दरवर्षीप्रमाणेच औंदाही पचमढी मध्यप्रदेशात असलेल्या चौऱ्यागडावर जाण्यासाठी शालक्या उत्सुक होता.तसं त्याच पिढीजात परंपरागत ठाणं चौऱ्यागडच होतं. त्याच्या बापजादयापासून ही मोठ्या महादेवाच्या पुजनाची पंरपरा घराण्यातच होती. सोयऱ्या धायऱ्याईलेही त्यांन फोनाफोनी करून कोणाले बजारहाटाच्या गावात भेटलेल्या पावन्या-रावन्याईजोळ निरोप धाडला होता.सिताराम बुढयाच्या खटल्यात सारा ‘बचपणा’ गेलेला शालक्या तसा इमानदार व काटक गडी होता. दररोजच्या सामानापासून तं सणावारापासून सामानाची सारी खरेदीची जबाबदारी सिताराम पाटील त्याच्या वरच सोडून देत होता. एका नव्या पैशाचाही घापला शालक्यानं हिसोबात आजपर्यंत केला नव्हता. सिताराम बुढयाचा तो विश्वासु घरगढी होता. गावाच्या मध्यभागी एकरभराचा मोठा सागवानी वाडा असलेला व सत्तर एककर जमीनजुमला पाठीमागं असलेला मोठा असामी पाटील पण शालक्या च्या घरी गेला म्हणजे साजरा बकरीच्या दुधाचा सिंगलभर च्या पेल्याबिगर घरी येत नव्हता. तोही सिताराम बुढयाच्या खटल्यात कोणताही किंतु,पंरतु न ठेवता बेलाशाक आपलच घर समजून वावरत होता. गावच्या नाल्याच्या काठावर त्याचं तुटकं,फुटकं झोपडं होतं. खाली गोदरीचा मोठा बेशरमीनं दाट भरलेला नाला गेलेला. समोर गोठानाचा रस्ता व गावची सारी ढोरं बसायची जागा असलेला दोन हातांच्या कवट्यात मावत नसलेला दाट सावली पडणारा घनदाट वड.समोर कोळ्ळीठाक पाणी नसलेली नदी.तसा तो खानदानी पारधी समाजाचा असल्यानं या कामा खेरीज सणासुदीच्या दिवसांत डफळं वाजून बिदागिरी मांगायचा. त्या बदल्यात गावकरीही शालक्याच्या पदरात पुरणाच्या पोया,साराची भाजी, भजे,कुरोळया, उडदाच्या दायीचे वडे, साधी पोयी असं बरंच सामान तो पाटीभरून घरी आणायचा. त्याच्या लेकराचीही आठक दिवस साजरी हौस फिटायची.लेकरांना सणासुदीचे साजरं गोडाधोडाचं चांगलं,चुंगलं खाले भेटायचं.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
“आपल्या गावपांढरीचे उपकार आपुन आजलोक जगलो, आजपर्यंत आपुन उपाशी रायलो नाही” हीच परोपकाराची भावना त्याची रहायची. गावरहाटीशी आपसुकच घट्ट नाळ जुळलेला शालक्या देवाधर्मातही काही कमी नोता. त्याच्या मोडक्या,तुटक्या शेणानं सारवलेल्या कुळाच्या घरात शंकराचा मोठा फटू कुळाच्या नेटानं बांधून उभा होता. प्रत्येक महाशिवरात्रीले तो मोठ्या महादेवाले जायचा.मनोभावे हात जोडून ‘सुखाशी ठेव रे भोल्या’ अशी आर्त हाक मारून भक्तीभावानं शंकराले मागणं मागायचा.या वर्षीही त्याचा बेत होताच. त्यासाठी त्यांन पैशाअदल्याची जुळवाजुळव, उसनवारी केली होतीच.दररोज झाकठीतच जाऊन वखरानं पाटलाची पंधरा एकरातली पऱ्याटी पाडली होती.व नवरा बायकोंंनं उन्हातान्हात येचवाच करून पेटोपाटो करून देली होती.