
पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?
देहराडून (उत्तराखंड) : प्रेमाला ना वयाचं बंधन, ना नात्याचं! पण या “प्रेमकहाणी”नं मात्र नात्यांचे सगळे अर्थ बदलून टाकले आहेत. उत्तराखंडातील देहराडूनमध्ये घडलेली ही घटना ऐकून कुणीही थक्क होईल कारण इथे फक्त पत्नीच नव्हे, तर पतीदेखील आपल्या जोडीदाराला सोडून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये गेले आहेत!
एका विवाहित महिलेने आपल्या पतीला आणि तीन मुलांना सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण यानंतर जे घडलं ते आणखीन धक्कादायक तिच्या पतीलाही दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जाताना पाहून लोकांचं डोकं फिरलं. आता प्रश्न एकच मुलांचं काय?
महिला आयोगाकडे दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल झाली आहे. पत्नीचं म्हणणं “माझ्या पतीला एका महिलेनं फसवलं!” तर पतीचं म्हणणं “माझ्या पत्नीची दिशाभूल करण्यात आली!” आता नेमका बळी कोण आणि दोषी कोण हे ठरवणं आयोगासाठीचं कोडं बनलं आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा कुसुम कंडवाल यांनी पोलिसांना या दोघांचा शोध घेऊन आयोगासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही पक्षांचे समुपदेशन होणार असून, मुलांच्या संगोपनाबाबतही निर्णय होणार आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेवर जोरदार चर्चा सुरू आहे. काहींनी याला “आधुनिक प्रेमकहाणी” म्हटलं, तर काहींनी “संसाराचा तमाशा” असं संबोधलं.
लोक म्हणतात “आता संसार नाही, ‘लिव्ह-इन’ हीच नव्या पिढीची परंपरा झाली आहे!”