कविवर्य सुरेश भट : जसे दिसले तसे
मुंबईचे दादर मधील शिवाजी रंगमंदिर. कविवर्य सुरेश भट रंगमंचावर विराजमान झालेले. बाजूला तत्कालीन सुप्रसिद्ध कवी व मंच संचालक प्रा.शंकर वैद्य. कविवर्य सुरेश भट यांना मदत करायला मी देखील त्यांच्या बाजूला रंगमंचावर बसलेला. पहिल्या लाईनमध्ये शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे. आशा भोसले लता मंगेशकर उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर बसलेले.श्री शिवाजी रंगमंदिर तुडुंब भरलेले.
त्या दिवशीचा तो कार्यक्रम अविस्मरणीय असाच झाला. मराठीतील दिग्गज मंडळी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील व नाट्यसृष्टीतील मान्यवर मंडळी सभागृहामध्ये होते. एकाहून एक सरस कविता गझल सुरेश भट रसिकांसमोर सादर करीत होते.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात श्रीमती आशा भोसले ह्या रंगमंचावर आल्या. त्यांनी भट साहेबांचे अभिनंदन केले. आणि त्या भट साहेबाला म्हणाल्या साहेब तुमचे गायन ऐकून माझा मूड लागलेला आहे .मी काही तुमच्या कविता गजला म्हणू का ? अर्थातच सुरेश भट नाही कसे म्हणणार. त्यांनी आशा भोसले यांना परवानगी दिली. तेवढ्यात श्री बाळासाहेब ठाकरे स्टेजवर आले. मध्यंतरानंतर झालेल्या छोटेखानी सत्कारात बाळासाहेबांनी सुरेश भट यांचा सत्कार करून लोकांचा टाळ्यांचा गजर करून घेतला.
पुढचा अर्धा कार्यक्रम हा आशा भोसलेनीच केला. सुरेश भटांच्या एकाहून एक सरस गीत कविता व गजला आशा भोसले गात होत्या अविस्मरणीय कार्यक्रम झाला. तत्कालीन झपाटा ह्या कॅसेट कंपनीचे श्री खेर यांनी हा कार्यक्रम रेकॉर्डबद्द केला. कार्यक्रम संपल्यानंतर रंगमंचावर अनेकांनी धाव घेतली. सुरेश भटांच्या सह्या काय घेतल्या गेल्या. फोटो काय काढल्या गेले. त्या कार्यक्रमाला आवर्जून तत्कालीन गाजलेले आयपीएस अधिकारी श्री टी एस भाल व सुप्रसिद्ध गायिका उषा अमोणकर ह्या देखील उपस्थित होत्या. मी अनुभवलेला हा अविस्मरणीय क्षण. मुंबईच्या दादरच्या शिवाजी रंगमंदिरामध्ये असा कार्यक्रम क्वचितच झाला असेल. सर्वात महत्त्वाचे बाळासाहेब ठाकरे आशा भोसले लता मंगेशकर उषा मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर इतके दिग्गज मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते ही खरोखरच नोंदणीय गोष्ट आहे.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
कविवर्य सुरेश भट हे आमचे अमरावतीचे. अमरावती ते बडनेरा रोडवर गोपाल नगर परिसरामध्ये भटवाडी नावाचा परिसर आहे. तिथे ते राहायचे. सुरेश भटांचा तरुणपणातला वावर हा अरविंद ढवळे सुरेश भट डॉक्टर मोतीलाल राठी रामदास भाई सराफ वली सिद्दिकी दादा इंगळे या लोकांमध्ये राहायचा. भट परिवारापेक्षा या मित्रांनीच सुरेश भटांना जास्त जपले असे म्हटले तर ते अतिशययोक्तीचे होणार नाही. त्या काळात पोटापाण्याचा व्यवसाय सोडून कविता करणे हे काही भट परिवाराला मान्य होण्यासारखे नव्हते.
