📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

“गावचा आठवडी बाजार आणि वहाबभाईचं भातकं | बालपणीच्या आठवणींचा हळवा प्रवास”

On: April 29, 2026 12:44 PM
आम्हाला फॉलो करा:
गावातील आठवडी बाजार, पिंपळाच्या झाडाखाली बसलेले दुकानदार, भाजीपाला आणि चिवडा विक्री करणारे व्यापारी, ग्रामीण जीवनाचे दृश्य
गावातील आठवडी बाजार, पिंपळाच्या झाडाखाली बसलेले दुकानदार, भाजीपाला आणि चिवडा विक्री करणारे व्यापारी, ग्रामीण जीवनाचे दृश्य

गावच्या मारोतीच्या पाराजोळ पिंपळाच्या व वडाच्या झाडाच्या थंडगार सावलीत गावचा आठवडी बाजार भरायचा. पंचक्रोशीतील बाहेरगावची बेपारी मंडळी सायकलीवर कोणी मीनीडोर ऑटोवर कोणी गाढवावर तर कोणी घोड्यावर आपापलं दुकान,भाजीपाला, सामानसुमान लादून बाजाराला आवर्जून हजेरी लावायची. सोनखेड,भुईखेडचे भोई आपली पूर्णा नदीच्या पात्रातील पिकवलेले खरबूज टरबूज विकाले आणायची. चारदोन भाजीपाल्याचीआलू,कांद्याची व दोन तीन पान तंबाखू,गरम मसाल्याचे बेपारी,गावातला चपला शिवणाऱ्या जगदेव चांभार व घाण्याचं पिवर पिवळधम मद्रास तेलाचे पिपे घेऊन एक दोन तेल्यांची दुकाने, बाजुच्या खेड्यातला दाढी कटींगा करणारा शालीकराम म्हाली असायचा. त्याच्या दुकानात बंबाट गर्दी असायची.पैसे कमी म्हालपंचायतीच ज्यादा चालायच्या.

बजाराच्या दिवशी आम्ही झोपेतून उठलेले वंगयलेले थुतरं घेउन टूकूमूकू दुकानदारांच्या करतबी आम्ही न्याहाळता न्याहाळता तिथेच मारोतीच्या पारावर खेयायचो. आपापला बाजारात आणलेला माल नीट उतरून एखाद्या बाजूच्याच घरून तुऱ्हाटयाचं झाडणं आणुन खराखरा बसण्याची जागा झाडल्या जायची. धर्मायाच्या हौदावरून एक दोन बकेटा फफुळळयावर पाणी मारून नीट फारी आथरून विकण्यासाठी आणलेला आपापला माल व्यवस्थीत रचल्या जायचा. कधी कधी ग्रामपंचायतीजोळच्या सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी घरचं कोणी आबा आजी आलं म्हणजे “काबे पोट्टेहो होता की नाही सायाचेहो घरी बे, चल्ले कयकल्या तोंडाचे सातरीतले उठून हातापायावर कुत्रे मुतलेले तसेच सायाचे” म्हणून साजरा कल्ला भेटायचा.


पण तरी हटखोरासारखा आठवडी बाजार पहायचा म्हणजे पहायचा. बाजारातील गांजरं ,बोरं,बैलबंडीतले आमराईतले ताजे आंबे खाण्याची म्हणजे आमची न्यारीच मज्जा होती.बाहेगावाहून गवतात आणलेल्या गावरान आंब्याच्या बंडीवाला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातावर आंबा चोळून मोठ्या हौसेनं रस चोखायला द्यायचा.तेव्हा आमच्या इथं आठवडी बाजारातील वहाबभाईचा प्रसिद्ध चिवडा खुपच प्रसिद्ध होता. मद्रास तेलातला घरच्याच कारागीरानं तयार केलेला असा खमंग चिवडा आजूबाजूच्या पंचक्रोशीत लयच फेमस होता.त्याले आम्ही भातक़ं म्हणायचो. मस्त मिटक्या मारीत आम्ही ते चवीनं खायचो.त्या दिवशी सर्व मजुरांचे चुकारे भेटल्याने बाजार झाल्यावर प्रत्येक जण हे भातकं आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारातून मुलाबाळांना हमखास खायला घरी न्यायचा.


