डॉ. सुनीता चव्हाण लिखित मनाला गारवा देणारी “हिरवाई धून”
ललित लिखाण हे मराठीत सुपरिचित आणि लोकप्रिय साहित्य प्रकारात मोडते. नेमकेपण, योग्य घटनांचा,अनुभवांचा चोखंदळ वापर,पाल्हाळ न लावता एखाद्या अनुभवाचं प्रमाणबद्ध विस्तारीकरण,सूक्ष्म निरीक्षणशक्ती, सोपी, ओघवती भाषा शैली ,रोजच्या जीवनातील साधी उदाहरणं , या साऱ्यांचं ठासून भरलेलं प्रभावी रसायन म्हणजे ललित लिखाण.
वरील साऱ्या वैशिष्टयांचा प्रत्यय आणून देणारे पुस्तक नुकतेच वाचनात आले. ते म्हणजे लेखिका डॉ. सुनीता चव्हाण यांचे “हिरवाई धून” हा ललित लेखांचा संग्रह. व्यवसायानं डॉक्टर असल्या तरी त्या एक कृतिशील लेखिका आहेत. अनेक सामाजिक संस्थांशी त्या निगडित आहेत, आणि त्याद्वारे त्यांचे सामाजिक कार्य निरंतर चालू असतं. “हळवे पाषाण” या काव्यसंग्रहाद्वारे सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रथम प्रवेश केला. सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये आला “वेदनेची गर्भनाळ” हा काव्यसंग्रह. लगेच मार्च २०२२ मध्ये ‘भयातून निर्भयाकडे… संवादसेतू” हा त्यांचा ललितलेखसंग्रह प्रसिद्ध झाला; आणि मराठी वाचकांचे लक्ष त्या संग्रहाने आपल्याकडे वेधून घेतले. एका वर्षात एखाद्या मराठी पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघणं ही खरंच ऐतिहासिक, दुर्मिळ आणि निखळ कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. ते भाग्य या ललितलेखसंग्रहाला लाभले आहे. नुकतीच त्याची सहावी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
“हिरवाई धून” या संग्रहात एकूण वीस लेख आहेत. तीन विभातात त्याची विभागणी केलेली आहे. पहिला विभाग म्हणजे निखळ ललित लेख. दुसरा “मनधून ” आणि तिसरा “रसधून “. पहिल्या विभातात दहा लेख आहेत. हे सर्व लेख निव्वळ निसर्गावर आहेत. एखाद्या विषयावर ,अनुभवावर किंवा निरीक्षणावर लिहून त्यापासून अलिप्त होणं सोप्प असतं. पण त्या लिखाणाला आपली जीवन पद्धती बनवणं थोडं कठीण असतं. डॉ.सुनीता चव्हाण यांनी निसर्गसहवासाला आपली जीवनपद्धती बनवलं आहे; इतक्या त्या निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या आहेत. प्रस्तावनेत ,”निसर्ग हा आपला सखा आहे, कुटुंबाचा एक घटक आहे असं त्या मानतात .” हे कवी सतीश सोळांकूरकर यांचं विधान शंभर टक्के सत्य असल्याचं पुस्तक वाचल्यानंतर तंतोतंत पटतं. त्यामुळे निसर्गातील चढउतार त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग झालेले आहेत. म्हणूनच त्या उन्मळून पडणाऱ्या आणि नंतर उमलू लागलेल्या मोगऱ्याशी, “मोगरा फुलला” या लेखात , आपले सुख आणि दुःख सहज “रिलेट” करू शकतात. अनेक प्रयत्नांनंतर मोगरा फुलत नाही हे पाहिल्यावर जीवाची होणारी घालमेल त्या परिणामकारक शब्दात वर्णन करतात. मोगऱ्याला मानवी रूप देऊन आपली वेदना शब्दबद्ध करतात. त्याच्या सुकण्याच्या आणि फुलण्याच्या प्रक्रियेची जीवनविषयक तत्वज्ञानाशी कलापूर्ण सांगड घालतात. त्या लिहितात,”…. स्वतःतील विविध विचारांशी अंतर्मुख होऊन त्यातील सात्विक विचारांच्या पौष्ठिक खतांशी एकजीव व्हावं लागतं आणि दुष्ट प्रवृत्तीच्या पानांना खुडून टाकावे लागते जेणेकरून तेथे नवीन पानांची पालवी फुटेल….. ” किती नेमकं लिहिलंय!
