फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव !

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव !

चालोरे डायसाणें होळीर…खेला!

 भारत वर्षात होळी हा सण प्रामुख्याने सर्व जाती-जमातीची लोक साजरा करतात. परंतु बंजारा समाजात होळीचा सण साजरा करण्याची प्रथा फारच  वेगळी असून मनाला अति आनंद देणारी आहे. मुळातच नाच-गाण्यात मदमस्त जीवन जगणारी ही गोरबंजारा जमात होळी सणात आपली पूर्ण हाऊस भागून घेते. गोरबंजारा गणात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळी म्हातारे-कोतारे माणसाला होळी तारुण्य देते. उनाड तरणीबांड पोराना ती चावटपणा देते. मोहाच्या फुलाची (पेलेधारे) फुल दारू पिऊन पक्षपात, वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे विसरून होळी खेळावी ती गोरबंजारा  समाजांनीच. फाल्गुन महिना लागला रे लागला की डपाच्या आवाजांनी  होळी हळू हळू तांडया कडे येते. शेतामध्ये राब राब राबून थकून गेलेले लोक  रोज रात्रीला गोलाकार बसल्याजागी बैठे लेंगी गीत गातात.

डफ धीरो वजारे तारी जाणीं ढळजा, डफ धीरो…वजार ..

डफडारो घोर सामळीं पाणीं भरतु, वुतो फेक दिनी बेडलो…तारी जाणीं…ढळजा..रं.

डफ धीरो वजार…!

भावार्थ: हे मित्रा डफ हळू वाजव तुझ्या डफडयाचा आवाज तिच्या पंर्यत जर गेला तर ति रंगात येईल.ती बैचेन होईल .म्हणून तु डफ जरा हळु वाजव ती आता पाणी भरण्यासाठी आलेली आहे. तुझ्या डफाचा आवाज ऐकू येताच .ती पाण्याला आलेली  गौरी तरुणी पाण्याचे हंडे फेकून नाचू लागेल. एवढी ताकद तुझ्या डफ वाजवण्या मध्ये आहे. म्हणून तु डफ जरा हळु वाजव. होळी माता हिंगळा मातेचे प्रतिरूप असे गोरबंजारा समाजात मानले जाते. पौराणिक कथेनुसार धुंड्या नावाची राक्षसीण तांड्यातील लहान मुले खात असे. त्यामुळे तिचा बंदोबस्त करण्यासाठी फाल्गुन महिन्यातील पुनवेच्या रात्री पूर्ण तांडा काठ्या, लाट्या ,शस्त्रे भाले ,बरची घेऊन तांड्याला पहारा देत उभा होता. झोप येऊ नये म्हणून नाच गाणे दारू पिऊन करत असताना राक्षसीन नायकांच्या घरात घुसली. सर्व तांडा नायकाच्या घरासमोर जमा झाला. शेवटी राक्षसिणीला घरातून बाहेर काढून लोकांनी राक्षसिणीला ठार मारले. त्या आनंदात रात्रभर नाचले. व सकाळी सकाळी तिला तांडा बाहेर नेऊन सार्वजनिक दहन करून आनंदोत्सव साजरा केला. तेव्हापासून आजही तमाम बंजारा तांडयात  होळी सकाळी सकाळी पेटविल्या जाते. या राक्षसीनीला नायकांनी  घरात ठेवल्याबद्दल नायकाला एक रुपया दंड केला. आजही होळीच्या वेळी दंडाच्या रूपाने नायका कडून एक रुपया घेण्याची प्रथा  तांडयात आहे. याच दिवशी तांड्यातील मुले जिवंत राहिली म्हणून होळीच्या दिवशी मुलांचा धुंड (वाढदिवस) आजही गौर वंशीय  करतात .या पौराणिक कथेनुसार आजही तांड्यात होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रथम दिवशी संध्याकाळी तांड्यातील हौसी गेरिया( तरुण) डायसांणे ( वडीलधारी मंडळी) लोकांना सोबत घेऊन होळी खेळण्यासाठी नायका कडे परवानगी मागतात. त्याला वांजणा ( विनंती) म्हणतात .

