
भोज्याभाई: आमच्या गावातील पानाचा पेटारा आणि पारंपरिक नागवेली पानांचा वारसा
आमच्या गावात डोक्शावर पानाचा पेटारा घेऊन कधी पायदळ तर कधी मिळेल त्या वाहनानं दहिहांडयाचा भोज्याभाई यायचा. वयाची साठी ओलांडलेला व डोक्शावरचे केस विरळ झालेला.मळलेला सदरा,आखुड पायजामा मध्यम किडकिडीत शरीरयष्टी.दाढीचे खुंट वाढलेले,गयाभोवती लपेटलेली लाला शापी, म्हणजे आताच्या भाषेत दुप्पटं,पायात टायवरी चप्पल घातलेला असा भोज्याभाईचा अवतार होता.
धर्माने मुसलमान असूनही अस्खलित पिवर मऱ्हाटी बोलायचा. तसं त्याचंच गावचं एवढं मोठं होतं की त्याले पानाचा पेटारा डोक्शावर घेऊन ईकडे तिकडे फिरायचं कामंही नव्हतं. त्याच्याच गावात त्याचा पानाचा धंदा व्हायचा. पंरतु लोकांच्या गरजा भागविण्यासाठी व आपल्यालाही दोन पैसे भेटावे या लालसेपोटी बिच्यारा दोन दिवसाआड नित्यनेमाने यायचा. बाकी दिवस आजुबाजूच्या खेड्यापाड्यात तो डोक्यावर व एक काखेत पानाचा पेटारा घेऊन पानं विकायचा.
अमरावती लोतवाडा ते दहिहांडा म्हणजे पाच कोसाचं अंतर दहिहांडयाचा शनीवारचा मोठा आठवडी बाजार भरायचा. हा बाजार एवढा मोठा होता की तसा बाजार पुऱ्या पाच पंचवीस खेड्यांच्या पंचक्रोशीतही बघायला मिळायचा नाही. ज्वारी गहू, धान्य, भाजीपाला,तेल किराणा,गुळ,उस, भाजीपाला, कपडालत्ता,कटलरी, टायर-टयुब पासून सारंच सामान या गावात भेटायचं.आजूबाजूच्या गावखेडयातून बेपारी बाजारात यायचे.
पाल टाकून आपापली दुकाने मांडायचे.गावात सुंदर नदीकाठी रूपनाथ महाराजांच भव्यदिव्य मंदिर वर्षाकाठी मोठी यात्रा भरायची. समोरच्या विस्तिर्ण पसरलेल्या पटांगणात मोठमोठ्या पंक्ती जेवायला बसायच्या. संध्याकाळी मोठा सागवानी काळा गुळगुळीत तेल मारलेला मोठा रथ निघायचा. एरव्ही वर्षभर टिनाच्या सपरीत पाऊसपाणी लागू नये म्हणून झाकलेला. गावात बारावी पर्यंत शाळा होती.
आजुबाजूच्या परिसरातील मुलं आपापल्या सायकली घेऊन नदी, हिरवीगार शेतं ओलांडून शाळेत शिक्षणासाठी यायची.गावाच्या चौकात हमेशा साथ भरलेली असायची. साथ म्हणजे भाजीपाल्याची दुकानं. त्यामुळे बऱ्याच येणाऱ्या जाणाऱ्यांचा दणदणाट रहायचा.
तरी एवढं सारं गावचं वैभव सोडून भोज्याभाई सगरा,सगरानं पायदळ आमच्या गावात विड्याच्या पानांचा पेटारा घेऊन यायचा. कधी गावच्या आठवडी बाजारात पानाचा पेटारा घेऊन बसायचा. गावातली म्हातारी,कोतारी माणसं भोज्याची टक लावून वाट बघत ओट्यावर बसलेली असायची. एखाद्यानं पान मागीतलं तर खिशात हात घालून चंचंई काढून देणारी लोकं भोज्याभाई आला नाही म्हणजे कासावीस व्हायची.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
कोणी पानची जबरदस्ती केलीच तर मोठ्या नाईलाजाने पानावालाच तं आला नाही राज्या आजून, म्याच तं चंचंईतलं वायेल चियेल होतं एक तेच खाल्लं तरी पान खाणारा इरेला पेटून इन, ना कुठी जाईन नवरा करून,आता तं भोज्याभाई मले महादेव बुढयाच्या चक्कीजोळ झयकला एवढं ऐकलं म्हणजे समोरचा जिवात जीव येऊन मोठ्या खुशीनं कमरेचा बटवा काढून द्यायचा. तेवढ्यात एक पेटारा डोक्शावर व एक काखेत घेऊन भोज्याभाईची सवारी दारात हजर असायची. प्रत्येकाच्या घरासमोरून भोज्याभाई पानं $$$$$ अशी मोठ्यानं आरोळी देत समोर पाय टाकायचा.
