8 मार्च 2025 जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त चवथा लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील विशेष लेखमाला आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही मिशन आयएएस अमरावती यांच्या सौजन्याने वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा चवथा लेख.- संपादक
अमरावती शहराचा फैजरपुरा किशोर नगर हा भाग. या भागामध्ये सूर्यवंशी नावाचे सेवानिवृत्त तहसीलदार राहतात. ते आता शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांची नात आणि आपल्या अमरावती शहराची सुकन्या प्रेरणा आता महाराष्ट्रामध्ये आयएएस अधिकारी म्हणून काम करीत आहे. अमरावतीच्या वाट्याला हे वैभव यावे हे खरेच नमूद करण्यासारखे आहे
प्रेरणाचे शिक्षण वडील पोलीस अधिकारी असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झाले. प्रायमरी व माध्यमिक शिक्षण अमरावती नागपूर आंबेजोगाई बीड नाशिक येथे झाले. वडील तेव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी होते. अमरावतीच्या होली क्रॉस हायस्कूल मधून तिने 1998 यावर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर तिने डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयामध्ये 2000 यावर्षी बारावीची परीक्षा पास करून आपला अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला आणि त्यानंतर 2006 यावर्षी तिने अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयासमोरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे पदवी मिळवली.
● हे वाचा – नागपूरच्या कर्तव्यदक्ष विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी
आय ए एस ची परीक्षा पास केल्यानंतर तिला पहिली नेमणूक मिळाली ती यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग या नात्याने. त्यानंतर जालना जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे महानगरपालिकेला अपर आयुक्त यशदा ला उपसंचालक अपंग विभागाला आयुक्त अशा वेगवेगळ्या पदावर काम करीत प्रेरणाने आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे.
प्रेरणाची माझी पहिली भेट अमरावतीला ती नववीला असताना झाली. तिचे वडील तेव्हा अमरावतीला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. ती तेव्हा अमरावतीच्या कांता नगर ह्या शासकीय वसाहतीमध्ये कांचन बिल्डिंगमध्ये राहत होती.त्या बिल्डिंगमध्ये राहणारे श्री दि सू पाटील हे माझे मित्र होते. ते तेव्हा अपर जिल्हाधिकारी होते. त्यांच्याकडे गेलो असताना श्री हिम्मतराव सर यांचा परिचय झाला आणि तो पुढे वाढतच गेला.
आम्ही 1994 या वर्षाला अमरावती जिल्ह्यातील वरुड या तालुक्याच्या ठिकाणी बहुजन साहित्य संमेलन घेतले होते. कुलगुरू श्री दादासाहेब काळमेघ मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर सुप्रसिद्ध कवी प्राचार्य विठ्ठल वाघ आदी मान्यवर मंडळी या संमेलनामध्ये होती. या संमेलनाच्या नियोजनात असताना माझी प्रेरणाचे वडील श्री हिम्मतराव यांची भेट झाली आणि मी प्रेरणाची चौकशी केली. तेव्हा हिम्मतराव सरांनी सांगितले की ती 26 जानेवारी च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्ली येथे गेलेली आहे .तेव्हा ती होली क्रॉस कॉन्व्हेंट मध्ये शिकत होती. 1994 किती गोष्ट. अमरावतीची मुलगी राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होते ही महत्त्वाची गोष्ट होती. मी लगेच तिच्या वडिलाला म्हणजे हिम्मतराव सरांना सांगितले की आपल्या संमेलनामध्ये तिचा सत्कार करू या. हिम्मतराव सरांनी मला होकार दिला आणि ठरल्याप्रमाणे आम्ही प्रेरणाचा वरुडच्या बहुजन साहित्य संमेलनामध्ये सत्कार घडवून आणला.