अनभाईरे, हारे थाके  गेरीया उतरे।

अनभाईरे , आयेन  उभे रक नायकेरे,दरबार

अनभाईरे नायकन दिनी एक रपीया पायजो।

पाचणं माणो एक पचीस तम जाणजो।

ओरी गोरीन दिनी छाळहाल बोकडो पडी तुकारी…बो…..बो…बो।

भावार्थ: थकले भागलेले तरुण व वृद्ध मंडळी नायकांच्या दरबारात हजर झाली असून नायकांनी  दिलेल्या एक रुपयाला आपण पन्नास रुपये म्हणून समजून स्वीकार करूया? व नायकाच्या गोरणींनी (पत्नीनी) सुद्धा एक तरुण बोकड भेट दिला आहे. चला नायकाच्या नावाने आरोळी मारूया! जय जय कार करुया !

या वेळी तांडा नायक यांच्या घरासमोर जमा होऊन खालील लेंगी (गीत) गात  होळीची जागा निश्चित केली जाते.

चालोरे डायसाणें होळीर खेला।

चालोरे डायसाणें होळीर कुथा।।

 भावार्थ: चला मित्रांनो आपण होळी खेळूया आणि होळीची जागा निश्चित करूया? आणि  नायका कडून दंड आलेला  एक रुपया एक खड्डा खोदून त्यात पुरले जाते .व त्यानंतर तेथे एक लेंगी गातात .

पेना रेतेते  डुंगर खोळा अब आये तांडो तांडेम बे।

नागा पुरेरो  नागा स्वामी स्वामीछं. आब  धुत बे ।

भावार्थ :आपण अगोदर डोंगरदऱ्यात होतो आता तांडयात राहतो आहे. नागापूर (राजस्थान मधील उदयपूर जवळी डोंगर)  त्या डोंगरातील नागा स्वामी संत सुद्धा आपल्या तांडयात  होळी खेळण्यासाठी मस्त धुंदीत आला आहे . त्यामुळे आता होळी खेळण्यात मजा आहे. असे नाचत गात असताना मध्येच तांड्याचा नायक त्यांना इशारा करतो. वर्षभरात ज्या कुटुंबात दुःखद घटना घडली असेल त्याच्या घरासमोर  गेरीया (तरुण) जातात. दुखी घरातल्या माणसाला आत्मीयता दाखवितात. आणि त्यांना सोबत घेऊन सांत्वनपर लेंगी गित गातात.

  धरती तोपर अबंर नही रे कोई धरती तोपर..।*

अबंर हेगे एक चांदान सुर्या…ओरे नव लाख तारा…ओरे सोबत रिये..।धरती तोपर…..।

अंबर हेगेर एक सेवान जेता,नवलाख गोर वोर साथ रिये वोरे सोबत रिये धरती तोपर!

अबंर हेगे एक वसंतान सुधा…ओरे नव लाख गोर  ओरे साथ रिये वोरे सोबत रिये धरती तोपर….।।

 भावार्थ: पृथ्वीवर कोणीही अमर नाही मृत्यु हा अटळ आहे. हे चंद्रसूर्य तारे अमर आहेत. हे या लेंगी गीतातून पटवुन देतात ,व सत्य समजावुन सांगतात. मित्रा तुझे दुःख विसरून जा.चल  आपण होळी खेळूया! असे म्हणून बेधुंद होळी खेळतात. असाच क्रम प्रत्येक दुखी कुटुंबाच्या घरासमोर जाऊन नाच-गाणे केल्या जाते.यावरून बंजारा समाजातील एकात्मता, भाईचारा, आत्मीयता आणि माणसा माणसा विषय असलेला प्रेम व जिव्हाळा दिसून येतो. तांडयात जर होळीच्या आसपास कोणी व्यक्ती मरण पावली. तर संपूर्ण तांड्यात होळीचा सण साजरा केल्या जात नाही. तसेच धुंड (वाढदिवस) असेल तरच होळी सण साजरा होतो. त्यासाठी नायकाच्या घरासमोर किंवा मारुतीच्या पारावर होळीच्या आदल्या दिवशी रात्री एका सभेचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये ज्या घरी दिवाळीच्या नंतर मुलगा झाला आहे. अशा लोकांना धुंड (वाढदिवस) करावे अशी विनंती करण्यात येते.  जर जास्तच गरीब कुटुंब असेल तर इतर मंडळी हातभार लावतात. धुंड करायचे  पके झाल्यानंतर दांडो काढेवाळ  दोन तरुण मुलाची निवड केली जाते. यामध्ये ज्या तरुणाचे होळीच्या नंतर लग्न असेल त्या तरुणाची निवड प्रामुख्याने केल्या जाते. यांना गेरीया म्हणतात. व  हे गेरीया ( तरुण)  तांड्यातील इतर तरुण मंडळींना घेऊन रात्रभर होळी पेटवण्यासाठी लाकडे गोळा करतात .व इकडे डायसाणें  मंडळी बेधुंद होऊन डफाच्या तालावर नाचत असते. त्यामध्ये भांड (अशील) लेंगी, धार्मिक लेंगी, प्रेमीयुगुल ,विरह लेंगी असे अनेक लेंगी गातात .