या उलट मनःस्थिती “एक खंत : चाफा बोलेना” या लेखात लेखिकेची झालेली आहे. या लेखाची सुरुवातच अतिशय बहारदार झालेली आहे. एका अतिशय संवेदनशील कवी मनानं बागेत मारलेल्या फेरफटक्याचं ह्रद्य वर्णन यात आहे. मानवी मनाचे गुण आणि भावना आरोपित करून प्रत्येक रोपट्याची ऐट आणि सौंदर्य लेखिकेने अधोरेखित केलेलं आढळून येतं. हे सगळं वर्णन मुळातूनच वाचल्यास आपण पुलकित होऊ. तर एका न फुललेल्या चाफ्याबद्दल खंत व्यक्त करणारा हा मनाला चटका लावणारा लेख. पराकोटीचे प्रयत्न करूनही न फुललेल्या चाफ्याच्या झाडाविषयी लेखिकेची झालेली विषण्ण मनोवस्था या लेखात वर्णन केलेली आहे. लेख वाचताना; लेखिकेच्याच शब्दात सांगायचं झालं तर, लेखिकेच्या धैर्यासोबतच आपल्या आनंदाचीही पानगळ सुरु होते. चाफ्याच्या झालेल्या नाशातून लेखिका मानवी नात्यांच्या संबंधात जे निष्कर्ष काढते तेही चिंतनीय आहेत.
या विभागातील “वसुधैव कुटुंबकम “, “अबोली: माझं माहेर” , “गुलबक्षी देखणं सौंदर्य,” इत्यादी लेखही असेच भाषा,चिंतन शैली आणि आशय यांचं देखणं सौष्ठ्व घेऊन उतरले आहेत. “मन धून” या दुसऱ्या भागात वेगवेगळ्या विषयांवर पाच लेख आहेत. या लेखांमध्ये लेखिकेच्या अभ्यासाच्या वेगळ्याच वैशिष्टयांचा प्रत्यय येतो. यातील “विश्वास” या लेखात, ” विश्वास हा आपल्या आत्म्याचा सुगंध आहे” असं त्या सहज लिहून जातात. विश्वासाचे महत्व, विश्वासाला साधक बाधक गोष्टी यांचं वर्णन केलेलं आहे. “स्पर्श” या लेखात आई बापाचा स्पर्श, प्रणयातील स्पर्श या हव्याहव्याशा वाटणाऱ्या स्पर्शांबरोबरच काही नकोशा वाटणाऱ्या स्पर्शाचा उहापोह सुद्धा केलेला आहे. इतर लेखांमधील मनोविश्लेषण सुद्धा विचार करायला लावणारे आहे.
शेवटचा भाग आहे “रस धून”. यात त्यांनी चित्रपटगीत ,( किसी नजरको तेरा इंतजार आज भी है” गीतकार हसन कमल,गायक आशा भोसले,भूपिंदर, चित्रपट एतबार ) सुरेश भटांची “स्मरण” ही गजल, “खामोशी” मधील ‘हमने देखी है इन आखोकी ” ‘नदीकिनारी” ही कुसुमाग्रजांची कविता यातील सौंदर्य चोखंदळपणे टिपलेलं आहे. हे रसग्रहण पण लेखिकेच्या लिखाणाचा वेगळाच पैलू आपल्यासमोर आणतं . ‘पोटातलं गाणं ” या, या विभागातील पहिल्याच लेखात, गाणं आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग कसं आहे, गाण्यांनी दिवसाच्या प्रत्येक क्षणी आपल्याला कशी साथ दिलेली आहे, हे त्या रसाळपणे सांगतात. निसर्गापासून संगीतापर्यंत सर्वच गोष्टीत रस घेऊन जीवन समृद्ध करण्याचा त्यांचा गुण घेण्याजोगा.
थोडक्यात, साधीसरळ भाषाशैली, निसर्गाविषयी अपार माया, निसर्गातील बदल मानवी जीवनाशी निगडित करण्याची हातोटी,सूक्ष्म निरिक्षणशक्ती या साऱ्या गुणांनी भरलेला हा संग्रह आपल्याला आनंद देऊन समृद्ध करेल.
पुस्तकाचे वाङ्मयीन मूल्य वाढले आहे ते प्रसिद्ध कवी, लेखक सतीश सोळांकूरकर यांच्या रसपूर्ण प्रस्तावनेने .पुस्तकाची सर्व वैशिष्ठ्ये आपल्या प्रस्तावनेत त्यांनी अत्यन्त अचूकपणे वर्णन केलेली आहेत. पुस्तक प्रसिद्ध केले आहे जुन्या जाणत्या “डिम्पल प्रकाशन” ने ,त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे. पुस्तकाला सुंदर मुखपृष्ठ आहे संतोष धोंगडे यांचे. डॉ. सुनीता चव्हाण यांना पुढील लिखाणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
-अशोक गुप्ते
८२९१११६२५७६
पुस्तकाचे नाव : हिरवाई धून (ललितलेख संग्रह) *
लेखिका : डॉ. सुनीता चव्हाण
प्रकाशन : डिम्पल पब्लिकेशन
आवृत्ती : २१ सप्टेंबर २०२३
किंमत : रु २००/- फक्त
संपर्क : ९२७००५३६०२