पण सर्वात जास्त साथ दिली ती अरविंद ढवळे व सौ मीनाताई ढवळे यांनी. अरविंद ढवळे यांनी आपल्या बंगल्याची दारे सुरेश भटांना 24 तास मोकळी करून दिली. सुरेश भटांच्या पहिला कवितासंग्रह कोणाला अर्पण केला असेल तर तो रामदास श्राफ यांना. त्यांची अमरावती गॅस एजन्सी. गॅस पुरवठा करणारी कंपनी. पण ते सुरेश भटांचे जिवलग मित्र होते. काल-परवा रामदास भाई गेले. पण याही वयात त्यांच्या सुरेश भटांच्या बहुतेक कविता पाठ होत्या .
मी डॉक्टर मोतीला राठींचा मानसपुत्र . गावच्या नात्याने डॉक्टर मोतीलाल राठी हे माझे जावई. मी त्यांच्या संस्थेत नोकरीला होतो. शिवाय मी स्थापन केलेल्या साहित्य संगम या संस्थेचे ते अध्यक्ष होते. आम्ही सुरेश भटांचा रंग माझा वेगळा हा कार्यक्रम अमरावतीच्या नगर वाचनालयात घेतला. या कार्यक्रमाला तिकीट होते तीन रुपये. या कार्यक्रमानिमित्त तत्कालीन दैनिकांनी चार चार पानांच्या पुरवण्या काढल्या. अगदी पुढचे इंग्रजी दैनिक हितवाद दैनिक नागपूर टाइम्स या इंग्रजी वर्तमानपत्रांनी देखील. अमरावतीच्या नगर वाचनालयाचे सभागृह तुडुंब भरले होते. तिथे पाय ठेवायलाही जागा आम्हाला तिकीट द्या आणि आम्हाला नुसतं उभे राहू द्या अशी रसिकांची मागणी एवढा प्रचंड मोठा कार्यक्रम तो झाला.सुरेश भटांची सगळी चाहती मंडळी त्यांचे सगळे जिवलग मित्र सभागृहात होते. इतका रंगतदार कार्यक्रम झाला की तो कार्यक्रम त्यावेळेस पाहिलेल्या लोकांच्या अजूनही स्मृतीत आहे. एकेकाचे नाव घेऊन सुरेश भट कविता गजल सादर करीत होते आणि लोकांची प्रचंड दाद त्याला मिळत होती. सुरेश भट म्हणतात माझे महाराष्ट्रात खूप कार्यक्रम झाले. पण अमरावतीला नगर वाचनालयात जो रंग माझा वेगळा कार्यक्रम झाला तसा कार्यक्रम कुठे झाला नाही .
अमरावतीनंतर सुरेश भट नागपूरला गेले. धंतोली परिसरातील रामकृष्ण मठाजवळील वझलवार बंगल्यामध्ये त्यांनी आपला संसार थाटला. बहुमत नावाचे साप्ताहिक सुरू केले. लोकमतमध्ये नियमित लिहायला लागले. रंग माझा वेगळा या नावाने कार्यक्रम करायला लागले. रंग माझा वेगळा या कार्यक्रमाचे संचालन सुप्रसिद्ध प्रा. राम शेवाळकर किंवा प्रा. मधुकर केचे हे करायचे. त्या काळात कवी संमेलने भरपूर प्रमाणात व्हायचे. त्या काळात दूरदर्शनचे आक्रमण व्हायचे होते. मोबाईल सोडा लँडलाईनही मोजकेच होते. पत्र व्यवहार मात्र मोठ्या प्रमाणात होता .
सुरेश भटांच्या या वाटचालीत सौ पुष्पा वहिनींनी पूर्ण घर सांभाळले. सुरेश भट हे सतत लेखनात व कार्यक्रमात राहायचे. सौ पुष्पा वहिनींनी मात्र त्यांच्या या संसाराला खऱ्या अर्थाने हातभार लावला. गौरी व चित्तरंजन हर्षवर्धन ही त्यांची मुले. त्यापैकी चित्तरंजनने आपल्या वडिलांचा वारसा आजही पुढे चालविला आहे.