● हे वाचा – मायबोली बंजारा भाषा आणि तिचा अभिजात वारसा

धार्मिक लेंगी

गोपीचंद  रो राजा जोगलिया।

गोपीचंद राजारी माडी हवेली

गोपीचंद राजारी तारांवती राणी

*ओरी माडीन छोडण जोगलीया

ओरी राणींन छोडणं  जोगलिया

गोपीचंद रो  राजा जोगलिया।

भावार्थ: गोपीचंद राजाने सुद्धा माडी हवेली चा त्याग करून जोगी संन्यासी चे रूप धारण केले आहे. अरे मित्रा या पृथ्वीवर या सर्व गोष्टी माणसाच्या काहीच कमी नाही.मोह टाळून हे सर्व त्याग करून माणसाने त्यागी वृत्ती बाळगायला पाहिजे. कशाचाच मोह माणसाला नको? एवढेच नव्हे तर गोपीचंद राजाने स्वतः राणीचा शुद्धा त्याग केला. या गोर गणातील नवयुग तरुणा  त्यागी बन. अशा एक ना अनेक धार्मिक लेंगी गातात व त्यानंतर प्रेमीयुगल लेंगी गाहिल्या जाते.

 प्रेमीयुगल लेगीं

उठ परभातीन केकडा ये छोडी,कादळया मारोये कान मान मनावतु लागी घळी वेळा,केकडा गे बगदान!

माथेपर झारीन ,हाते मायी फुलीया,वलटो परती चाल। दन उंधाळो तावडो तपच छाया देखन बेस।

तेडी मेडी पगडी मत बांधो शोभिया भरमा भरचरे लोग, तारो मारो मतरो एकछं ये शोभनी कायी करीय लोग।

पाच सात भायीर भेन छुरे शोभीया, मातो लिय रे तोड।

पाच सात भायी मारी काई करीय घेरी दियु ये छोडं।

आठसे कराडी नवसे विजळी शोभीया आन पडे समनक!

  भावार्थ :तांड्यातील प्रेमीयुगल दररोज गुरेढोरे चारण्याच्या निमित्ताने एक दुसऱ्यांना भेटत असत. परंतु एका दिवशी कांदळया  नावाच्या कुत्र्याने कान फडफडले ते अशुभ समजून प्रेमिका (शोभनी) जंगलात यैण्यास  तयार होईना.तिला समजावण्यास बराच वेळ जातो. त्यात जनावरे जंगलात गेलेली असतात जनावरे चारा खाऊन पाणी पिऊन कडक ऊन्हात विश्रांतीसाठी बसलेले असतात. (शोभणी)प्रेयसी डोक्यावर पाण्याची झारी, हातात चांदीचा दागिना (फुलिया)  चमकवत चमकवत ती येत आहे. तिचा घागरा एवढा घेरदार आहे. की मागे जाते की पुढे येते अशी गज (हत्ती )चाल.  ही चाल पाहून प्रेमी सोभीया आनंदित होतो. उन्हाळ्यात थंडगार सावली असलेल्या खेचडीच्या झाडाखाली ते दोघे बसलेले आहेत. त्या दोघांमध्ये संवाद चालू असतो. प्रेमिका (सोभणी)  म्हणते (सोभीया ) प्रेमी तुझी डोक्यावरील पगडी दररोज वेगवेगळ्या पद्धतीने वाकडीतिकडी बांधतो. त्याकडे तांड्याचे लक्ष आहे. की  ती तुझ्यात अचानक अनेक बदल कसा झालेला दिसतो. त्यामुळे तांड्यातील लोकांच्या मनामध्ये शंका आहे. त्यावर प्रियकर ( सोभीया) म्हणतो. ये (शोभणी) प्रेयसी तू घाबरू नकोस तुझे माझे एक मत एक मन झाले आहे. तर लोक काय करणार? त्यावर प्रेमिका सोभणी म्हणते  प्रिया माझे पाच सात भाऊ आहेत. त्यांना कळले तर तुला जीवाने मारतील. मला भीती वाटते. त्यावर तो बंजारा शुरविर  प्रेमी (लैला मजनु सारखा दगड खाणारा नाही)  प्रेयसीला शोभणी म्हणतो हे प्रिये तू घाबरू नकोस. तुझ्या  चार-पाच भावाला मी एकटा पुरे आहे. कारण माझ्यात  घेरी युद्ध करण्याचे कौशल्य  आहे त्यातून अभिमन्यू सारखी सुटका मी करून घेईल. असे म्हणत असताना त्यांच्यातील तिचे पाच सात  भाऊ कुराडी, लाठ्याकाठ्या घेऊन समोर उभे राहतात. त्यांच्यात घनघोर युद्ध होऊन तो  प्रियकर सर्वांना पराजीत करतो. तेवढ्यात प्रेयसी बेशुद्ध होते व झारीतील पाणी त्याच्या चेहऱ्यावर टाकून प्रियकर तिला जागवतो. दोघे जंगलात पळून जाऊन आत्महत्या करतात .असे ही अमर प्रेमाची कहाणी आहे. नुसते पुरुषच प्रेमीयुगल लेंगी गात नाही तर स्त्रिया सुद्धा बसून प्रेमीयुगल लेंगी गातात. 

