
“भयातून निर्भयाकडे, संवाद सेतू”
भाग-१ – मुखपृष्ठ परिक्षण
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल, ता येवला जि नाशिक यांच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला निमित्त होते प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या व्दितीय स्मृती पुरस्कार सोहळ्याचे. यानिमित्ताने प्रतिष्ठानने महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून विविध प्रकारच्या साहित्य कलाकृती मागविल्या होत्या. प्रतिष्ठानकडे कथा, कविता, चारोळी, गझल, कांदबरी, ओवी, अशा एकूण ६५ प्रवेशिका पुरस्कारासाठी आल्या होत्या, त्यापैकी कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी आणि गझलसंग्रह अशा चार प्रकारासाठी प्रत्येकी एका कलाकृतीची प्रथम क्रमांकासाठी परीक्षकांकडून निवड केली गेली. या प्रवेशिकांमधून कथासंग्रह या साहित्य प्रकारातील प्रथम क्रमांक मिळालेल्या डॉ. सुनिता चव्हाण , बोरीवली, मुंबई यांच्या “भयातून निर्भयाकडे, संवाद सेतू” या कलाकृतीचे साहित्यिक मूल्य काय? आणि या कलाकृतीत लेखिकेने समाजासाठी , वाचकांसाठी नेमके काय दिले आहे याचा आपण विचार करणार आहोत.
कोणतीही कलाकृती वाचायला घेतली म्हणजे आपण त्या कलाकृतीचे वाचन कोणत्या हेतूने, कोणत्या साहित्यिक अंगाने, कोणत्या वैचारिक उद्देशाने वाचन करणार आहोत हे आधी ठरवले पाहिजे. बरीच वाचक मंडळी केवळ कलाकृती वाचायची म्हणून वाचतात मात्र त्यावर आपले मत प्रकट करत नाहीत. त्याकरिता त्या कलाकृतीचे साहित्यिक मूल्य तपासले पाहिजे अशाच एका दर्जेदार साहित्य कलाकृतीचे साहित्यिक मूल्य आपण जाणून घेणार आहोत…..
डॉ. सुनिता चव्हाण, यांची साहित्य कलाकृती “भयातून निर्भयाकडे संवाद सेतू” वाचनासाठी हातात आली आणि कितीतरी वेळ त्या कलाकृतीच्या मुखपृष्ठाकडेच बघत राहिलो. मुखपृष्ठचित्रकार संतोष घोंगडे यांनी अत्यंत कल्पकतेने, कथासंग्रहातील प्रत्येक संवादकथेला समर्पक असे मुखपृष्ठ साकारले आहे. या संग्रहात दिलेल्या सर्व संवाद लेखाचे शीर्षक या मुखपृष्ठावर टाकले आहे, तसेच एका चिंताग्रस्त स्रीचे प्रतिक काळ्या गडद रंगात घेतले आहे त्यातून एका स्वच्छ शुभ्र धवल रंगाच्या पेहरावात असलेल्या स्रीचे हात वर करून हर्ष उल्हासीत होऊन बाहेर पळतांनाचे चित्र दिसत आहे.. तिच्या भोवती लाल रेबीन सुटलेली दिसत आहे. या कलाकृतीचे शीर्षक देखील तीन भिन्न रंगात दिले आहे तर शेजारी एका वर्तुळाचे चिन्ह असून त्याला + चे चिन्ह जोडून त्याला एक दोरी इंग्रजी एस आकारात दिसत आहे. कोणतीही कलाकृती वाचण्याआधी तिचे मुखपृष्ठ समजले पाहिजे, ते वाचता आले पाहिजे.. आज आपण या कलाकृतीच्या साहित्यिक मुल्यासोबतच मुखपृष्ठ समजून घेऊ.