सुरेश भटांना पत्र लिहिण्याचा मोठ्या छंद त्यांनी अनेकांना पत्र त्या पत्राचा एक संग्रह कोल्हापूरचे आमचे कवी मित्र व दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक श्री श्रीराम पचिंद्रे यांनी पत्रे सुरेश भटांची या नावाने प्रकाशित केला.मलाही त्यांनी दोनशे पत्रे लिहिलेली आहेत. त्याचाही संग्रह मी प्रकाशित करीत आहे. त्यांचे पत्र पाहण्यासारखे असायचे.लाल हिरवी निळी काळी शाई ते वापरायचे.काही होळी अधोरेखांकित करायचे.
मी ज्या महाविद्यालयामध्ये मराठीचा प्राध्यापक होतो त्या केशरबाईला लाहोटी महाविद्यालयामध्ये अगोदर हिंदी कवी संमेलन व्हायचे .डॉ. मोतीलाल राठी हे संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळे मी त्यांना मराठी कवी संमेलन घेण्याची विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केली .आम्ही सर्वश्री सुरेश भट यांना बोलावले. देविदास सोटे प्राध्यापक मधुकर केचे विठ्ठल वाघ नारायण कुलकर्णी कवठेकर प्रदीप निफाडकर मिर्झा रफी अहमद बेग शंकर बडे मंगेश पाडगावकर विंदा करंदीकर वसंत बापट असे कितीतरी कवी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये येऊन गेले.
कविवर्य श्री सुरेश भटांनी खऱ्या अर्थाने गझल महाराष्ट्रमध्ये रुजवली. त्यांनी गजलेची एक पिढीच निर्माण केली. महाराष्ट्रातील कवींनी गझलकडे वळावे यासाठी त्यांनी तन-मन-धनाने प्रयत्न केले. गजलेची बाराखडी लिहिली. आज ते आपल्यात नाहीत .पण त्यांनी तयार केलेले हजारो गझलकार आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये वेग वेगळ्या शहरांमध्ये आपापल्या गजलेमुळे नावलौकिकास आलेले आहेत. याचे संपूर्ण श्रेय कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांनाच द्यावा लागेल .
सुरेश भटांनी ज्या कविता लिहिल्या त्या कविता आजही अजरामर आहेत. काही कविता असे मुद्दाम देत आहे
* आज गोकुळात रंग टाकतो हरी
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी
* मेहंदीच्या पानावर मन माझं झुलते ग
* उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
* मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
* गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे
आणील आरतीला हे चंद्र सूर्य तारे
* हे भिमराया या लेकराची वंदना
* गीत तुझे मी आई गाईन
शब्दशब्दी अमृत ओतून
* हे हिंदू हृदय सम्राटा
हा छगन करी तुज टाटा
अशा कितीतरी एकापेक्षा एक सरस कविता गजला सुरेश भटांनी लिहिल्या आहेत.
सुरेश भटांच्या नावाने आज नागपूरला शंभर कोटी रुपयांचे कविवर्य सुरेश भट सभागृह माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. अमरावतीलाही त्यांचे स्मारक व्हावे म्हणून आम्ही आमदार खासदार मंत्री लोकप्रतिनिधी यांना जागे करीत आहोत. हा एवढा दमदार कवी आणि तेवढ्याच दिलदार कवी आमच्यातून निघून गेला ही संपूर्ण मराठी भाषेची फार मोठी हानी आहे. अशा या कविवर्य सुरेश भट यांना त्यांच्या 14 मार्च ह्या स्मृतिदिनानिमित्त आमचा हा मानाचा मुजरा
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे.
संचालक, मिशन आयएएस, महापौरांच्या बंगल्यासमोर.
विद्यापीठ रोड .अमरावती कॅम्प -444602
मो.9890967003