काही तुऱ्याटयाचे दोनेक भर बैलबंडीनं आणून आपल्या घराची डागडुजी करून घेतली. आपल्या न्हाणीच्या नवीन बेफाटया तोडून आणून साजरा नवीन तुऱ्याटया,पऱ्याटयाईचा कूळ भरून घेतला होता. मोठ्या महादेवावरून घरी आल्यावर घरी भंडाऱ्याचा कार्यक्रम म्हटला म्हणजे पावणा रावणा येणारच होताच. त्यांची सोयसाय लावण्यात कसर पडाले नको म्हणून पाटला जोडून त्यानं आपली कामाधंदयाची मजूरी व काही आगाऊ शिल्लकही मागून घेतली होती.त्याच्या बायकोनं गोठाणावरं घमेलंभर साजरं शेणसान जमा करून घमेल्यात डोस्शावर आणून साजरी ओसरी लिपलाप करून घेतली होती.शेणाच्या सारवनानं घरं कसं लख्ख करून टाकलं होतं.बकऱ्याईचे खुटे कसे व्यवस्थीत करून टाकले होते.पुंजेसाठी मारवाडयाच्या दुकानातून राय,कापुराची बट्टी, उदबत्ती गुलाल अंगार डब्बी,नारय सारं सामानं आणून घेतलं होतं. भिका मांगाजोळून साजरं नव्या पानाचं कोरं डफळं मळवून घेतलं होतं. शालक्याच्या बायकोनं त्या नव्या कोऱ्या डफळयावर कुकू भिजून स्वस्तीक काढली.मोठया महादवाले जाण्यासाठी आठ,दहा माणसाईचा पयला जथ्था तयार झाला होता. रस्त्यात भूक लागू नये म्हणून संग साजरी बेसन भाकरीची शिदोरी बांधून घेतली.बडनेऱ्याच्या ठेसनातून एक वाजताची रेल्वेगाळी होती. ठरलेल्या नियोजित वेळेवर रेल्वे गाळी स्टेशनात आली.जशी गाळी आली तसा जथ्था गाळीत लोटत पाटत शिरला.व गर्दीत न जाता संडासाजोळच्या मोकया जागेवर संग आणलेली फास्फेटची फारी आथरून बसला. मस्त तालावर दोन चार शंकराची गाणी म्हटली.
‘अशा भयान्या वनात,अशा भयान्या वनात माह्या चवऱ्या नांदतो गा महादेवा. माह्या चवऱ्या नांदतो.
अशी मोठ्यानं लकेर उठली होती.शालक्यानंही डफळयायावर ताल धरला होता.
‘महादेवाच्या वाटेनं गा घोटया घोटया पाणी,नंदी लागलें गा पवाळणी,नंदी लागले पवाळणी. हरं बोला महादेव.
आजूबाजूचे लोकं उत्सुकतेने त्याईच्या या भावभक्तीकडे डोळे भरून पाहत होते.सारेच गावखेडयातले गरीब मजुरी करणारे होते.पण महाशिवरात्री निमित्ताने शंकराच्या दर्शनाची आस्था, श्रद्धा मनातून ओंसडून बाहीर वाहत होती.डोयाले आपसुकच धारा लागल्या होत्या.उर दाटून आला होता.कधी चवऱ्याचं दर्शन होते याची आस परतेकाच्या मनाले लागलेली.आगीन गाडी रस्तानं धावतच होती. गाडीतच साऱ्यांनी घरून आणलेल्या शिदोऱ्या सोडल्या व संगमंग जेवणं उरकून आपली भूक भागोली.दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा उपासच होता. एकदाचं एमपी (मध्य प्रदेशाची ) हद्द सुरू होऊन गाडी पंचमढी येथे थांबली.तेथून जवळच असलेल्या चवऱ्या गडाची पायदळच साऱ्यांनी वाट धरली.हे ठिकाणही रमणीय होतं म्हणजे धार्मिक शंकराचं ठाणं असलेलं ठिकाण.
