एका संध्याकाळी आजोबांची मैफल जमली. एक आजोबा सांगत होते. “आमच्या मुलानं जुना टीव्ही विकला, आणि भला मोठा नवा टीव्ही आणला. तुम्हाला म्हणून सांगतो, मला जरा वाईट वाटलं. जुन्या काळी पै पै साठवून, मी तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतला होता. पोरानं शब्दानं तरी विचारायचं ना.
म्हातारं झाल्यावर कोण काय विचारतो म्हणा. आपल्याला कारभाराच्या सवयी लागलेल्या. खरं म्हणजे हळूहळू सगळे अधिकार सोडून, शांतपणे जगायला पाहिजे. पण लहान पोरांत आणि म्हाताऱ्या माणसांत तसा काही फरक नसतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. सगळं कळतं, पण वळत नाही.
तर मुलगा म्हणाला, ‘बाबा, तुम्हाला कमी दिसतं म्हणून, मोठा टीव्ही आणला.’
मी म्हणालो, ‘बापाची काळजी असणारी अशी मुलं आजकाल दुर्मिळ झाली आहेत.’ तेव्हा तो छानपैकी हसला. त्याला वाटलं की आपण म्हाताऱ्याला फसवलं. मात्र, त्याची बायको महिन्यापासून मोठ्या टीव्हीसाठी मागं लागली होती, हे मला माहित होतं, पण आपण कशाला बोलायचं तसं.”
दुसरे आजोबा सांगत होते. “म्हातारे म्हणजे परावलंबी. पण आपण असे तरुण असल्यासारखे जोमानं राहायला जातो, ते काय खरं आहे का गड्यांनो.
शेजारचा सीतारामभाऊ नाही का, गात्रं शिथिल झाली तरी, काठी न घेता फिरायला गेला, आणि आदळला डांबरी रस्त्यावर. नवा खुबा टाकावा लागला. पुन्हा आम्हाला फोन करुन सांगतो, ‘या घरी, नव्या खुब्याचा चहा पाजतो.’ अशी गंमत.”
“आमच्या पलीकडचा शांताराम काल मला म्हणत होता, चहा देताना माझी सून डोक्यावर पदरच घेत नाही. मी त्याला सांगितलं, माझी सून मला चहाच देत नाही, आता बोल. अरे, तुला चहा मिळतोय ना, मग तुला पदराचं काय घेणं आहे, बाबा. तिच्या नवऱ्याला जसं आवडतंय तशी ती राहते. अहो, घरातल्या म्हाताऱ्या माणसांना आवडेल असं राहणारी सून दाखवा, अन् माझ्याकडून हजार रुपये घेऊन जा. काळाबरोबर बदलायला पाहिजे ना आपणही.”
तिसरे आजोबा सांगत होते. “माझे एक जोडीदार रामभाऊ म्हणतात, पेन्शनमुळं आपलं म्हातारपण बरं आहे. कसलं खरच बरं आहे. अहो, पेन्शन ठेवली पाहिजे ना आपल्याजवळ. ज्यांना पेन्शन आहे, त्यांची वीस-पंचवीस तारखेपासून चांगली सेवा सुरु होते. विशेष म्हणजे, महिनाभर म्हाताऱ्याकडं पाहायला वेळ नसलेल्या कुटुंबाला, एक तारखेला त्याच्यासाठी भरपूर वेळ असतो. एकदा पेन्शन कुटुंबाच्या पदरात पडली, की पुन्हा म्हातारा वीस-तीस तारखेपर्यंत कुचकामी.
अहो, तो आपला नानाभाऊ नाही का, तो तर पेन्शन मिळाली की, काही पैसे पायमोज्यात दडवून ठेवायचा. सुनेच्या हे लक्षात आल्यावर, ती आता त्याचे पायमोजे रोज धुवायला मागते. एरवी, भूल देण्याइतपत वास मोज्यांना यायचा, तरी धुतले जात नसायचे.”
चवथे आजोबा सांगत होते. “आपण कुणाला काही समजावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. काही माणसं मरताना देहदान करतात. मग रुग्णालयात त्यांच्या शरीरावर प्रयोग होतात. तसे आपल्या म्हाताऱ्या माणसांवरही मरण्याच्या अगोदर कुटुंबा कुटुंबात प्रयोगच सुरु असतात. रुग्णालयातला तो देह तक्रार करतो का.? नाही ना. तशी आपणही कुटुंबात करायची नाही. घरात हक्क गाजवायचा नाही. कर्तेपणा सोडून द्यायचा. कुणाला उपदेश करायचा नाही. घरातल्यांना आवडेल इतकंच त्यांच्यावर प्रेम करायचं.
घरात कुणी नवीन आला, की लगेच त्याच्या पंचायती सुरु करायच्या नाहीत. कुणाची निंदा करायची नाही. ताटात भाजी धडाची येत नसेल, तर आपलंच तोंड म्हातारपणामुळं बेचव झालं आहे, असं समजायचं.
