त्यादिवसापासून पहिला दिवस सुरु होतो यालाच चांदरात म्हणतात. रमजानचा चंद्र दिसला की “(रोजे) उपवास ठेवायला मुस्लिम लोक सुरुवात करतात.. या रमजानच्या पवित्र मुहूर्तावर लेखक मौलाना वहीदुद्दीन खान यांनी लिहलेली इस्लाम परिचय नावाची मराठी भाषेतील कलाकृती वाचनात आली. अतिशय अर्थपूर्ण असलेल्या या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील संदर्भ मला खूपच भावले.
इस्लाम परिचय या कालाकृतीच्या मुखपृष्ठावर वाळवंटातील निरव शांतता, अंतहीन वाळू आणि वर आकाश,विस्तीर्ण माळरानातून दोन पदरी रस्ता क्षितिजाकडे चढत्या दिशेने जातांना दाखवला आहे. या सडकेच्या एका बाजूला काळा डांबरी तर दुसऱ्या बाजूला थोडा कच्चा रस्ता दाखवला आहे तर रस्त्याच्या दोन्हीबाजूला शुष्क जमीन आहे. या मुखपृष्ठाला अतिशय सुंदर कल्पकतेने सजवले असून यातून वैश्विक पातळीवरील अर्थ मला जाणवला आहे.
अरेबिक भाषेत हदीस आणि सुन्ना असे दोन शब्द फार महत्वाचे आहे. सुन्ना या शब्दाचा अर्थ रस्ता असा आहे याचा धार्मिक आणि वैश्विक पातळीवर अर्थ सांगायचा म्हटले तर सुन्ना म्हणजे जीवनाचा असा मार्ग जो अल्लाहला (परमेश्वराला) आवडतो आणि परमेश्वराने हा रस्ता त्याच्या सर्व मार्गदर्शकांच्या माध्यमातून समस्त मानवाला आपले जीवन जगण्यासाठी दिला आहे. या रस्त्याचे (सुन्नाचे) दोन प्रकार अल्लाह (परमेश्वराने) सांगितले आहेत – जे अल्लाहच्या मार्गावर स्वेच्छेने नियमितपणे चालतात त्यांना स्वर्ग (जन्नत) सुखाची प्राप्ती होते व जे हा मार्ग सोडून भरकटतात त्यांना नरक (दोजक) प्राप्त होतो. हदीस या इस्लामिक शब्दाचा अर्थ आहे निवेदन किंवा वृत्तांकन , मुस्लीम समाजाचे प्रेषित मुहम्मद पैगंबर साहेब यांनी जे उपदेश दिले आहे त्याच्या नोंदी किंवा या उपदेशाचा वृत्तांत यालाच हदीस असे म्हटले आहे या अर्थाने देखील मुखपृष्ठावरील दोन रस्त्याचा अर्थ मला यातून जाणवला आहे.
इस्लाम परीचय या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर जो दोन पदरी रस्ता दाखवला आहे याचा दुसरा अर्थ मला जाणवला आहे तो म्हणजे कुरआनच्या शिकवणीचे दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्यातील पहिले वैशिष्ट्ये म्हणजे अल्लाह (परमेश्वर) एकच आहे आणि यावर विश्वास ठेवणे म्हणजे अद्वैतवाद आणि त्याचीच प्रार्थना करणे. तर दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे मानवातील बंधुभाव अर्थात मनुष्यजात एकच आहे आणि या सर्वांना समान हक्क आहे म्हणजेच ईश्वर, परमेश्वर (अल्लाह) एकच आहे आणि सर्वांसाठी एकच न्याय आहे असा अर्थ या दोन मार्गातून मला जाणवला आहे.