या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर काळ्या गडद रंगात एका चिंताग्रस्त , भयग्रस्त स्रीचे प्रतिक दाखवले आहे. तिला तिच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी म्हणजे हा काळा रंग आहे. हा काळा रंग स्रीला एक वेगळे स्थान दाखवतो… समाजातील प्रत्येक स्री मग ती कुणाची आई, बहिण, पत्नी, मावशी, काकी, कुणाची मुलगी असेल तिला प्रत्येक महिन्याला पाळी येत असते .. ही मासिक पाळी म्हणजे स्रीला जरी वरदान असले तरी तिच्यासाठी ते पाच दिवस काळे असतात, वर्ज असतात. या पाच दिवसात तिला खूप त्रास होत असतो. हा त्रास म्हणजेच तिला नकोसे असलेले काळे दिवस होय.. म्हणून तिला काळ्या गडद रंगात चिंताग्रस्त दाखवले आहे. स्री नेहमी चिंतेत असते, बालवयातील लैंगिक शोषणाची चिंता, तरुणपणी भावी आयुष्याची चिंता , त्यानंतर बाळंतपणाची चिंता, मुले संगोपनाची चिंता, परिवारात असलेल्या व्यवस्थेची चिंता, एकटीला कुठे जाण्याची चिंता, निर्णय प्रक्रियेची चिंता अशा अनेक चिंता घेऊन स्री जीवन उपभोगत असते आणि म्हणूनच मुखपृष्ठकार संतोष घोंगडे यांनी अतिशय समर्पक चिंताग्रस्त भयग्रस्त स्रीचे प्रतिक रेखाटले आहे.
याच मुखपृष्ठावर काळ्या गडद रंगाच्या चिंतातूर, भयग्रस्त स्रीच्या प्रतिकेतून एका शुभ्र धवल स्रीची प्रतिमा बाहेर पडताना दाखवली असून तिच्या भोवती एक रेबीन सळसळताना दिसत आहे.. पांढरा शुभ्र रंग शांततेचे प्रतिक आहे… काळ्या गडद रंगाच्या भयग्रस्त विचारांतून ही प्रतिमा बाहेर पडताना दिसत आहे. म्हणजेच स्री तिच्या भयातून मुक्त झाली आहे… तिला सामोपचाराने भयमुक्त केले आहे. तिला भयगंडाच्या पट्टीने करकचून बांधून ठेवले होते.. तिला एक प्रकारे फोबिया झाला होता पण ती आता मुक्त झाली आहे.. तिच्या शरिराभोवती बांधून ठेवलेली चिंतेची, भयाची पट्टी आता गळून पडली आहे… आणि आता निर्भय झाली आहे.. भयातून निर्भयाकडे निघाली आहे… कदाचित लेखिका डॉ सुनिता चव्हाण यांना हेच सूचित करायचे असेल नव्हे तर या भयग्रस्त चिंतेतून बाहेर आली आहे असे सूचित केले आहे…
लेखिका डॉ सुनिता चव्हाण यांचे या स्वतः डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना त्या आपल्या मवाळ शब्दात बोलते करतात आणि त्यातून मानसिक समोपचाराने, बोलते केल्याने रुग्णाच्या मनातील भीती निघून जाते आणि मग त्यावर योग्य उपचार, समुपदेशन करता येते. या त्यांच्या अनुभवांचा संवाद या कथासंग्रहात त्यांनी आपल्या कल्पकतेने गुंफला आहे. त्यांच्या कथासंग्रहात ज्या शीर्षकाने कथा आल्या आहेत त्या मुखपृष्ठावर घेऊन त्या विषयाला गांभीर्याने घेतले आहे. समाजातील तरुण मुली-मुले यांच्या वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या बदलाच्या जाणिवा, काही वयस्क स्री-पुरुष यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांना या संवादसेतूच्या माध्यमातून जाणिव करून देण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे म्हणूनच त्यांनी या विषयांना मुखपृष्ठावर घेतले असावे असे मला वाटते…. तसेच त्यांनी कलाकृतीचे शीर्षक “भयातून निर्भयाकडे.” संवाद सेतू हा वेगळ्या रंगात घेतले असून ‘…’ असे तीन टिंब दिले आहेत याचा अर्थ हा काळ्या गडद विचारांच्या “भयातून” अंधारातून “निर्भयाकडे” प्रकाशाच्या उजेडाच्या दिशेने अविरत प्रवास सुरु आहे… तो पुढे असाच सुरु रहावा या अर्थाने हे तीन टिंब आलेले असावे. इतका गहन अर्थ मला यातून जाणवला.
