तालुक्या पासून अगदी दहा बारा कोसावर आमचं गाव.गावाला लागूनच सडक,जवळच बस स्टॅण्ड व स्टॅण्डला लागूनच एक दोन तुराटया,पऱ्हाटया व मेनकापडानं छाकारलेल्या हॉटेली. त्या समोर भट्टीवर ठेवलेल्या व तयणानं काया ठिक्कर झालेल्या भजे,आलुबोंडा तळायच्या मोठमोठ्या कढई व्हॉटेलीच्या समोर लावलेल्या हिरव्यागार कडू बदामीच्या झाडाखाली नाश्ता करणार्या गिऱ्याहाईकासाठी तुटका,फुटका एखादा बेंच टाकलेला समोर पाणी थंड रहावं म्हणून एखादा बोंदरी बांधलेला रांजन ठेवलेला. समोरच लागून एक दोन दाढी कटींगची दूकानं. शेतात जाण्यासाठी गावशिवाराचाही एकच रस्ता असल्यान दिवसभर माणसाचा नुसता राबता. चार दोन म्हातारे कोतारे शाळेच्या व्हरांड्यात थंड फरशीवर आंग टाकलेली दिसायची तर काही पानटपरीवर आलेला पेपर वाचण्यात आनंद घेणारी. शाळेतली चार दोन चिंगरी पोरं गोया,बिस्कीटा,व पोंगा पंडिता साठी मास्तरांचा डोळा चुकवून येजा करताना मधेच दिसायची.एक दोन सायकल पंचर ची दुकानं होती. बसस्टॅण्ड च्या मागच्या बाजूला सुगीला हिरवागार दिसणारा नंतर उन्हाळ्यात खायला धावणारा ऊलंगवाडी झालेला भकास जंगल.गावात बांधलेल्या मोठ्या विद्यालयात दहावी पर्यत शाळा तर गावातली व काही आजूबाजूच्या खेड्यातून शिकण्यासाठी आलेली मुलंमुली.जवळच नेताजींचा सुंदर पुतळा बसवलेल्या पाण्याच्या टाकी जवळच्या झाडाखाली सावलीत बाहेरगावच्या पोरांच्या सायकली दिसायच्या.
● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र
शाळेच्या मागंच आखरपट्टी.गावाजवळच असलेल्या ग्रामपंचायती जवळ सार्वजनिक नळाच्या सहाऱ्यानं पाण्याची सोय पाहून पोट भरण्यासाठी ऐन हंगामावर उतरलेली खात्याची बिऱ्हाडं व त्यांची उघडी नाघडी खेळणारी पोरं.बिऱ्हाडाच्या जवळच तान्ह्या पोरासाठी पालाच्या मधातल्या ठुनीले पायना बांधलेला. एक दोन गाडगी मडकी,फूटके गंज.सातऱ्या,वाकया, पाण्याची भदाळं, प्लॅसटीकच्या एक दोन डांबर लावलेल्या कॅना.एखादं गळ्यात पट्टा बांधलेलं कूतरं, एक दोन बांधलेली एरव्ही उकीरडयावर फुंकत हिडंत बसलेली गाढवं.गाणे आयकण्यासाठी सेलवरचा एखादा रेडू व बरोबर मधांत खुटीले लटकवलेला एखादा घासलेटचा कंदील. एखादं भांडयावाल्याचं बाहेरगावावरून ऐन लग्नसराईचा सिझन पाहून धंदा करायला आलेल कसाराच दूकान.पाल करून तयार केलेल.समोरच भांडी ठेवण्यासाठी मोठी दमनीसारखी बैलगाडी. बहूतेक या गावावरून त्या गावाला जाण्यासाठी व माल आणायला व स्वयंपाकाचं सारं सामान त्याच्यातच भरभरून ठेवलेलं.
