सावड ; ग्रामीण भागात रुजलेला खरा सहकार.!
“सहकार खर तर महाराष्ट्राने देशाला दिलेला सर्वात मोठा मूलमंत्र” खर तर हा सहकार महाराष्ट्र आणि त्यात असणाऱ्या प्रत्येक गावा-गावात रुजलेला आहे. हे ज्यावेळी आपण ग्रामीण भाग फिरतो त्यावेळी लगेच आपल्या लक्षात येत. सहकार ह्या मातीत नेमका कश्या मूळे रुजला हेही समजून येत. जास्त खोलात आणि राजकीय भानगडीत न पडता आपण आपल्या “सावडी” वर बोललेलं कधीही उत्तम राहील नाही का ..?
आता ही सावड म्हणजे नेमकं काय? आणि तो शब्दही नेमका कुठून आणि कसा आला असेल, हा विचार ज्यावेळी मनात डोकावतो त्यावेळी त्याच उत्तरही लगेच भेटत. पहिलं सावड म्हणजे नेमकं काय ? हे जाणुन घेऊ. ग्रामीण भागात शेतीची काम सुरू झाली की मग सुरू होते “सावड”, ज्याला कामाची आवड असते ना ती व्यक्ती नक्कीच सावड करत असते बर का..!
सावड म्हणजे नेमकं काय ? तर त्याच उत्तर म्हणजे आपल्या शेतात काम नसेल, त्यावेळी दुसऱ्याच्या शेतात काम करण्यासाठी जायचं. जितके दिवस आपण दुसऱ्याकडे जाऊ तितकेच दिवस तेही आपल्या शेतात काम करण्यासाठी येतात, त्याला सावड अस म्हंटल जात. ज्यावेळी सवड असेल त्यावेळी दुसऱ्याकडे काम करण्यास जात असल्यामुळे ह्या सवडीतुनच “सावड” शब्द आला असावा.!
आजही ग्रामीण भागात सावड ही मोठ्या आवडीने केली जाते, आज शेती यांत्रिक झाली असल्यामुळे नांगरट, पेरणी, ह्यांना होणारी “सावड” कालबाह्य झाली जरी असली तरी ही शेतातील कामासाठी मात्र सावड “आजही ग्रामीण भागात चालू आहे.
ह्या सावडीचा फायदा म्हणजे शेत कामासाठी जास्त मजूरी लागत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. शिवाय ऐनवेळी मजूर मिळत नाही. ती समस्या ही काहीअंशी कमी होते. त्या मुळे शेत मालाच नुकसानही टाळता येत. उत्पादन ही दर्जेदार येत..! अशी ही सावड, तुम्हालाही आवडत असेल नाही का ? आवडत असेल तर, तुम्ही सावड म्हणून काम केलं काय ? केलं असेल तर प्रतिक्रिया कळवा तो आनंद काय असतो, तो प्रतिक्रिया मधून इतरांना ही कळू द्या..!
– अशोक पवार