म तो मारे दोसतान  दसती दराई ये!

ओड ओड  दस्ती करच मस्ती..म…तो..हसतीय।

मैं तो हसती कवाड खोलती मैं तो हसतीय।

 भावार्थ : मी माझ्या प्रियकराला सुंदर नक्षीकाम केलेला हात रुमाल घेऊन दिला तो रुमाल घेऊन तो मस्ती करत करत नाचतो आहे. त्याचे उत्साही आनंदी चेहरा पाहण्यासाठी मी माझ्या घराची खिडकी खोलून चोरीने त्याचा चेहरा पाहतो आणि मन भरून येते. नाच गाण्यात दंग असलेली बेधुंद तरुण युवा मंडळीला  चिडवण्यासाठी स्त्रियांचा कल भांड (अशील्ल) लेंगी कडे जातो.

 भांड,अशिल्ल लेंगी

 ई गेरीया मारो कामेरो छेणीं कामेरो छेणीं येन काई छेणीं गेरणी ती भुंडो दिसावचये धाटो धाटो हिंडच। 

भावार्थ : हा गेरीया  (तरूण) आमच्या काही कामाचा नाही त्याच्या जवळ काहीच नाही?  गेरणीं बाईसारखा तोंड करून विनाकारण इकडे तिकडे पाहत आहे. अशा अनेक भांड अशील लिंगी आहेत. पण ते  देणे इष्ट वाटत नाही. अशा प्रकारे रात्र कशी गेली त्याचा मागमूसही लागत नाही. सकाळी होळी दहन करण्याचे आदेश नाईक देतो त्यानुसार होळीचे दहन होते व ज्यांच्या घरी वाढदिवस साजरा करतात. त्यांच्या घरी लाठ्या-काठ्या घेऊन मुलाच्या घरासमोर तांडा जमा होतो मुलगा (पिका) व तिची आई या दोघांना अंगणा समोरील  पाल मध्ये बसवतात. त्यांच्या चारी बाजूला चार खंड (शिरा पुरी) ठेवतात। हे चार खंड म्हणजे जगाचे चार खंडाची मनोभावे पुजा होय. एक लांब काठी मुलगा व आईच्या डोक्यात धरतात. त्या काठीवर हातातील काठीने हळूहळू मारतात. व मुलाला आशीर्वाद देतात. लोकगीतातून……..

*होरे हो चरक चरीया  होरे हो..*

*शिकच शिकावच  सात पोळी खावाच  लाओ खलबत्ता ,खोदो खाड, व ओम बाई  चंपाडाल।*

*जु जु चंपा लेरा लं,तु तु बेटा लेरा लं. *आतरा वोरे काका दादा,आतरा वोरे  भाईबंध*

आतरा वोरो कुटुंब  कवीस चरक चरीया…….

पेलो बेटा नायकी करीय , दुसरो बेटा कारभारी करीय,तिसरा  बेटा खाडु चराव,चौवथो बेटा घोड चराव, पाचवो बेटा छेळी चरावे, सहावो बेटा माँ बाप समाळे,सातवो बेटा हुई सपुती…शिकच शिकावचं होरे….हो… आवडा व्हेगोरे  आवडा……..