ग्रामपंचायतीच्या समोरच लोकांना बसण्यासाठी मोठा ओटा व ओटयाला लागूनच दर सात आठ दिवसाचं आड येणारा सार्वजनिक नळ.नळ आला नाही म्हणजे गावात एरव्ही टॅंकरच्या वाऱ्या लागलेल्या असायच्या म्हणजे हमखास असायच्या. एक दोन दिवसाआड नळ आला म्हणजे पाण्यासाठी मोठी लाईन लागायची.एवढी की सरकवत सरकवत भदाळं नळा पर्यंत यायला सारी भरदुपार व्हायची. अशी काही दूकाने गावात आली की मन मारून शाळेत जावं लागायचं. कधी पाच वाजतात व आम्ही ती गमंत बघायला जातो असं व्हायचं. या पाल टाकलेल्या दुकानाची गंमत म्हणजे त्या दुकानाजवळ दोन चार बुढे बाडे, म्हातारे बिड्या फूकत व इकडच्या तिकडच्या सोयऱ्या धायऱ्याईच्या लग्नसराईच्या गोष्टी ऊकरून काढून मस्त पालाजवळ असलेल्या ओट्यावर रमत,गमत बसत.पालात आलेलं काम निमुटपणे करत खाती बुवा हातोडीचे टोले देण्यात गुंग असत.समोरच खात्याचा भाता फुकणारी खात्याची काळी कुळकुळीत बायको.खातीबुवा कधी पोरासोरांवर कधी बायकोवर खेकसताना दिसत.
● हे वाचा – दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी
मार्च ओलांडला म्हणजे सारा जंगल उजाड दिसायचा.पऱ्हाटीची उलंगवाडी झाली की बाहेरच्या म्हणजे राजस्थानचे उंट व मेंढपाळ, घोड्यावाले गावाशेजारी पोट भरण्यासाठी यायचे व नदीकाठी पाणी,चारा पाहून तेथेच ते डेरा टाकायचे.त्यांच्या बाया,लेकरं कधी नदीतून तर कधी पाण्याचा पाईप फुटला म्हणजे तेथून पाणी म्हणजे येरवालातून पाणी आणायचे. नदीकाठी दूर मैदानावर रात्रीच्या गडद अंधारात त्यांची ओळीन उभी असलेली पालं एकसारखी दिवायीचे दिवे लागल्या सारखी चमकायची. मध्येच रात्री पहारा देतांना सावधपणे मुरकुंडी मारून झोपलेली कुतऱ्यांचे ओरडणे व मेढयांची बेबे ऐकू यायची. दिवस उजाडल्यावर ही कळपं चाऱ्याचा व पाण्याच्या शोधात दूरवर पांगायची. माणसं विळा वा कुऱ्हाडीनं कधी बाभुळचा पाला,शेंगा पाळायची त्यावर सारा मेंढरांचा कळप तुटून पडायचा असं हे अस्सल ग्रामीण जिवन आम्ही भरभरून जगलं होतं.घरी चार,सहा एकर कोरडवाहू शेती त्यामुळे उदरनिर्वाहासाठी
आई वडील दोघेही शेतात राबत असल्यामुळें विपरीत परिस्थित गेलेले बालपण.कधी शाळेचा ड्रेस असे तर कधी जूणाच धू धू पाला पडायचा.अतिशय काबाडकष्ट करणाऱे बायबाप तरीही न संपणारे दारिद्रयाचे भोग,कष्टाने पीचत गेलेली माणसे आपल्या लेकरानी शिकावं या विचारानं आशेपोटी कामाधंदयानं झपाटलेली.उन्हातान्हात काम करून काळी ठीक्कर पडलेली. त्यांची निस्तेज पोषणरहीत हाडकूळे शरीरं, अंगाचा घामाने ओल्या आंबट शरीराचा येणारा कूबट वास,कष्टाची जाणीव करूण द्यायचा.त्या जाणीवेपोटी आम्हीही सुट्टीच्या दिवशी चार,दोन पैसे कमवण्यासाठी कामाले जायचो.फूल नाही फूलाची पाकडी तेवढीच त्यांना संसारात तिखटमीठासाठी मदत व्हायची. तरी सुखसमृद्धी हा शब्द यांच्या साठी तर कोसो दूर होता.
