Sunday, October 26

आठवणीतील अय्युब; माणुसकीच्या नात्याचा हात!

गावातील अय्युब आणि लेखकाची भावनिक भेट – आठवणीतील पान | बाबा थोरात महाराष्ट्र पोलीस

दुपारच्या सत्रात फोन खणानला.. नंबर सेव्ह नसल्याने मी बराच वेळ वाजणाऱ्या बेल कडे बघत होतो. ट्रु कॉलर ने त्याचं काम चोख बजावले होते. नंबर जरी अननोन असला तरी अयुब अयुब असं काहीतरी ट्रु कॉलर स्पष्टपणे दिसत होते. शेवटी अगदी शेवटचा आचका घेऊन मोबाईल बंद होणार त्या शेवटच्या क्षणाला कॉल रिसीव्ह केला. तिकडून आवाज आला.. कोण बाबासाहेब भहुहे का..? मी फक्त हं.. केलं भाऊ मी अय्युब बोलतोय…! मी आपला मेंदूला जरा जोर देत विचार करू लागलो की, कोण अय्युब यार..? खरं तर अय्युब कोण..? हे काही माझ्या लवकर लक्षात येईना. बरं समोरच्याला मी तुम्हाला ओळखत नाही असंही म्हणू शकत नव्हतो.. या सर्व विचारात काही सेकंदाचा वेळ गेला. आणि समोरून तोच व्यक्ती बोलता झाला.. कदाचित त्याला ही कळलं असावं की मी त्याला ओळखलं नाही.. पुन्हा तोच बोलता होत म्हणाला की, अरे हो.. तुम्ही कस्काय मला ध्यानात ठेवश्यान राव.?

तुम्ही गाव सोडून सोळा सतरा तरी वर्षे झाले अस्तिन, मंग आम्ही कुठं तुमच्या लक्षात ऱ्हानारह्ये..? मीहे फकिराचा अय्युब..! आणि मग झटक्यात ट्यूब पेटावी तशी अय्युबची मूर्ती नजरे समोर उभी राहिली.. आरे बोल ना अय्युब, काय म्हणत होतास..? आज कशी काय आठवण झाली.? काही नही टीव्ही शेंटरला आल्हो व्हतो.. म्हणलं तू बी इठंच दिवटी करतो तव्हा तुला भेटून जावं..! अरे पण माझा मोबाईल नंबर तुला कोणी दिला? असू दे.. भेटल्यावर बोलू.. तू सध्या कुठे आहेस? टीव्ही सेंटर चौकात का..? थांब मी आलोच तिथे..! मी लगेच ऑफिस मधून बाहेर पडलो व गाडीला सेल्फ मारून संभाजीराजे चौकात अय्युबला भेटण्यासाठी गेलो..! गावाकडची लोकं भेटायला आली की, गाव सोडून शहरात बस्तान मांडलेली बरीच मंडळी गावाकडच्या लोकांपासून पळ काढतात त्यांना काहीतरी खोटं नाटं बोलून हुसकावून लावतात. माझं मात्र तसं नाहीये. मला गावाकडच्या लोकांना भेटायची ओढ लागते त्यांच्या रूपाने पुन्हा मला माझ्या बालपणीच्या दिवसात शिरता येतं. तो काळ कसा का असेना पण तो पुन्हा पुन्हा आठवासा वाटतो.. हरखून जातो मी माझ्या मातीतील माणसांना भेटून.. बऱ्याचदा आपल्या वाट्याला आलेल्या चांगल्या वाईट माणसांचं गाठोडं मी पाहत असतो. तर त्या गाठोड्यात चांगल्याचा हिशोब लागतो. जात, धर्म या पलिकडे जाऊन काही माणसे मला खूप काही देत आली. त्या सांस्कृतिक संपत्तीने मला आतून भक्कम केलं आणि समृद्ध होता आलं.

