
वैचारिक स्वावलंबन असायलाच हवे! प्रत्येक गोष्टीसाठी इतरांच्या सल्ल्याची गरज असणे हे मानसिकदृष्ट्या स्वतःचे खच्चीकरण करण्याचाच एक भाग म्हणता येईल. स्वतःवर विश्वास असल्यावर ही केविलवाणी वेळ येत नाही. पण बऱ्याचदा आपणच स्वतःला तसे बनवत आलेलो असतो. एखादे काम करण्यापूर्वी इतरांच्या मेंदूने काम करणाऱ्या माणसाच्या स्वभावात नकळतपणे बांडगुळवृत्ती वाढीस लागते.
स्वतःचे असणारे मोल आपण कमी करत करतो आणि स्वतः केलेल्या कोणत्याही कामाला इतर लोक काय म्हणतील? त्यांना आवडेल का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याच्या नादात आत्मविश्वास कमी करतो. बरं ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच लोकांकडून मिळवायची असतात ज्यांना आपल्या कर्तृत्वाची कदर नसते. आपल्यातील उमेद कमी करण्यासाठी जे नेहमी सक्रिय असतात अशा माणसांकडूनच चांगुलपणाचे प्रमाणपत्र मिळविण्याचा अट्टाहास निराशेचे ढग दाखवत असतो. एखाद्या कामाकरिता मार्गदर्शन नक्की घ्यावे पण ते अशा व्यक्तीकडून घ्यावे ज्याला आपल्या अस्मितेबद्दल आस्था आहे.
अन्यथा माकडाला आल्याची चव विचारल्यासारखे होणार! स्वतःच्या अस्मितेवर, प्रतिभेवर विश्वास ठेवून काम करणारी कितीतरी माणसे आज यशाच्या शिखरावर पोचलेली आहे. आपल्याला ही बाब स्वतःला ठणकावून सांगण्याची नितांत गरज असते. तरच आपण कोणत्याही कामाच्या, विचारांच्या बाबतीत स्वावलंबी होऊ.
आपल्या आतील शक्ती ओळखणारी व्यक्ती फक्त आपण स्वतः आहोत या गोष्टीचा विसर पडता कामा नये हेही तितकेच महत्वाचे!

डॉ. मंगल कचरू सांगळे
लेखिका व कवयित्री कोषाध्यक्ष मसाप सिन्नर, पत्रकार,
संचालिका तरुप्रीत प्रकल्प मराठी विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी- के. व्ही. एन. नाईक महाविद्यालय सिन्नर
संपर्क- sangalem704@gmail.com
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!