मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शासनाच्या योजना, महत्त्वाचे निर्णय, विविध घोषणा आणि अधिकृत माहिती थेट मोबाईलवर मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) WhatsApp Channel आणि Public App वर अधिकृत खाती सुरू केली आहेत.
आता नागरिक “DGIPR, Govt of Maharashtra” या नावाने WhatsApp Channel फॉलो करून शासनाच्या सर्व अधिकृत घडामोडींची माहिती थेट मिळवू शकतात. तसेच Public App वर @mahadgipr या अधिकृत खात्यावरूनही शासनाच्या बातम्या आणि अपडेट्स उपलब्ध होणार आहेत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे महाराष्ट्र शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच नागरिकांच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी हे महासंचालनालय पार पाडते.
डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेऊन आता WhatsApp Channel आणि Public App सारख्या प्लॅटफॉर्मवरही महासंचालनालयाने अधिकृत उपस्थिती नोंदवली आहे. त्यामुळे नागरिकांना जलद, अचूक आणि खात्रीशीर माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
शासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत आणि सत्य माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेल्सना फॉलो करावे.