 भावार्थ : सगळी कडे आनंदी आनंद आहे रे, लवकर चंपाची वेल घरासमोर लावं चंपाची जशी जशी  वेल वाढेल तसा तसा तुझा मुलगा वाढेल. इतके त्यांचे काका ,दादा, आहेत मोठ्या संख्येने येथे भाऊबंद आहेत .गुरेढोरे  धनसंपत्ती भरपूर आहे .अशा संपन  कुटुंबात मूल जन्माला आलाय त्याला व तिच्या मातेस आपण आशीर्वाद देऊ या… पहिला तांड्याचा नायक होईल, दुसरा कारभार सांभाळेल ,तिसरा गुरेढोरे चारील. चौथा घोडेस्वार होईल. पाचवा शेळ्या बकऱ्या चारविलं.  सहावा आई-वडिलांचा सांभाळ करेल। सातवासपुती  होईल तो सर्वांना ज्ञानदेवी न्याय देईल. मग हातवारे करून आरोळी दिली जाते .मुलगा मोठा झाला रे झाला कदाचित त्यावेळी कुटुंब नियोजनाचे महत्त्व माहित नसल्याने गोरगणात सात  पुत्राचा आशीर्वाद दिला असेल?  होळीच्या दिवशी  तलवार, दांडपट्टा तसेच लाठया काट्या फिरवण्याचे खेळ होतात। तांड्यात आनंद आणि उत्साह वाढत असतो ।मग खुटा वकडेर  कार्यक्रम घेण्यात येतो. ज्यांच्या घरी धुंड  त्यांच्या घरासमोर दोन खुटे  काढतात. आणि खुटे  दोरीने एका  दुसऱ्याला बांधतात .दुसऱ्या लाकडांनी दोन्ही  खुंटे. तरूणांना उकडायचे असते.  तर खुटाच्या आजूबाजूला गेरणी (स्त्रिया)  हातात काठ्या घेऊन उभे असतात. खुटांचे स्वरक्षण त्या करतात . हार जितचा हा खेळ तासभर चालतो. गेरीयांची टोळी खुटयावर हल्ला करते. त्याच वेळी स्त्रिया लाठ्या काठ्यांनी खुटे उपडनाऱ्या  पुरुषांना   झोडपतात. शेवटी मार सहन करून खुट  गेरीया करून उकडतात. शक्तिप्रदर्शन  आणि युक्ती डावपेच या खेळात दिसून येतो. पूर्ण तांडा हा खेळ पाहतो. याच दिवशी सकाळी पितर पूजा पूर्वजांना पूजा केल्या जाते. साधारण यामध्ये लापशी हा पदार्थ आवडीने तांड्यात केला जातो ..हा खेळ बहुदा खालील घटना करता झाला  असावा  असा अंदाज आहे. काही राज्यांमध्ये रेल्वेला सुरुवात झाली.गुत्तीबेलारी येथे  सेवाभायाचा  तांडा होता. आणि रेल्वेच्या नवीन मार्गाचे काम चालू होते. लभाणाचा. धंदा लदेणीं. या मार्गामुळे लदेणी व्यवसाय  संपुष्टात येणार होता. हा सतराशे ऐंशीच्या नंतरची घटना असावी असे म्हणतात. होळी खेळून घेऊ आणि पटरी रेल्वे उखडून फेकून देऊ असे ठरले त्यानुसार दिवसभर होळी खेळून झाल्यावर तांडयाचा  नायक भुकिया यांनी दाहोद गोधरा जंक्शनचे रूळ उखडून फेकून दिले. होते.  लमानी तांडा सोबत लोहमार्ग होऊ नये. म्हणून सत्याग्रह करण्याचे ठरविले होते त्यानुसार जागोजागी रुळ  उखडून फेकले होते. तेव्हा कंबरलेन  कलेक्टर साहेबांनी रोंजनदारीची  हमी  देऊन रेल्वेच्या कामात व सैन्यात गोर गणातील  लोंकाची भरती केली होती. या घटनेची आठवण म्हणून कदाचित आजही तांड्यात वर सांगितल्यानुसार खुंट उघडण्याचा खेळ खेळला जातो. होळीच्या दिवसात बाहेरचा माणूस तांड्यात आला तरी त्याला काठीचा मार खाऊन पैसे द्यावे लागतात. याला गोरगणात  फांगळ (फगवा) म्हणतात. तांड्यातील गेरीया तरूण , गेरणी तरुणी होळीच्या दर्शनाला जातात एक दुसऱ्यांना होळीची राख लावतात. आणि  दुसऱ्या दिवशी रंगपंचमी (फाग ) स्त्री-पुरुषांमध्ये सुरू होतो. याला फाग धुलीवंदन म्हणतात . गेरीया गेरणीची स्वतंत्र टोळी सर्वांना दारू पाजणे व गेरसाठी  पैसे गोळा करणे करीता भाड लेंगी म्हणतात .अतिशय अश्लील चावट गीत स्पर्धा सुरू होते. प्रथम नायकाच्या घरासमोरून गिरी यांची टोळी जाऊन खाली दिली जातात प्रथम नायकाच्या घरासमोर गेरीयाची टोळी जाऊन खालील लेंगी गातात…