मुखपृष्ठ हे इतके अर्थपूर्ण आहे यावरून या साहित्य कलाकृतीच्या दर्जाचा अंदाज येतो आणि म्हणूनच डॉ. सुनिता चव्हाण यांच्या भयातून निर्भयाकडे संवाद सेतू या कलाकृतीच्या मार्च २०२२ पासून केवळ अकरा महिन्यांत सहा आवृत्त्या निघाल्या आहेत हे या लेखिकेचे आणि प्रकाशक डिंपल प्रकाशन यांचे साहित्य कलाकृतीच्या साहित्यिक दर्जावरील प्रेम आहे
जसजसे या कलाकृतीच्या अंतरंगात डोकावत जाल तसतसे या कलाकृतीच्या साहित्यिक दर्जाचे मोल लक्षात येते. कलाकृतीच्या सुरुवातीलाच तत्कालीन उद्योग, खनिकर्म, पर्यटन, न्याय व विधी विभाग राज्य मंत्री मा आदिती सुनील तटकरे यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य प्रा. रत्नदीप कर्णिक यांचे आशीर्वाद या कलाकृतीला लाभले आहेत. प्रसिद्ध कवी प्रा. अशोक बागवे तसेच मा. सतीश सोळांकूरकर यांच्याही शुभेछ्या लाभल्या आहेत. या कलाकृतीला पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रस्तावना लाभणे हे या कलाकृतीचे सर्वात मोठे भाग्य आहे असे मी मानतो. तसेच अत्यंत लीनपणे आपल्या “मनातलं” सांगून डॉ सुनिता चव्हाण यांनी कलाकृतीच्या निर्मितीमागच्या हाताचे आभार मानले आहेत ही लीनता अंगी असणे चांगल्या साहित्यिकाचे लक्षण आहे असे मी मानतो.
भाग-२ कलाकृती परीक्षण
आपण पहिल्या भागात डॉ सुनिता चव्हाण यांच्या भयातून निर्भयाकडे संवाद सेतू या साहित्य कलाकृतीच्या मुखपृष्ठाचा अभ्यास केला आता या साहित्य कलाकृतीच्या अंतर्रंगात फेरफटका मारणार आहोत.या संग्रहात एकूण २२ संवाद कथा आहेत .. प्रत्येक कथा ही वेगळा विषय आणि आशय घेऊन आलेल्या आहेत. या कथा सर्वच स्तरातील वाचकांना खिळवून ठेवण्याचे कसब लेखिकेने सांभाळले आहे. वाचक प्रत्येक कथेला आपल्या परिवारातील घटना होऊ शकते या भावनेतून विचार करतो अशी वैयक्तिक पातळीवर नेणारी कथानके या कलाकृतीत गुंफलेले आहेत. या संग्रहातील पहिलीच संवाद कथा ‘मेनोपॉजमधील संभ्रमता’ मधून महिलांच्या मासिक पाळीबद्दल माहिती दिली आहे. सावंत भाऊ आणि शारदा वहिनी यांच्या संवादातून महिलांच्या मासिक पाळी येणे बंद होतांना काय शारीरिक बदल घडून येतात यावर माहिती दिली आहे. बऱ्याच महिला याबाबत अनभिज्ञ असतात. शारदा वहिनीच्या माध्यमातून हा संवाद खूप मार्गदर्शक ठरणारा आहे. वयाच्या साधारणपणे ४५ ते ५२ या वयात मासिक पाळी बंद होणे म्हणजेच रजोनिवृत्ती (इंग्रजीत Menopouse- मेनोपॉज) होऊ शकते यावेळी शरीरातील हार्मोन्सच्या स्रावात बदल घडून येतात, त्याचा परिणाम गर्भाशय, बिजग्रंथी, मासिक रक्तस्राव यावर होतो तसाच परिणाम मानसिक घडामोडींवर देखील होतो. यावेळी काही लक्षणे डॉ चव्हाण यांनी महिलांसाठी आवर्जून सांगितले आहेत. जसे की अंगातून वाफा येतात असे वाटणे, दरदरून घाम सुटणे, अंगावर काटा येणे, छातीत धडधड होणे, वागण्या बोलण्यातून चिडचिडपणा होण्याचा प्रकार होतो.