● हे वाचा – ग्रामीण शेतीतून कौटुंबिक एकीचा संदेश देणारी कलाकृती – ‘आम्ही रानातली फुले’
इस्लाम परीचय या कलाकृतीच्या माध्यमातून लेखक मौलाना वहीदुद्दीन खान यांनी इस्लामचे पाच मुख्य स्तंभ सांगितले आहेत. प्रेषित पैगंबर यांनी म्हटल्याप्रमाणे या मुख्य पाच आधार स्तंभावर इस्लामची इमारत उभी आहे
पहिला स्तंभ म्हणजे श्रद्धा (ईमान) – अल्लाहवर श्रद्धा म्हणजे सर्व या सृष्टीचा निर्माता त्याच्यावरविश्वास असायला पाहिजे,ज्याने अल्लाह, परमेश्वरावर श्रद्धा बाळगणारा माणूस स्वतःला परमेश्वराचा सेवक समजू लागतो. जेव्हा गाढ झोपेतून माणूस उठतो तेव्हा त्याला परमेश्वराने त्याच्यावर कृपा केलेली असते.
दुसरा स्तंभ म्हणजे सलात (नमाज) – दैनंदिन जीवनातील केलेल्या चांगल्या वाईट कृतीबद्दल अल्लाह, परमेश्वरापुढे गुडघे टेकून परमेश्वरच्या, अल्लाहच्या श्रेष्ठत्वापुढे झुकणे, म्हणजेच नमाज. अल्लाहने आपल्याकडून चांगले कार्य करून घेतले असेल तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि आपल्या हातून काही अनुचित घडले असेल तर अल्लाहपुढे गुडघे टेकवून कबुली देणे आणि त्याबद्दल क्षमा मागणे म्हणजेच नमाज अदा करणे होय. नमाज अदा केल्याने मनातील अहंभाव लोप पावतो.
तिसरा स्तंभ म्हणजे उपवास (सौम) – आयुष्यभर मानव टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ करीत असतो , कधी कधी या धावपळीत काही घटीत घडले तर मनोधैर्य आणि संयम ढळतो, उपवासामुळे संयम आणि मनोधैर्य वाढते आणि गरीब कुटुंबावर जी उपासमारीची समस्या दैनंदिन दिवशी भेडसावते याची रोजामुळे याची जाणीव होते यासाठी इस्लाममध्ये उपवासाला अनन्यसाधारण महत्व आहे.
● हे वाचा – साहित्य आणि संस्कृतीचा परिपाक असणारी कलाकृती–चैतन्याचा जागर
चौथा स्तंभ म्हणजे दानधर्म (जकात) – अल्लाह, परमेश्वराने प्रत्येकाला धन दौलत कमावण्याचा मार्ग दिला आहे, जो तो विविध मार्गाने धनदौलत कमावत असतो त्यातून काही धन हे ज्याने हे मिळवून दिले त्याच्यासाठी राखून ठेवून व ते गोरगरीब असतात त्यांना दान करणे
पाचवा स्तंभ म्हणजे हजयात्रा – मानवी जीवनात यात्रेला अतिशय महत्व आहे. जीवनात आधी प्रपंच करावा नेटका आणि मग परमार्थ साधावा असे प्रत्येक धर्मात म्हटले आहे. आयुष्याच्या संध्याकाळी मानवी देह परमेश्वराच्या सानिध्यात रहावा म्हणून तीर्थ यात्रा केल्या जातात. हिंदू धर्मात काशी यात्रा केली जाते तशीच मुस्लीम समाजात हज यात्रेला फार महत्व आहे. हजयात्रा अल्लाहभिमुख जीवनशैलीची एक शिकवण आहे.
लेखक मौलाना वहीदुद्दीन खान यांनी इस्लामचा थोडक्यात परिचय या कलाकृतीतून करून दिला आहे. प्रकाशक अब्दुस समद खलिल अहेमद यांनी प्रकाशन करून वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
रमजान हे शांतता, सत्यता, त्यागाचे व स्वर्ग (जन्नत) प्राप्तीचे, नरक(दोजक) पासून सुटकेचे ,पापापासून मुक्तीचे प्रतीक आहे असे प्रसिद्ध कुराणमध्ये म्हटले आहे. या निमित्ताने सर्व मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या लाख लाख शुभेच्छा
–प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृती परिचय:
कलाकृती – इस्लाम परिचय
लेखक – मौलाना वहीदुद्दीन खान
प्रकाशक : अब्दुस समद खलिल अहेमद