तेव्हा मोठं कुटुंब असल्याने व कोरडवाहू शेती असल्याने उत्पन्न कमी खाणारी तोंडे जास्त त्यामुळे परिस्थिती जेमतेमच होती.त्यामुळे वडील शेजारच्या डॉक्टरांच्या खटल्यात हप्त्यावारी कामाला असायचे. बैल चारण्यापासून तर शेण काढण्यापासून तर त्यांच्या घरचा बाजारहाट करण्याची सर्व जबाबदारी वडीलांवरच असायची. बाजाराच्या दिवशी पैसे भेटले म्हणजे आम्ही थैली पकडून आठवडी बाजारात जायचो. व बाजार झाला म्हणजे वहाबभाईचं भातकं घरी आवर्जून आणायचो. हिरव्या कांद्याची पात,संभार,मुरमुरे, फुटाणे,थोडंसं तिखट मीठ टाकून त्याचा आकार वाढविल्या जायचा मंग कागदावर प्रत्येकाला ज्याचा त्याचा समान हिस्सा दिल्या जायचा. तरी आम्ही आपलपोटे भावा बहिणींच्या भातक्याकडे बघून “तुमच्या मांग पा किती मोठ्ठं माकड आलं” म्हणून त्यांनी बघीतल्याबरोबर मोठ्या शिताफीने त्यांच्या पिलेटीतल्या एकदोन पापड्या उचलून घ्यायचो.लक्षात आल्यानंतर समोरचा पोरगा पाय घासून भोकाड पसरवायचा. अशी तर गंमत होती. ती. ते दिवस आता पुन्हा येणे नाही.


असाच एकेदिवशी बाजूच्या गावात शनीवारचा आठवडी बाजार असल्याने वडील सायकलच्या कॅरीवर थैली लटकून बाजारात जाण्यासाठी निघाले. तेव्हा मी जेमतेम सातव्या वर्गात होतो.मी पण आठवडी बाजारात येण्यासाठी वडीलांकडे हट्ट धरला होता पण उन्हाच्या दिवसात बाबांनी मले संग न्यायचं मुद्दाम टाळलं.तरी त्यांच्या चोरून नजर चुकवत पाच कोस मी विना चप्पल अनवाणी पायीच पयत,पयत भरदुपारी उन्हातान्हात ट्रका वाल्यांच्या नजरा चुकवत त्या गावात आठवडी बाजारात पोहचलो होतो. रस्त्यात एकदोन गुराख्यांनीही मले हटकलं तरी चालत रायलो.डांबरी सडकेचे चटके झोंबल्यानं नाजूक तयपाय साजरे भाजून निघालेले पण त्या अल्लड वयात ते जाणवत नव्हतं.पण बाजारात आल्यावर वडील कुठेच दिसत नाही म्हणून मोठमोठ्यानं हमसून,हमसून रडायला लागलो. परक्या गावात कोणी ओळखीचं ना पाळखीचं होतं.रडत रडत मी वहाबभाईच्या दुकानासमोरून जातांना त्यांनी गिऱ्हाईकी करतांनाही मले पाहिलं”ये तो पहचानका लडका लगता” त्यांनी मला,”रो मत बेटा| तेरे पिताजी इधरही आयेंगे” पांढरी शुभ्र लांब दाढी असलेल्या व पान खाऊन लालभडक ओठ रंगलेल्या व धर्मानं मुस्लिम असलेल्या उमद्या मनाच्या वहाबभाईनं मले जिलेबीचा तुकडा खाण्यासाठी देला,त्यांनी मले त्यांच्याच दुकानात बसवून ठेवलं‌. त्यांना पक्कं माहिती होतं की कोणत्याही खेड्यातला बाई, माणूस बाजार केला म्हणजे भातक्यासाठी आपल्याच जोळ येतो म्हणजे येतो हे त्यांचं गणीत पक्कं होतं.

खरचं अर्ध्या तासात वडील भातकं घेण्यासाठी तिथे आल्यावर त्यांना हे सारं प्रकरण समजलं. त्यांना बघून मले बरं वाटलं. आंगातला सारा शिन निघून गेला होता.त्यांनी भातकं तर घेतलं पण नवीन सॅंडो बनीयन चड्डीचा कोरा जोळ माझ्या पुढ्यात ठेवल्यानं मले एवढा हरिख झाला की त्याची भरपाई मी आजही करू शकत नाही.आजही त्या आठवडी बाजारातील वहाबभाईच्या खमंग चिवडयाची अर्थात भातक्याची चव अजूनही माह्या जिभेवर रेंगाळते ती जशीच्या तशीच.

विजय जय्सिंग्पुरे

प्रा. विजय जयसिंगपुरे

अमरावती

भ्रमणध्वनी-९८५०४४७६१९

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now