दुसऱ्या स्तनकॅन्सरची जागरूकता या संवाद कथेतून महिलांच्या स्तन कॅन्सर बद्दल जागृतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. किरण नावाच्या मुलीसोबतच्या संवादातून महिलासाठी काही महत्वाचे मार्गदर्शन केले आहे. “स्तन लहान आहेत म्हणून सौंदर्यात उणीव आहे अशा आत्मविश्वासाचे खच्चीकरण करणारा न्यूनगंड मनातून कडून टाकला पाहिजे, स्तनवृद्धी करणाऱ्या फसव्या जाहिरातींपासून अलिप्त राहिले पाहिजे, मसाज करणारी तेल, किंवा हार्मोन्सची इंजेक्शन, मेडिसिन अशा कोणत्याही उपचाराने स्तनवृद्धी होत नाही” स्तनवृद्धी म्हणजे सौंदर्य ही मनोनिर्मित कल्पना आहे. स्तनांची काळजी कशी घ्यायची बाबत सुंदरसे मार्गदर्शन या संवाद कथेतून झाले आहे.
मनाचे दुभंगलेपण या कथेतून स्रीच्या मनाचे दुभंगलेपण यावर संवाद साधून सामोपचाराने यावर मार्ग काढून कमलामधील गुरुजींच्या बद्दल ओढ निर्माण झाली होती. तिच्या नवऱ्यासोबत चर्चा करून कमलाच्या मनातील दुभंगलेपण ओळखून तिला आपल्या संसारात लक्ष कसे राहील याविषयी मानसिक आधार देवून या संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवला आहे.
प्रत्येक स्रीला मासिक पाळीचे एक वरदान दिलेले आहे. मासिक पाळी आल्यावर काही ठिकाणी महिलांना जाऊ दिले जात नव्हते, याला दैवी शक्तीची जोड लावून देवळात जाऊ दिले जात नव्हते, कशालाही स्पर्श करू दिला जात नव्हता , तिच्यासाठी जेवणाची, झोपण्याची वेगळी व्यवस्था केली जात होती, या चुकीच्या प्रथांना बाजूला ठेवून वैज्ञानिक दृष्टीकोनातून या पाळीकडे बघितले पाहिजे. हा मौल्यवान संदेश “मासिक पाळी : एक वरदान” या कथेतून समाजाला दिला आहे.
पूर्वी विवाह आई वडिलांच्या मर्जीने व्हायचे.. पण हल्ली तो ट्रेंड राहिला नाही. मुल-मुली आता आपल्या पसंतीने एकमेकांची निवड करताना दिसत आहे, मात्र त्यातही काही कुटुंबात आईवडिलांच्या पसंतीने विवाह होत आहे, मात्र समाजात काही मंडळी अशी आहे की, लग्नाआधी नवऱ्यामुलीची अग्नी परीक्षा घेऊ इच्छिता त्यावर या संवादातून खूप मार्गदर्शक प्रकाश टाकला आहे. हल्ली फक्त एकाच बाजूने मुलीच्या चारीत्र्याकडे बघितले जाते.. लग्नानंतर पहिल्या रात्री जर रक्ताचा डाग असला तर मुलगी व्हर्जिन हा गणेश आणि अमोल यांचा गैरसमज या संवादातून काढून टाकला आहे. खो-खो, बास्केट बॉल, सायकल चालवणे, व्यायाम करतांना किंवा अतिश्रमाची कामे करताना योनी पटल फाटले जाते अशा वेळी पहिल्या रात्री संभोग करतांना रक्तस्राव होईलच असे नाही.. तेव्हा प्रत्येक वेळी मुलीला संशयाने बघता कामा नये हा महत्वाचा संदेश “अग्नीपरीक्षा स्रीत्वाची” या संवाद कथेतून लेखिकेने अत्यंत समजूतदारपणे मांडला आहे.