येथे शंकराची मोठी गुफा आहे. दरवर्षी शिवरात्रीला मोठी यात्रा भरते. आठवडाभर चालणाऱ्या या जत्रेत दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येतात. ही जागा बैतूल जिल्ह्यातील विकास ग्रामपंचायत अंतर्गत येत असून बरेच भाविक येथे दर्शनासाठी येतात.तसंच ठिकाण महाराष्ट्रातील सालबर्डी म्हणजे अमरावती जिल्ह्यातील मोर्सीजवळच्या टेकडीवरही महाशिवरात्रीले मोठी जत्रा भरते. ज्यावर एका गुफेत भगवान शिवाची मूर्ती आहे. साधारणपणे असे मानले जाते की या गुफेच्या खालून पचमढी येथील महादेव टेकडीवर जाण्याचा मार्ग आहे.असे जुने लोकं सांगतात.मोठया महादेवाची ही अशीच कथा आहे. चौऱ्या नावाच्या एका ऋषीनं येथे तप केलं म्हणून त्याले चौऱ्यागढ असं नाव पडलं आहे. सालाबर्डीचही तसंच आहे हे गाव त्याच्या नयनरम्य निर्णयासाठी आणि भगवान शंकराची प्राचीन गुहा आणि त्यातील सर्वात जुने शिवलिंग यासाठी प्रसिद्ध आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे निसर्ग स्वतःच भगवान शिवाचा अभिषेक अविरतपणे करतो. टेकडीवरून शिवलिंग अखंड वाहत आहे. पौराणिक काळापासून हे शिवलिंगच उद्भवले असल्याची आख्यायिका आहे. हे ठिकाण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र प्रांतातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी शिवरात्रीला मोठी जत्रा भरते, त्यात लोकांची गर्दी हा कुतूहलाचा विषय असतो. दरवर्षी सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात सुमारे ७५ हजार ते एक लाख भाविक जमतात. जत्रेचे मुख्य वैशिष्ट्य जे इतरत्र आढळत नाहीं.याचे अनोखे उदाहरण म्हणजे दुर्गम वाट ओलांडूनही रात्रंदिवस स्त्री-पुरुषच नव्हे, तर लहान मुलेही दर्शनासाठी येतात. शिवगुफा हे गाव गावापासून सुमारे तीन किमी वर डोंगरावर वसलेले आहे, एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवणे मोठं अग्नीदिव्यच आहे. शिवगुफा पर्यंत पोहोचण्याच्या मार्गाच्या दुसऱ्या बाजूला निसर्गाने आपले सौंदर्य मुक्त हाताने उधळले आहे. सर्व प्रथम, सीता न्हानी नावाचे एक ठिकाण आहे जे एकेकाळी गरम पाण्याच्या जलाशयासाठी ओळखले जायचे. समोर गंगेच्या पाण्याच्या प्रवाह डोळ्यात साठवून ठेवण्याजोगा आहे. वर्षभरात देखील सतत पाहिले जाऊ शकते. प्रवासी जेव्हा 3 किमी लांबीची चावरी पार करून शिवगुफामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला अलौकिक शांततेचा अनुभव येतो आणि प्रवासाचा सगळा थकवा काही क्षणातच निघून जातो. शिवगुफाच्या मधोमध आणखी ३-४ गुहा आहेत, त्या संदर्भात असे म्हणतात की या लेण्यांमधून महादेवाचा मार्ग म्हणजे पचमढीपर्यंत पोहोचतो. असेही सांगितले जाते की,भगवान शिव जेव्हा भस्मासुर नावाच्या राक्षसाचा पाठलाग करत होते तेव्हा शंकरजीने या गुफेत काही काळ आश्रय घेतला होता. टेकडीच्या कडयावरील पांडव गुंफाही प्रसिद्ध आहे, तिथे त्या वेळी अज्ञातवासात पांडव स्थायिक झाले होते.तसंच सालबर्डीचही वैशिष्ट्य म्हणजे हे गाव अर्धा मध्य प्रदेश आणि अर्धा महाराष्ट्रात विभागलेले आहे. अशा प्रकारे, हे गाव दोन भिन्न संस्कृतींच्या अद्भुत संयोगाचं प्रतीक आहे.तसंच तितकच महत्व मोठ्या महादेवाचं आहे.