● हे वाचा – नाट्यप्रेमी करजगाव
प्रेरणाने मागे वळून कधी पाहिलेच नाही .ती सतत पुढे पुढे गेली आणि यश संपादन करीत गेली. तिने मिळवलेले यश निश्चितच मोठे आहे.IAS ची परीक्षा उत्तीर्ण करणे ही इतकी सहज गोष्ट नाही. आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ती पुढे पुढेच जात गेली. वडील अधिकारी असल्यामुळे आणि सातत्याने जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त मनपा आयुक्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वेळोवेळी झालेल्या भेटी तिला प्रेरणादायी ठरल्या आणि घरीच वडील उपविभागीय पोलीस अधिकारी असल्यामुळे तिला वडिलांसारखे आपणही अधिकारी व्हावे हे वाटणे साहजिक होते. सुरुवातीला प्रेरणा आय ए एस च्या परीक्षेला बसली. फार कमी विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होतात. लाखो विद्यार्थी बसतात त्यामध्ये फक्त हजार विद्यार्थी तेव्हा सिलेक्ट होत होते. प्रेरणाचा पहिल्या प्रयत्नामध्येमध्ये क्रमांकाला लागला नाही. पण तिने जिद्द सोडली नाही आणि सातत्याने अभ्यास करीत तिने आयएएस ही परीक्षा उत्तीर्ण केली.
प्रेरणा जेव्हा ही आय ए एस ची परीक्षा पास झाली तेव्हा हिम्मतराव बुलढाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. श्री राधेश्यामजी चांडक हे महाराष्ट्रातील मोठे व्यक्तिमत्व. त्यांची बँक म्हणजे बुलढाणा अर्बन संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. कितीतरी शाखा आहेत .परदेशातही आहेत.त्यांच्या पुढाकाराने आम्ही बुलढाण्याच्या गर्दे सभागृहामध्ये प्रेरणा व तिच्या आई-वडिलांचा सत्कार आयोजित केला. अशा सत्कारातून नवीन पिढीला प्रेरणा भेटते. हा या सत्कार आमच्या उद्देश होता. सभागृह तुडुंब भरले होते .तो काळ असा होता की त्या काळात आयएएस या परिषदेविषयी लोकांना फारशी माहिती नव्हते . म्हणून कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला होता.
आज सर्वत्र जागतिक महिला दिन सप्ताह संपन्न होत आहे .अशा वेळेस अमरावतीला राहणाऱ्या अमरावतीच्या शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात व अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकलेल्या व आयएएस या उच्चपदस्थ पदाला पोहोचलेल्या प्रेरणा मॅडम यांचे जीवन व यांची यशोगाथा ही ते तरुण पिढीला निश्चितच प्रेरणा देणारी आहे.
अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना शेवटच्या वर्षाला वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि मुलांचे सिलेक्शन आपल्या कंपनीसाठी करतात. कॅम्पस इंटरव्यू या नावाने हा प्रकार प्रचलित आहे. प्रेरणाला त्या गावाला जायचेच नव्हते. तिला त्यामध्ये आवड पण नव्हती आणि म्हणून तिने त्या प्रकाराला रामराम ठोकला आणि स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करून दिली. तीची मैत्रीण अश्विनी जोशी याची तिला साथ मिळाली. दोघींनी मिळून अभ्यास केला. अश्विनी जोशीला मात्र लगेच यश मिळाले. ती महाराष्ट्रातून आयएएस या परीक्षेत पहिली आली. प्रेरणाच्या मदतीनेच आम्ही तिचा अमरावतीला भव्य सत्कार घडवून आणला. तेव्हा प्रेरणाचे वडील हिम्मतराव देश प्रकार हे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आज आमच्या अमरावतीची प्रेरणा महाराष्ट्र शासनामध्ये आयएएस अधिकारी म्हणून प्रशासनामध्ये चांगले काम करत आहे आणि हे सगळे करत असताना तिचे अमरावतीकडे लक्ष आहे.
घाऱ हिंडते आकाशी
लक्ष तिचे पिलापाशी
या नात्याने ती अधून मधून अमरावतीला येते. एवढ्यातच ती अमरावतीला येऊन गेली .निमित्त होते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे. ती मेळाव्यात सहभागी झाली. सर्वांशी बोलली. नवीन पिढीशी आणि जुन्या मित्रांशी सुसंवाद साधला आणि नवीन पिढीला प्रेरणा खऱ्या अर्थाने प्रेरणा देऊन गेली. या आठवड्यात संपूर्ण भारतात नवे जगात जागतिक महिला दिन संपन्न होत आहे. त्यानिमित्त प्रेरणाला तिच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.!
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
जिजाऊ नगर
महापौरांच्या बंगल्यासमोर
अमरावती कॅम्प 444602
Mo.9890967003