बाळंतपण : आज- कालचे या संवाद कथेतून रेश्मा आणि तिची आजी यांना नवीन पिढीने बाळंतपणातील काय काळजी घ्यायची , कोणकोणत्या टेस्ट करणे गरजेच्या आहे, ॲबॉर्शन कशाने होते, त्यामागची कारणे काय आहेत, पूर्वी गरोदर महिलेला पहिले चार महिने कुठे गावाला जाऊ देत नव्हते, त्यामागचे शास्रीय कारणे वेगळी होती, ती कारणे काय आहेत यासह नॉर्मल डिलिव्हरी कशी व्हावी, या काळात आहार कोणता घ्यावा, कधी घ्यावा याबाबत महिलांना मार्गदर्शनपर संवाद घडवून आणला आहे.
या संवाद कथांमधून लेखिकेने समाजातील काही अनिष्ट प्रथा, महिलांच्या मनातील काही शंका, तसेच महिलांनी समाजात वावरताना, कोणती काळजी घ्यावी, याबाबत सखोल अभ्यासातून मार्गदर्शन तर केलेच आहे पण काही ठिकाणी महिलांच्या चुकाही निदर्शनास आणून दिल्या आहेत.
बऱ्याचदा आई वडील दोघही नोकरी निमित्ताने अथवा काही कामानिमित्ताने दररोज घराबाहेर असतात अशावेळी लहान मुलांना पाळणाघर, अथवा एखाद्या ओळखीने शिशुपालन केंद्रात ठेवले जाते, किंवा ओळखीच्या व्यक्तीकडे अभ्यासासाठी ठेवले जाते त्यावेळी तेथील व्यक्ती मुलींना कशाप्रकारे सांभाळतात यावरही अनघा आणि तिची मुलगी सई यांच्या संवादातून लेखिकेने चुकीच्या बाबी निदर्शनास आणून दिल्या आहे. सई ज्या व्यक्तीकडे क्लासला जात होती ती व्यक्ती सईच्या शरीराला नको त्या ठिकाणी स्पर्श करत असे. सई त्यामुळे घाबरली होती, चुणचुणीत मुलगी पण भीतीने शांत झाली होती. अनघाने तिला डॉक्टरकडे नेले तेव्हा डॉक्टर सुनिता चव्हाण यांच्या लक्षात आले की, मुलीला काय झाले आहे, त्यांनी समोपचाराने सईची आई अनघा यांना सल्ला देवून क्लास बदलायला लावला तेव्हा सई खूष झाली… ‘स्पर्श : चांगला/वाईट’ या लेखातून पालकांनी अशा लहान लहान गोष्टी मुलांशी हितगुज करून जाणून घेतल्या पाहिजे असा संदेश लेखिकेने दिला आहे.
या संग्रहातील सर्वच कथा समाजाला एक दिशा देणाऱ्या आहेत. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कथासंग्रहाचे घरोघरी वाचन व्हायला हवे. हस्तमैथुन : एक समस्या, पौगंडावस्थेतील भावना : प्रेम की आकर्षण , मुलांची स्फोटक वृत्ती: चूक कोणाची? भयाचा डोह, या कथा एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जातात तर “आधी संस्कार मग साधने” या कथेतून मुलांना योग्य संस्कार देण्याबाबत काही मार्गदर्शन देखील केले आहे. मुलांना पाळणाघरात ठेवले जाते तेथे मुलांना काय शिकवले जाते, त्यांच्यावर कोणते संस्कार केले जातात हे पालकांनी पहिले पाहिजे.
