फुलं रंगीबेरंगी का असतात ?
अनेक झाडांची फुलं तर्हेतर्हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार. ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा.प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता...








