गोलूची फटाक्यांची दिवाळी…
गजगोटा गेला अन् बंदूक आली
टिकल्या फोडाची मजाच गेली
सुतळी बॉम्बची शिलगावता वात
एकच दणका अन् कानाले घात
गोट्यावर टिकली,गोट्यानच ठेचली
हाताले चटका लागला तरी फोडली
उदबत्तीच्या टोकानं पेटवली वात
लक्ष्मी बॉम्बचे झाले आवाज सात
डब्बीची काडी लावता खाली
सापाची गोळी सरसर चढली
रॉकेटची दांडी शिशीत ठेवली
वात लावताच आकाशात गेली
फुरफुर फुरफुर करे फुलझडी
सप्तरंगी फुलांच्या बरसती झडी
अनारला लावली दिव्याची वात
प्रकाश झोतात उजळली रात
चक्र फिरलं गोल गोल गोल
जाऊन पडलं नालीत खोल
लाल फटाक्याची लावता लड
फटाके फोडायची लागली होड
आली रे आली दिवाळी आली
गजगोटा गेला अन् बंदूक आली
–आबासाहेब कडू,
अमरावती