● हे वाचा – पिक्चर रस्त्यावरचा…
मायची सडा सारवण व जंगलात कामाधंदयासाठी जाण्यासाठी भल्या पहाटे भाकरी थापा साठी धावपय चालायची. ओढून,ताणून कुरबुर न करता प्रपंचाबरोबर जुळवून घ्यायची.तरीही संसाराच रोपट विसकटुन पडू नये म्हणुन झाडाच्या मुळयासारखी घट्ट पकडून उभी रायलेली.आणी त्याच कष्टातून उभं राहीलेल पीक व कष्टानं गावरान ज्वारीला बहारून आलेली हिरवीगार कणसं,पांढरा कापूस उद्याच्या उज्ज्वल भविष्यातली स्वप्ने दाखवायचा. हा सुगीचा मालटाल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजारात विकल्यानंतर चार,दोन पैसे हातावर पडायचे. काही उसनवारीत जायचे. कास्तकारांची कुबडया घेउन ऊभी राहिलेली गरीबी चार दिवस दिमाखात उभी राहायची. या कष्टाच्या कामानं पिचलेल्या सर्व सामान्यांना बाकी व्यवस्थेचं काही देणंघेणं नसायचं. सध्याची आधुनिक परिस्थिती मात्र खेड्यातील बदलत्या मानसिकतेचा वास्तवदर्शी वेध घेताना दिसते. कृषिसंस्कृतीमधील अंतर्विरोधावर झगझगीत प्रकाशझोत टाकतांना दिसून येते.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली म्हणून स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा होत असताना प्रत्यक्ष खेड्यांची, तिथल्या माणसांची काय अवस्था आहे,हे ग्रामीण आणि दलित साहित्याने प्रभावीपणे आपल्या साहित्यातून मांडलं होतं. कारण या साहित्यात आपल्या भोवतालाचं संबंधीत चित्रण आलेलं असल्याने ग्रामीण भागातील तरूण काही अंशी सुखावला असला तरी
भारतीय स्वातंत्र्यानंतरही समाजघातकी लोकांकडून गावांचं कसं शोषण होत आहे, एकी भंग करून गावात बेकी निर्माण केली जात आहे. कष्टाळू, कृषिनिष्ठ शेतकऱ्याला कसा त्रास दिला जातो आणि सज्जन, सात्त्विक, माणसांना सुद्धा मनाविरोधात संघर्षरत व्हावं लागतं, त्यात कृषिप्रधान खेड्यांची कशी वाताहत होते… याचं प्रभावी चित्रण या साहित्यातून होतं. याप्रमाणेच ग्रामीण भागातील अंधश्रद्धा; लोकांच्या भावनेचा विकृत लाभ उठवणारी बुवाबाजी, ग्रामीण भागातील स्त्रियांची वेदना आणि त्यांचे प्रश्न, शेतिनिष्ठ शेतकऱ्याला त्याच्या पत्नीची कशी साथ लाभते व कृषिव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी कुटुंबसंस्था टिकून राहण्यासाठी ती कशी त्याला मदत होते हेही आपणास दिसते.
● हे वाचा – करजगांव तसं चांगलं पण…!
गावामधील लोक शेतीवाडीच्या कामाला लागतात. एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने हे अठरापगड जाती-जमातीचं गावच्या गावं एकोप्यानं नांदतांना दिसतात. पण गावात बाहेरून आलेले धंदेवाईक उपरे लोकं अमाप नफा कमावण्यासाठी या भाबड्या लोकांना शेती परवडत नाही असं म्हणून व भरपूर पैशाचं आमीष दाखवून लोकांकडून शेती हिसकावून घेताना दिसतात.राबून खाणाऱ्या शेतकऱ्यांना लुबाडून खाणाऱ्या व्यवस्थेचे दर्शन आपणास होतांना दिसते. बदलत्या काळात समाजव्यवस्थेला वेढून ग्रामीण संस्कृतीला छिन्नभिन्न करणाऱ्या; चंगळवादाची देण देणाऱ्या या धनाढ्य लोकांचे गोरगरीबांच्या जमीनी हिसकावून फार्म हाऊस उभे होतात. जमीनीचे ले-आऊट पडतांना दिसतात.या अगोदर ग्रामीण भागात फार्म हाऊस ही संकल्पना नव्हती.ती आता या धनाढ्य व गब्बर लोकांनी आणली त्याचा उपयोग शेती पिकवण्यासाठी न करता फक्त चंगळपणा करणाऱ्यांसाठी व दारू पार्ट्या , जेवणावळी करण्यासाठी होतो.हे चित्रण येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी भयावह आहे. हल्ली आता हे ग्रामीण भागात बघायला मिळत आहे.पुढे, पुढे शेतीच संपुष्टात येते की काय? अशी शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
गावात ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणुका, सरकारी स्वस्त धान्याचं दुकान, पतसंस्था इत्यादींच्या माध्यमातून दोन गट स्थापन होतात. आणि टप्प्याटप्प्याने अख्खं गाव त्यात ओढलं जाऊन पोलिस केसेस, कोर्टकचेऱ्या इत्यादींच्या माध्यमातून रसातळाला जात राहतं. गावातील लोक दरिद्री आणि बाहेरून आलेले हे उपरे गब्बर; नवश्रीमंत कसे बनतात याचं खूपच भेदक आणि प्रभावी दर्शन आपणास होते.
पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास होईल असं भासवून लोकांना भरी घातलं जातं. शेतकरी कर्ज काढतात. पण त्यातला अर्धा पैसा पार्ट्यांसाठी म्हणून हे राजकारणी धुर्त लोक वापरतात. मग ऐनवेळी नाईलाजाने सावकारीचा हा नवा फंडा गावाला कर्जबाजारी बनवतो. त्यामुळे कृषिव्यवस्था मोडकळीला येते. आणि पुढील काळात या कर्जबाजारी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. खेड्यातील बदलत्या मानसिकतेचं दर्शन आपल्याला या आधुनिक बदलत्या संस्कृतीतून होतांना दिसते.
● हे वाचा – आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?
सामाजीक व राजकीय भ्रष्टाचार, सत्तासंपती साठी चाललेली जीवघेणी स्पर्धा, महागडी बियाणे,वाढलेली मजूरी याने हतबल झालेला कास्तकार मेटाकूटीस यायचा. या बरबटलेल्या व्यवस्थेत गटांगळ्या खात असंतोषच्या वणव्यात भरडल्या गेलेला सामान्य वर्ग व उद्याची परिस्थिती सुधारेल या भाबड्या आशेवर त्यांची शिकलेली पोरं पदव्या घेऊन जीवनाची सुख स्वप्ने उराशी घेऊन हरखून गेलेली.तरीही गरीबीत हार न मानता कष्ट करणारी ही पोरं आपले ओटे खोचून काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या आई वडीलांच्या खांदयाला खांदा लावून शेतात मदत करताना दिसायची.कधी गोठाणावर खयवाडीत बैलबंडी च्या चाकावर तूर ठोकताना तर कधी हातात पाटया घेऊ घेऊ उन्हा, तान्हात तीकांडयावर ऊभं राहून वाऱ्याच्या रोखानं आपली उधळलेली स्वप्नं ऊफणतांना दिसायची. शिक्षणातून, परिणामी बेरोजगारी तून आलेली वैफल्याची जाणीव,पण तरीही प्रतिकूल परिस्थितीत हिम्मत न हारता जगणारी पोरं बाबासाहेबांच्या शिका,संघटित व्हा,संघर्ष करा या विचारांची प्रकर्षाने आठवण होऊन अंगात हत्तीचं बळ संचारून उमेदीनं आलेल्या संकटाशी दोन हात करत उभी रहायची. जगण्याची नवी पाऊलवाट धुंडाळायची.या नव्या पाऊलवाटेनं चालतांना घामातून मातीतून सोनें उगवतांना अपार कष्टातून तडवावर पडलेल्यां धान्याच्या राशीकडे पाहतांना हरखून जायची सारा शीन गळुन पळायचा.आनंदानं मन हरखून जायचं.सूर्य मावळतीला लागल्यावर आपलं घर जवळ करत घामानं डबडबलेली बाया माणसे घराकडे धापा टाकत चालत येतांना दिसायची. संध्याकाळी जंगलातून परत घरी येऊन चूलीजवळ एकत्र बसून सोबत जेवण करून खयवाडीवर पडलेल्या मालाची रखवाली करण्यासाठी बैलबंडीत तडवावर झोपतांना या संघर्षमय जीवनात वर आकाशात पडलेल्यां टीपुर चांदण्यात व नदीकाठच्या थंडगार हवेच्या झूळकीनं मन मात्र हरखून जायचं.
–विजय जयसिंगपुरे, अमरावती.
भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९