अभ्यासाचा गुंता आणि पालक, किडनी: दुर्लक्षिलेला एक अवयव, काळ आला होता…. नको ती वजनवाढ, देहदान: उत्कृष्ट आविष्कार, व्यायाम : मनाचा! , चांगल्या सुनेची चांगली सासू: दुर्मिळ किताब , लॉकडाऊन आणि कोविड कथा या सर्व कथा वाचनीय असून समाजातील प्रत्येक घटकांनी यावर विचार करून आपल्या घरातील, शेजारील, आणि एकूणच समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे. महिलांनी स्वतःमधला आत्मविश्वास जागृत ठेवला पाहिजे. अत्यंत समजूतदारपणे, सर्वांना समजेल अशा शब्दात लेखिका डॉ सुनिता चव्हाण यांनी “भयातून निर्भयाकडे संवाद सेतू” या कथासंग्रहातील कथा गुंफल्या आहेत. वाचकाला खिळवून ठेवण्याचे कसब त्यांनी अतिशय सुलभपणे हाताळले आहे तसेच समाजाला एक मार्गदर्शक म्हणून या संग्रहाकडे बघता येईल.
“भयातून निर्भयाकडे संवाद सेतू” या संवाद कथांच्या माध्यमातून लेखिकेने जे मांडले आहे ते नक्कीच समाजाने उचलून धरले आहे आणि म्हणूनच या कलाकृतीच्या १९ मार्च २२ पासून केवळ अकरा महिन्यांत या कलाकृतीच्या सहा आवृत्यांचे प्रकाशन करण्याची संधी ‘डिंपल प्रकाशन’ यांना लाभली आहे. या कलाकृतीची अक्षर जुळवणी डोंबिवली येथील गुरुकृपा लॅमिनेटर्स यांनी अत्यंत सुबकपणे केली असून नवी मुंबई येथील प्रिंटवन ग्राफिक्स यांनी मुद्रण करून या कलाकृतीला एक वेगळा ठसा दिला आहे. या कलाकृतीच्या वैभवात भर टाकण्याचे महत्वाचे काम केले असेल ते मुखपृष्ठचित्रकार संतोष घोंगडे यांनी. अत्यंत कल्पकतेने आणि प्रत्येक संवाद कथेला साजेसे, अनुसरून मुखपृष्ठ सजवले आहे. लेखिका डॉ सुनिता चव्हाण यांच्या अभ्यासपूर्ण आणि अनुभवातून आलेल्या संवादाला कागदावर उतरवून वाचकांपर्यंत पोहच केले त्यामुळे तर वाचकांनी या कलाकृतीला डोक्यावर घेतले आहे. आणि म्हणूनच या कलाकृतीच्या सहा आवृत्तीत प्रकाशन झाले आहे.
लेखिका डॉ सुनिता चव्हाण यांना पुढील दर्जेदार लेखनीस हार्दिक शुभेच्छा…
पुस्तक परिचय:
भयातून निर्भयाकडे संवाद सेतू – कथासंग्रह
लेखिका – डॉ सुनिता सुनिल चव्हाण
(संपर्क +91 92700 53602)
प्रकाशक : डिंपल प्रकाशन , मुंबई
मुखपृष्ठ – संतोष घोंगडे
मुद्रक : प्रिंटवन ग्राफिक्स
अक्षर जुळवणी: गुरुकृपा लॅमिनेट्स
मूल्य- रु. २५०/-
परिक्षण
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
सर, खूप छान प्रसिद्धी दिली
हा संग्रह आवर्जून वाचावा.. महिलांना आणि मुलींना यातून निश्चित काही बोध घेता येईल
खूप खूप धन्यवाद दादा..खूप सुंदर समीक्षण केले आहे..अप्रतिम ..मला लेखिका म्हणून जे काही सांगायचे आहे ते तुम्ही संक्षिप्त मध्ये खूप छान मांडले आहे.
डॉ साहेबा
आपल्या लेखनीतून खूप काही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मानसिक, शारिरीक, कौटुंबिक, आर्थिक अशा विविध मार्गांनी आपण सामोपचाराने तोडगा काढला आहे.
ही कलाकृती सर्वांनी वाचावी आणि इतरांना वाचण्यास प्रवृत्त करावी अशी दर्जेदार आहे.
गौरव प्रकाशन यांनी यासाठी स्थान दिले हे कार्य महान आहे