झळा…
हल्ली आमच्या साहेबांना
उन्हाच्या झळा
सहन होत नाहीत म्हणतात ..
फारसा उकाडाही
असला की, जीव लाही लाही
होतो त्यांचा….
डोक्यावर सूर्याची किरणे
यायच्या आधी
साहेब बंगल्यात असतात
हल्ली …..
डोकावून बघतात फोटोसन
काचेच्या खिडकीतून
उन्हाचा उकाळा
अन मागवतात कोल्ड्रिंक्स
सुंदर असलेल्या पत्नीला
बाईसाहेब आलिशान
फार मोठया स्क्रीनच्या एलईडी टीव्हीवर
बघत असतात
बिग बीचा सिनेमा
साहेब बूट न काढताच
पसरतात सोफ्यावर
कोल्डड्रिंगचे घोट घेत
मोळीवाल्याचा आवाज
त्या रणरणत्या उन्हात
साहेबांच्या कानावर पडतो
अन लगेच आठवतो त्यांना त्यांचा बाप …….
मोळी घेता काय मोळी
साहेब भिंतीवर टांगलेल्या
घटनाकारांकडे
डोळे भरून बघतात …..
आणि कृत्य कृत्य होतात
मोळीवाल्याचा आवाज साहेबांना
अस्वस्थ करतो
पण …………
– राजेंद्र क. भटकर
बडनेरा