‘दहा महिन्यांचा संसार’ कथासंग्रहास पद्मगंगा फौंडेशनचा पुरस्कार प्रदान
अमरावती (गौरव प्रकाशन वृत्तसेवा) :पद्मगंगा फौंडेशन, भिंगार, जि.अहमदनगर यांचेद्वारा स्व.प्रा.डॉ.गंगाधर मोरजे राज्यस्तरीय लोकगंगा पुरस्कार सोहळा २०२३ नुकताच भिंगार येथे संपन्न झाला. यात गंगाधर मोरजे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार नाशिक येथी साहित्यिक डॉ. प्रतिभा जाधव लिखित ‘दहा महिन्यांचा संसार’ ह्या कथासंग्रहासाठी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
‘कोरोना एकल महिलांच्या वास्तव जगण्याच्या कथा’ हे ह्या पुस्तकाचे वेगळेपण आहे. ‘दहा महिन्यांचा संसार’ ही डॉ.प्रतिभा जाधव यांची तेरावी साहित्यकृती आहे व दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. भिंगार येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अनिल घुले पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संदीप सांगळे(अध्यक्ष, मराठी अभ्यासमंडळ, सा.फु.पुणे विद्यापीठ,पुणे), प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, डॉ.मु.सा.बागवान हे होते. पद्मगंगा फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. धोंडीराम वाडकर, उपाध्यक्ष मिलिंद चवंडके, सचिव डॉ.ज्ञानेश ऐतलवाड व इतर पदाधिकाऱ्यांनी सदर कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.
पुरस्कार्थी साहित्यिक डॉ.प्रतिभा जाधव सामाजिक अंगाने विविध नामांकित वृत्तपत्त्रांत विचारप्रवृत्त करणारे परखड वैचारिक स्तंभलेखन नियमितपणे करत असतात. त्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र, मुक्त विद्यापीठातील कुसुमाग्रज अध्यासनाच्या सल्लागार समिती सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सदस्य आहेत. त्यांची ललित, नाट्य, काव्य, वैचारिक, समीक्षा या साहित्य प्रकारात आजवर तेरा पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या ‘संवाद श्वास माझा’ ह्या काव्यसंग्रहाची इंग्रजी व हिंदी भाषेतील अनुवादित पुस्तके दिल्ली येथील नामवंत प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहेत.