शेतकऱ्यांच्या बांधावरचा जीवघेणा संघर्ष: बंधाटी
युवा अकादमी फेसाटीकार ‘नवनाथ गोरे’ यांची ‘बंधाटी’ ही दुसरी कादंबरी. ‘नवनाथ गोरे’ यांची लेखणी समकालातील सामाजिक प्रश्न घेऊन उठाव करते. जे जगणे भोगले सामाजिक वास्तव अनुभवले, तेच त्यांच्या लेखणीचे विषय होऊन काळजाच्या काकऱ्यात दबलेले अंकुर शब्द रूपाने तरारून येताना दिसतात.
ग्रामीण जगणे हे समूहाचे जगणे असते. त्यामुळे ‘बंधाटी’ कादंबरीचा एकच नायक अथवा नायिका नसून यामध्ये अनेक पात्र वेगवेगळ्या भूमिका घेऊन येतात. शेताच्या बांधावरून पेटणारा संघर्ष जमिनीची मोजणी करूनही संपत नाही. हा बांधवरंब्याचा संघर्ष एकमेकांच्या रक्ताचा टिळा लावूनही न संपणारा व पिढ्यानपिढ्या चालणारा आहे. हे प्रखर सामाजिक वास्तव ही कादंबरी मांडते. या संघर्षा बरोबरच ग्रामीण जीवनाला घट्ट वेढून असणाऱ्या अनेक चांगल्या वाईट गोष्टीचा वेध ही कादंबरी घेते.
गाव म्हटलं की गावाकडचा जिव्हाळा, आपुलकी, प्रेम सर्व काही गावपणातल्या चांगल्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु वरवर वाटणाऱ्या चांगुलपणाच्या आत दडलेल्या पोकळपणाची दुसरी बाजू ‘बंधाटी’ कादंबरीच्या रूपाने लेखकाने वाचकांच्या समोर मांडली आहे. या कादंबरीतील आबा व भिका या नायकांमधला संघर्ष अगोदरच्या पिढीपासूनचा आहे. व तो संपण्याऐवजी अधिकच प्रखर होत जाताना दिसतो. आबा तंगवाचं दोन एकर रान खंडान करतो. पुढे तेच रान तो खरेदी घ्यायच्या विचारात असतो. परंतु भिका या रानासाठी पैशाची चढाओढ करून ते रान स्वतः घेतो. नंतर ओढ्याकडचे जगंमाचे रान विकायला निघते. त्यावेळी तेही रान भिकाच घेतो. अशा जमिनीच्या चढाओढीचा संघर्ष या कादंबरीत आहे. कुणाची जनावरं जरी एकमेकांच्या बांधावर गेली तरी हा संघर्ष फुलत जातो. भिकाच्या साप चावून मेलेल्या मुलाच्या मरणाचा संबंधही आबाने करणी केली याच्याशी जोडला जातो. अशा गैरसमजातून व अंधश्रद्धेतूनही एकमेकांचे आयुष्य उध्वस्त करण्याइतपत, हा पराकोटीचा संघर्ष व्देष भावना वाढीस लावतो. या संघर्षाला स्त्रीयाही अपवाद नाहीत. त्यांचीही एकमेकींची भांडणे, शिव्याशाप, आक्रोश, आक्रस्ताळेपणाचे आक्रंदन मांडणारे चित्र ही कादंबरी रेखाटते.
ही जंगमाची पट्टी तुला देतो. तू त्या आब्याच्या घराची नासाडी कर. आब्याचा काटा काढ. चार एकर रान तुझ्या नावावर घालतू. म्हणून भिकाने बोलवलेला मास्तर व भिकाची पोरं व भिकाला साथ देणारे, सरपंच, पोलिस पाटील व गावातील इतर ठराविक गावगुंड गावातील शांतता भग्न करतात. न्यायाने वागणाऱ्या आबाच्या घराची नासाडी व्हावी म्हणून भिकाचं पोरगं बज्या आबाच्या पोराच्या शिवाच्या डोक्यात कुराड घालते. यातूनही डॉक्टरी उपायाने तो वाचतो. त्यावेळी परत आबाच्या डोक्यात बदलाच्या सुडाची आग पेटते. ही भांडणं अशीच वाढत राहतात. शेवटी भिका व त्याची पोरं सुड भावनेने आबाचे घर पेटवून, त्याला एकटे गाठून आबाच्या डोक्यात कुराड घालतात. जमिनीच्या वादातून गावागावांतील जीवघेण्या संघर्षाचे भीषण वास्तव ही कादंबरी अधोरेखित करते.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
या संघर्षाचे पडसाद माणसाच्या जगण्यात इतके खोलवर रुतले आहेत की, एकमेकांच्या मयताच्या प्रसंगही जाण्यास माणसाचे मन धजवत नाही. भिकाच्या पोराच्या मातीला बी आबा व भामाला जाण्याची संवेदना उरत नाही. त्यावेळी भामा आबाच्या आईचा म्हणजे आपल्या सासूच्या मरणाचा हृदयद्रावक प्रसंग आपला मुलगा शंकरला सांगते. ‘अख्खी वाडी तवा जागी झाली. पर आमच्या माग कुणीबी आलं नाय. पावसाळ्याच्या दिवसात म्हातारीच्या धनीला लाकडं मिळाली नाहीत. त्यावेळी बैलाच्या छपराची वाळकी लाकडं वापरून भामान व आबान म्हातारीला चादरच्या खोळत घालून लाकडावर ठिवलं.’ हे संवेदनाहीन प्रसंग वाचून गाव पातळीवरचे संघर्ष माणुसकी गोठवणारे वाटतात. अगोदरच्या काळात माणसे काम करून खायची. नातीगोती मरणकारण विसरत नव्हती. एकमेकांच्या जीवाला जीव द्यायची. शेजार पाजारची माणसे एकमेकांसाठी धावून जायची. या सगळ्या गोष्टी गावगाड्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे भाष्य ही कादंबरी करते.