अय्युब..! चार भावातील अगदी शेवटचं शेंडेफळ.. माझ्याच वयाचा. गावांतील अगदी दक्षिणेच्या टोकाला महारवाडा, धनगरवाडा ओलांडला की मस्जिदच्या भिंतीला लागूनच याचे जुने माळवादाचे घर. दहा पाच उंबरठे असणारी मुसलमान गल्ली. याचं सर्व बालपण आमच्यातच गेलं. गावांतील सर्व धर्माच्या सण उत्सवात अय्युब याचा सक्रिय सहभाग असणार म्हणजे असणारच. त्याच्यासाठी धर्म ही संकल्पना नव्हतीच मुळी. सर्व धर्म समभाव जपणारा हा अवलिया आहे.गावात कुणाचे लग्न कार्य असू द्या की, मयत असुद्या सगळ्या कामासाठी हा हजर असणारच. गणपती मंडळाच्या आरती पासून ते नवरात्रोत्सवात दांडिया खेळण्यापर्यंत अगदी सगळीकडे मुक्तपणे याचा संचार असायचा. शिवजयंतीत जितक्या सहजतेने अंगावर गुलाल झेलत तो बेभान होऊन नाचायचा अगदी त्याच उत्साहाने तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीत सुद्धा सहभागी व्हायचा. त्याच्या लेखी माणुसकी आणि मानवता हाच धर्म. गावाचे ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेत कोणाचा नवसाचे बोकडे, कोंबडेना याच्याच हस्ते मुक्ती मिळत असे.

नवसाला पावणाऱ्या खंडोबाला ना कडक लक्ष्मी आईला ना गावातील लोकांना याचा मुसलमान असण्याचा कधीच त्रास झाला नाही. कदाचित आजही तो ते काम तितक्याच निष्ठेने करीत असावा.. गेल्या दोन दशकात बरीच उलथापालथ झाली. समुद्राचे अथांग काळीज असणारी माणसं आज कोत्या मनाची झाली. नव्या तंत्रज्ञानाच्या युगात लोकांची मन सुद्धा यांत्रिक झाली आहेत. मला आजही आठवतं शेतकरी असो की कष्टकरी नव्या वर्षाचे नवे धान्य घरात आले की त्या धान्याचे पहिले पीठ हे यांच्या घरी द्यावे लागायचे. नव्या पिठाच्या भाकरीचा साखर, गूळ, तेल घालून मलिदा तयार करून दोनपाच लोकांच्या मुखी घास भरवल्यानंतरच नवीन धान्याचे पीठ खाण्यासाठी वापरल्या जायचे. तोच शिरस्ता आजही चालू आहे की नाही, कुणास ठाऊक..? आयुब भेटला नि त्याच्या रूपाने या सर्व आठवणी जाग्या झाल्या. कोणी कुठंही राहत असेल कुठंही असू द्या. तरी माणसासाठी माणूस काहीतरी देत असतो.

हेच लहानपणी मी बघितलं. प्रत्येक गावात माणसांना जिवंत ठेवणारी काही माणसं होती. आणि ह्या माणसांनीच आमचं लहानपण समृद्ध केल. आज इतक्या वर्षानंतर विचार करतो. माणूसपण हरवण्याची सुरुवात कुठून झाली, काही समजलं नाही. आपला देश खेड्यात आहे, असं म्हणतात. खरं आहे का हे..? बऱ्याच वेळ आमच्या गप्पा रंगल्या.. बोलता बोलता अय्युब सांगत होता की, गावात आता पहिल्यासारखे काही राहिले नाही. पाणी पाऊस या असा आहे? बिघाभर जमिनीत काय पिकवावं आणि काय खावं? सगळंच बेहाल झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पावसानं हिसकावून घेतलं आहे. आता काहिच खरं नाहीये.. जाता जाता मात्र तो माझ्याकडे पाहत म्हणाला ” भाऊ माझ्यासाठी तुझ्या ओळखीने इथे शहरात काही काम असेल तर पाह्य..!” मला काहीच उत्तर देता आले नाही. मी नुसता त्याच्याकडे पाहत उभा राहिलो…

-बाबा थोरात,महाराष्ट्र पोलीस

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.