 तारी नायकेरी  कमाई काढरे तु,  बोल भाई बोलरा बोल रे तू, शाबास रे तू…

भावार्थ: ये नायका तुझ्या नायकीची, मोठेपणाची कमाई काढ. कुलुपाला किल्ली लाव आणि पैसे दे नाहीतर तुला मार खावा लागेल. फागच्या महिन्यात गेरणी तरुणी मस्ती मध्ये येतात याच महिन्यात त्या गरोदर होतात म्हणून खालील गीत गायल्या जाते.

 छोरा काढ ये गेरणी धुंड करीया छोरा काढये…. दाढी वाळे बकरारो गेर करीया…

भावार्थ: ये  तरुणी मुलाला जन्म दे आपण धुंड (वाढदिवस) करू मुलगा झाल्याच्या खुशीमध्ये आपण दाढी वाढवलेला बोकड कापून खाऊ व आनंद लुटू अशा भांड लेंगीचा राग येऊ नये म्हणून मध्येच खालील लेंगी  गायल्या जाते.

काकी ये दादी रिस मत करजो होळी बोलचंये…. भांड…हाव…हाव..होळी बोलचंये भांड…..!.

 भावार्थ: काकी आणि आजी राग मानु नका हा होळीचा सण आहे आणि होळी मध्ये असे गित गावेच लागते. माफ करा मी काही बोलत असेल तर तै केवळ होळी सणामुळे .राग करू नका .

आणि शेवटी  होळीला  निरोप देतात. आणि शेवटी म्हणतात..

 होळी आयी ये होळी डगर चाली , होळी … गेरीयान सुनो रकाड चाली,गेरळींन गेरीया दे चाली……!.

भावार्थ: होळी आली आणि आता ती चालली आहे. नवतरुण गेरणींला गेरीयि देऊन जात आहे. जाता जाता गेरीयाला मुलगा होईल असा आशीर्वाद देऊन ती चालली लिहिली आहे. दुसऱ्या दिवशी  गोळा करून आणलेल्या  फागवाच्या वर्गणीतिल पैशातून बकरे आणले जाते. बकरे कापून सर्वांना  गेर केल्या जाते.मटनाचे समान वाटप करतात आणि बोटी  खाऊन होळीची समाप्ती करतात. हे सुरू असताना म्हातारी माणसे मुद्दामच गाफिल झाल्यासारखे दारू पिऊन गीत गातात. 

*बारा मीना होळी रेगी  तो झिगला सिडातो ,बारा मीना होळी रेगी तो पटका सिडातो।*

 भावार्थ: होळी  एवढ्या लवकर आली की कपडे व पटका खरेदीला करायला वेळ सुद्धा मिळाला नाही जर होळी बारा महिने असती तर नक्कीच शर्ट ,फटका खरेदी केला असता त्यावर तरुण मुलं म्हाताऱ्या माणसाला चिडवण्यासाठी म्हणतात बारा महिण्यापासून काय झक मारायला गेला होता? आता सांगा होळी का एकदम झाली असेल होळीची चाहूल लागूनही  स्वतःला गाफील राहणारे अशा लैंगिक गीतातून होळीलाच दोष देतात .अशी ही सर्वांची आवडती होळी सर्वांना सुख देऊन जाते या सणामुळे तांड्यात तारुण्य बहरते व काळीसावळी तरुणी जरी असली तरी ती सौंदर्यवती दिसते. त्यामुळे होळीच्या नंतर बंजारा समाजात भरपूर लग्नकार्य जुळून येतात. अशी ही प्रेमळ,निखळ आनंद देणारी ,थोडी चावट ,पण तारुण्य बहाल करणारी तांडयात चैतन्य निर्माण करणे होळी गोरगणात  आजही  तमाम तांड्यात  खेळल्या जाते हीच बंजारा समाजाची फार मोठी सांस्कृतिक उपलब्धी आहे!

 याडीकार पंजाब चव्हाण,

ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक

पुसद- 94 21 77 43 72

Leave a comment