शेतकऱ्याचे कष्टप्रद जगणे, सतत ओढाताण, विजेशी दोन हात करताना होणारी दमछाक, प्रतिकूलता तरीही आपल्या मातीशी इमान राखणारा शेतकरी, कष्टाला मागे सरत नाही. परंतु बांधावरचा संघर्ष त्याच्या जीवनाला लागलेल्या वाळवी सारखा पोखरतो. त्याचे जगणे उध्वस्त करतो. नाहीतर शेती मातीवर प्रेम करणारा शेतकरी गुराढोराशी एकरूप होतो. जनावरांच्या वेदनेशी त्याच्या काळजाची नाळ जोडली जाते. म्हणून या कादंबरीतील आबा आपल्या सर्जा बैलाच्या जिभेला काट्याच्या फाजरीवानी काटा आल्यावर हाताने त्याची जी बाहेर ओढून तिच्यावर गूळ चोळतो आणि आपल्या बैलाची कुकडं आजारापासून सुटका करतो. तसेच भिकाची बायको पिर्ता तिचे रेडकू साप चावून मरते. त्यावेळी माझं सोन्यासारख रेडकू मेल म्हणून आक्रोश करते. पिर्ताचा मुलगा बज्या भिजलेल्या करडांच्या पोटात गारवा शिरला म्हणून त्यांना शेकण्यासाठी आपली बायको मिनाला चूल पेटवायला सांगतो. आपल्या हिरव्यागार शिवारात गायीची राखण करत आनंदाने पवा वाजवणारा नागू. ही सगळी माणसे आपल्या शेती मातीवर, गुराढोरांवर पोटच्या मुलासारखं विलक्षण प्रेम करणारी आहेत. म्हणजे ऐरवी माणसांशी व्देष भावनेने वागणाऱ्या शेतकऱ्याच्या संवेदनशीलतेची नाळ आपल्या गुराढोराच्या वेदनेशी जोडली आहे. याचा सहज सुलभ प्रत्यय वाचकांना या कादंबरीत दिसून येतो.
शेतकऱ्यांच्या जीवनाला वेढून असणारे दुष्काळाचे सावट व सापाच्या भीतीची टांगती तलवार या कादंबरीच्या पानापानात दिसून येते. दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होताना होणारे स्थलांतर ही नागूच्य आई वडिलांच्या रुपाने येते.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या नागूच्या कुटुंबाची जमीन व घर पैसे परत दिले नाहीत. म्हणून भिका तलाठ्याकडून स्वतःच्या नावावर खरेदी करून घेतो. गरीब अडाणी, नागूचे आईवडील या धक्क्याने गाव सोडून जातात. तर भूमीहीन, बेघर नागू या आघाताने उन्मळून वेडापिसा होऊन पवा वाजवत फिरतो. नागूचे हे जगणे वाचकाला हादरुन टाकते. तसेच पोरीच्या बाळंतपणासाठी आनंदा बामणाचे पैसे उचलून फक्त व्याज भरणारा लक्ष्मण पांढऱ्या यासारख्या प्रसंगाने ही कादंबरी सामाजिक आर्थिक विषमतेचे प्रश्न उपस्थित करून, ग्रामीण सावकारी पाशाचा विळखा उठावदार करते.
यामध्ये शेतकऱ्यांची अर्थिक पिळवणूक करणारी एक व्यवस्था आहे. तसेच पुर्वपार चालत आलेली वासनेची धग आहे. ती काही वर्षांपूर्वी लग्नात पिपाणी वाजवणाऱ्या गिराप्पा व्हरलाच्या बायकोच्या इज्जतीवर हात टाकून तिचा जीव मारणाऱ्या सावकारापासून सुरू होते. ती बाळाबाईच्या पोरीचे जगणे मुश्कील करणाऱ्या भिकाने बोलाविलेल्या स्त्रीलंपट मास्तर पर्यंत येऊन पोहोचते.
बाळाबाई याबद्दल भिकाकडे तक्रार करते तर तो तिलाच दोषी ठरवतो. तर उलट आबा पाठच्या भावासारखा बाळाबाईच्या बाजूने उभे राहून तिला धीर देतो. म्हणजे स्त्रीला एकीकडे भयानक असुरक्षितेचा अनुभव देणारे पुरुष आहेत. तर दुसरीकडे पाठच्या भावासारखी निर्धास्तपणाची सुरक्षितता देऊन, स्त्रीचे जीवन समृद्ध करणाऱी पुरुषी व्यवस्थाही आहे. यावर ही कादंबरी प्रकाश टाकते.
लक्ष्मण पांढऱ्याच्या पोराच्या लग्नात आबा व किश्ना कमी जास्त बघण्यात गुंतली होती. यावरून ग्रामीण संस्कृतीच्या एकोप्याचेही प्रतिनिधित्व करते. तसेच या लग्नातील गोंधळ गीतांचा उल्लेख करून लेखकाने लोकसंस्कृतील हा संबळाचा ठेका पारंपारिकतेच्या नमनाला अधिक टवटवीत करतो.
तसेच जागतिकरणाने सर्वच स्तरावर ताबा मिळवला आहे. यातून ग्रामीण भागाही सुटलेला नाही. ज्यावेळी आबाची बायको भामा घरात मोबाईल दिसत नाही. म्हणून रानातन आलेल्या आबाला पोराच्या काळजी पोटी म्हणते, ‘पोरगं नुसतं मोबाईलातच बोट घालून बसतया. याड बिड लागायचं. कसलं सापाचं यिटूळ खेळतया. आपणच हसतया, म्या जिकलू म्हणूनशिना वराडतया. ‘
तर दुसरीकडे किश्नाची बायको आपल्या पोरीला हाका मारते. त्यावेळी पोरगी टीव्ही बघण्यात गुंग झाली होती. म्हणून ती तिच्यावर वैतागून म्हणाते, ‘ही टीव्ही अन् मोबाईल पेटवा पहिला निवून तिकडं.’ यामध्ये माणसाच्या जगण्याला व्यापणाऱ्या मोबाईल व टीव्हीच्या दुष्परिणामावर ही कादंबरी भाष्य करते.
किश्नाच्या पोरीला लग्नासाठी आलेल पोरगं कोरोनापासून गावाकडे आलेय ते नंतर इथंच शेती करत होतं. यातून कोरोनाचाही संदर्भ या कादंबरीला स्पर्शून जातो.
ही कादंबरी शेतकऱ्याच्या बांधावरचा फक्त संघर्षच मांडत नाही तर, सुडाच्या आगीत होरपळणारी अंधश्रद्धा व तिला खतपाणी घालणारी देवरशीन,साप गारुडी यांच्याही पडद्यामागच्या खेळीवर प्रकाश टाकते.
यामध्ये बिरुबाचे देऊळ आपल्या ग्राम देवतेचे प्रतिनिधित्व करते. या जत्रेसाठी माहेरी आलेल्या सासुरवाशीण लेकी, पुरणपोळीच्या नैवेद्याची ताट अन् बिरोबाची भाकणूक या सगळ्या गोष्टी ग्राम संस्कृतीतीला चैतन्याला उठाव देतात. तसेच सरपंचाच्या संवादातून अनेक ठिकाणी कन्नड बोलीचेही लेखकाने प्रकटीकरण केले आहे.
ही कादंबरी शेतकऱ्याच्या बांधावरचा फक्त संघर्षच मांडत नाही तर, ग्रामीण जगण्याला व्यापणाऱ्या इतर बऱ्याच गोष्टींचा समाचार घेताना दिसते. बहुचर्चित ‘फेसाटी’ कादंबरी नंतर ‘नवनाथ गोरेंनी’ ‘बंधाटी’ कादंबरी लिहून एका वेगळ्या भीषण वास्तव विषयाला हात घातला आहे. ‘बंधाटी’ कादंबरीनेही आशय आणि विषयाच्या बाबतीत, शिवार जागविण्यासाठी झटणाऱ्या शेतकऱ्याच्या बांधाला मुल्य प्राप्त करून दिल्याचे दिसून येते.
—————
मेघा पाटील
—————-
कादंबरी – बंधाटी
लेखक – नवनाथ गोरे
प्रकाशक – आनंद प्रकाशन पुणे
पृष्ठे १२८ मूल्य २०० रुपये