खांद्यावर त्रिशूळ डमरू घेऊन जथ्था मोठ्या महादेवाच्या पायथ्याशी पोचल्यावर साऱ्याईनं पाण्याच्या टाकीवर हातपाय धुवून पोटभर पाणी पेऊन मनोभावे दर्शन घेतले.साऱ्या रातभर शंकराच्या गाण्यानं,भजनानं परिसर दुमदुमून गेला होता.हातात त्रिशूळ,डफावर गाणी म्हणत जत्थे ही अवघड वाट मोठ्या भक्तिभावानं पार करत होते.हर बोला महादेव असा गजर मध्ये मध्येच उठत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता, शांतता होती.दुसऱ्या दिवशी सकाऊनचा च्या, नाश्ता घेऊन परतीच्या प्रवासाची वाट धरली.’हर बोला महादेव’ गाडीत आवाज दुमदुमला जत्था गावाकडे वापस आला होता.दुसरा दिवस उजाडला होता. महाशिवरात्रीची जत्रा पार पडल्यावर मावंदाचा कार्यक्रम करण्याचा ठरला. तोही दिवस लवकरच उजाडला. शालक्यानं बाजूच्या गावात जाऊन आंब्याच्या झाडाची पानं आणुन साजरी हिरवीगार मनमोहून घेणारी तोरणं घराच्या दाट्टयाईले बांधली. सग्या,सोयऱ्याईनं ओटे खोसून सयपाकाले सुरूवात केली. भावकीतले धरून पन्नासक माणसाईचा महाप्रसादाचा सयपाक होता.शालक्या व त्याच्या चुलत भावानं वानोशयाच्या बजारातून आणलेले आलू,वांगे पावशा,इवे घेऊन चिरचार केले.बाया मंडळीनी लसन,संभार,निवळनावळ करून खलबत्यात साजरा कांडकुंड करून भाजीले फोडणी देली. दुपारचं उन्ह चांगलं डोक्शावर आलं होतं.सयपाक जवळपास उरकतच आला होता. मनोभावे पुंजा केली गवरी जाळून त्यावर धूप,राय जायली. त्याचा मस्त सुगंध वातावरणात फयलला होता. शंकराच्या फोटोपाशी व गावच्या महादेवाच्या देवळात निवद दाखवला होता. फाऱ्या आथरून अंगारी पंगतीत फिरवून साऱ्याईची पंगत जेवायले बसली. साऱ्याईचे जेवणं खावणं झाल्यावर सपरीत टाकलेल्या तळवावर पानपुडा आणून पावन्या,रावन्याईनं चुना कात लावून पानं खाल्ली.तो पर्यंत बाया मंडळीनी पुरा भांडोळा घासून चक केला होता. संध्याकाय झाली होती.शालक्यानं सरपंचांच्या घरून मोठी सतरंजी मागून आणून समोर ओसरीत आथरूली. गावातल्या भजन मंडळाच्या भजनांचा कार्यक्रम ठेवला होता. उजेडासाठी त्यांन काशीरामच्या घरचा वायर आणून सपरीत लाईट व्होल्डरात फिट करून घेतला. सारी व्यवस्था झाल्यावर एकदाची भजन मंडळी आली.व परतेकाले कुकुवाचं बोट लाऊन भजनाले सुरूवात झाली.
‘या कलीयुगाच्या ठायी हो$$ या नाथा रे माझ्या,अगा कोणी नाही कोणाचे ,भोल्या कोणी नाही कोणाचे.अंती जाणे केल्याचे गा महादेवा ,अंती जाणे एकल्याचे हर बोला महादेव.
चौऱ्यांच्या गड गा $$ अन् देवा रे माझ्या,गड तलवारीची अणी गा,तेथे न चाले कोणाची वाणी गा महादेवा तेथे न चाले वाणी.असा हुंकार भरत होता.
अशी भजनाची मांडना होती.ही अंधश्रद्धा नसुन पंरपरेने चालत आलेल्या लोकसंस्कृतीचं एकप्रकारे दर्शनच होतं. या पंरपरेने चालत आलेल्या संस्कृतीले माणूस घडवत नसून, संस्कृती मात्र माणसाले घडवते.याचंच हे दृश्य होतं.हेच शालीकरामनं वाडवडीलांपासून पुर्वापार चालत आलेल्या पंरपरेचं प्रतिक त्यानं जोपासलं होते.जशी जशी रात चढत होती तसतशी भजनात रंगत भरत होती.परतेक जण जीव तोडून जील ओढत होता.निळ्याशार अभायातून प्रकाशमान झालेला चंद्र डोक्शावर आला होता.सामसुम झालेल्या वातावरणात कापूर पेटवून आरतीनं भजनाची समाप्ती झाली होती. प्रपंचासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या थकल्या भागल्या जीवाला राब राब राबून थोडी उसंत या रहाट- गाडग्यातून क्षणभर मिळावी म्हणून ही लोकसंस्कृती त्यांच्या दुखऱ्या मनावर सुखाची फुंकर मारणार होती एवढं मात्र नक्की.
– प्रा.विजय जयसिंगपुरे
अमरावती.
९८५०४४७६१९