ऊच्चशिक्षितांची निरक्षर माता राधामाय.!
डोंगर पायथ्याशी वसलेलं यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तहसिलमधलं करजगांव हे गांव. तसं पाहिलं तर सारं करजगावच राधामायचं गणगोत होतं. गावातील प्रत्येक पुरुष तिच्या नात्यात होता. कोणी तिचा बाप, कोणी भाऊ, कोणी काका, कोणी मामा, कोणी दिर, कोणी भासरा, कोणी सासरा, तर कोणी मुलगा होता. आणि असंच नातं तिचं प्रत्येक बाई सोबतही होतं. भिकारी, म्हाताऱ्या बाया, सासुरवाशिणी सूना यांचं हक्काचं आणि मदतीचं ती आश्रयस्थान होती. गावातल्या प्रत्येकाशी तिचे प्रेमाचे आणि फार आपुलकीचे संबंध होते. सारं गाव तिला प्रेमानं राधु म्हणायचे..!
जवळपास साडेपाच फूट उंच, तेवढीच अंगात भरलेली, गौर वर्ण, छान आकर्षक चेहरा, नाकी डोळी छान, कपाळावर भलं मोठं कुंकू, (आजीची ही खास ओळख होती) नऊवारी पातळ (लुगडं) यात ती अधिकच खुलून दिसायची. चौदा पंधरा वर्षाची असतानाच राधाचं कृष्णाजी सोबत लग्न झालं.(राधा-कृष्णा हा योगायोग होता) त्यावेळी तिला फारस...