निसर्ग म्हाताऱ्यांची गात्रं शिथिल करतो, ती शिक्षा नव्हे. तर वरदान समजायचं. घरातील न पटणाऱ्या गोष्टी दिसू नयेत, म्हणूनच डोळे अधू झाले आहेत, असं समजायचं. मग कुणी केलेलं भडक मेकअपही सौम्य दिसू लागतं.
ऐकायला येत नाही तेही बरंच म्हणायचं. नाहीतरी, आपल्या म्हातारपणाविषयी जे बोललं जातं, ते ऐकण्यासारखं नसतंच.”
पाचवे आजोबा सांगत होते. “हात-पाय चालतात तोवर सकाळ-संध्याकाळ फिरायला बाहेर पडत जा. आपण सारे म्हातारे एकत्र आलो, की कशा छान गप्पा होतात. शिवाय, घरच्यांनाही जरा मोकळेपणा मिळतो. सकाळी जागीच जमेल तेवढा योगा केलेला बरा. चला, आज मी एकटाच बोलतोय, म्हणून तुम्ही कंटाळला असाल. इतका का बोललो, तर आता पंधरा दिवस आपली भेट होणार नाही म्हणून.
आमचा थोरला मुलगा तिकडं दूर राहतो, म्हणजे आमच्या तीन पोरांनी मला पंधरा पंधरा दिवस वाटून घेतलेलं आहे. सकाळीच इथल्या सुनेने पिशवी भरली, आणि आठवण करुन दिली, की इथले पंधरा दिवस संपले. निघा हवा बदलायला.
आता मी ज्या घरी जाणार आहे, त्या घरातल्या सुनेला पंधरा दिवस अमावास्या वाटणार. त्यांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. सुना पडल्या परक्या. आपलंच रक्त धडाचं असलंं पाहिजे ना.”
सहावे आजोबा सांगत होते : अहो, घराघरातल्या म्हाताऱ्यांच्या गमती सांगायला लागलो, तर मोठा ग्रंथ तयार होईल. त्यापेक्षा मी काय सांगतो ते नीट ऐका, आधी हे लक्षात घ्या की, आपला काळ आता गेला. आता ही पिढी आपल्याला बिघडलेली वाटते, पण, ती तिच्या जागी बरोबर आहे. पुढची पिढी यापेक्षा आधुनिक असेल.
आपण तरुण असतानाच्या काळात मोबाईल फोन, स्मार्ट फोन असते, तर आपणही हेच केलं असतं की नाही. अहो, इतकं वय झालं, तरी आपण व्हाट्सऍप, फेसबुक वापरतोच ना. मग ती तर तरुण पोरं आहेत. काळ घडवतो आणि बिघडवतोही. मोबाईलने डोळे जातील, डोकं चक्रम होईल, तेव्हा माणसाचा मोबाईलचा नाद आपोआप बंद होईल.
सकाळी सूर्य आभाळात लाली पसरतो. मावळतानाही तो तक्रार न करता, आकाश रंगवूनच बुडतो ना. बस्स, आपली आयुष्याची संध्याकाळ अशीच घालवायची. सूर्यासारखी. भोगाची सारी उष्णता पोटात दाबून.!
आयुष्यभर नोकरी, करियर, पैसा याच्यामागे धावणारा पुरुष, कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, निवृत्त झाल्यावर त्यांच्याकडे वेळच वेळ असतो, पण कुटुंबाला आता त्यांना द्यायला वेळ नसतो, त्यांच्याशिवाय जगण्याची कुटुंबियांनाही सवय झालेली असते, त्यामुळे आता मिळालेल्या वेळेचे करायच काय, असा प्रश्न निर्माण होतो, आणि मग तो अस्वस्थ होतो.
हल्ली उतारवयातील बहुतेक कुटुंब दोनच माणसांचे आहे, आणि तेच जर एकमेकांना समजून घेण्यात कमी पडले, तर आयुष्याची संध्याकाळ सुंदर कशी होणार.!
हातात वेळ असतो तेव्हाच, आपल्या जोडीदारासाठी वेळ द्यायला हवा, अन्यथा नंतर आपल्याला वेळ असेल, तेव्हा आपल्या जोडीदाराला वेळ नसेल, आणि गैरसमज वेळीच दूर झाले, तरच आयष्याची संध्याकाळ सुंदर होत असते.
आपल्या संसाराच्या जोडीदाराला जपू या, काळजी घेऊ या, सुखसमाधान देऊ या. आपल्या त्या जोडीदाराशिवाय आपले जीवन एका वाळवंटासारखं असतं, हे विसरून कसे चालेल.
चला आता आपआपल्या घरी, आपली सवंगडी (नातवंड) आपली वाट बघत असतील.
*(सर्व जेष्ठांना समर्पित)*