आमची आजी शांता बुढी पानाची मातीची गंगुली झटकून ठेवायची. कमरीले खोचलेल्या पिवशीतून चिल्लर काढून आठाने, रूपयाची पानं विकत घेतली म्हणजे पाण्यानं ओलसर असलेल्या बोंदरीनं कनोड्यात झाकून ठेवायची. विशेष म्हणजे ही पानाची गंगुली ठेवण्यासाठी भितीत जमीनीच्या समान अंतरावर स्पेशल कनोडा कोरलेला होता.कधीकधी आम्ही चोरून निस्तच पान खायचो तर बुढी आमच्यावर ओरडायची. ‘पहा रे बुवा हप्ताभर पानं पुरली पाहिजे म्हणून जतावून सांगायची.
कधी बुढीचं काम केलं म्हणजे आनंदाच्या भरात कात,चुना, बारीक सुपारी टाकून फक्त अर्ध्याच पानाचा टुकडा खायले द्यायची. अशी तं गंमत होती. तेव्हा जेवणानंतर पान खाणाऱ्यांची संख्या मोठी होती. घराच्या ओट्यावर पितयच्या दातकोरणीनं दात कोरत बसलेली म्हातारी माणसं आपल्या घरासमोरून कोणीही येणारा जाणारा असला म्हणजे त्याला गिलासभर पाणी देऊन आदरभावानं आवर्जून त्याच्या समोर पानपुळा ठेवायची.एवढी दानत त्यांच्यात शिल्लक होती.
तशा मोहल्ल्यातल्या दोनचार बाया गप्पागोष्टीसाठी एकत्रित आल्या म्हणजे आपसूकच पानचंचईची व पानाची देवाणघेवाण व्हायची.तेव्हा आजूबाजूला पानाची मळेही भरपूर प्रमाणात होती.अमरावती जवळ बडनेऱ्याला लागून अंजनगाव बारी आहे. बाऱ्याचं अंजनगाव म्हणून त्याची ओळख होती. म्हणजे पानमळे पिकवणारे बारी लोकं जास्त असल्याने त्याला अंजनगाव बारी या नावाने ओळखले जायचे. पेटारेच्या, पेटारे तेव्हा एसटी,बसनं अमरावतीच्या बाजारात विकण्यासाठी यायचे.
आताही येतात पंरतु मानमळेच संपुष्टात आल्याने पानाचा माल स्थानिक कमी व बाहेरून म्हणजे हैदराबाद वरून ही पानाची पेटारे बहुतांश येतात. हल्ली शेतीच्या पिकांच्या पद्धती बदलल्याने विड्याची पानमळे जवळजवळ मोडीतच निघाली. तसंही विड्याचं म्हणजे नागवेलीचे पान आयुर्वेदामधे महत्वाचं मानलं आहे. हे विडयाचं पान सर्दी खोकला कमी करण्यास मदत तर करतात परंतु दमा आणि श्वसन विकारांसाठीही विड्याची पाने उपयुक्त आहेत. तसेच या पानाचे अनेक पारंपारिक आणि औषधी महत्त्व आहे.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
नागवेलीची पाने हे विविध संस्कृतीमध्ये आणि औषधी गुणधर्मासाठी वापरली जातात. या पानांना काही भागात खाऊचे पान म्हणूनही ओळखले जाते. या पानांना काही भागात खाऊचे पान म्हणूनही ओळखले जाते.
नागवेलीला आपल्याकडे धार्मिक अधिष्ठानही मिळालेले आहे. घरात कोणतीही पूजा असल्यास सर्वात प्रथम खाऊची म्हणजे विड्याची पाने आणली जातात. त्यामुळे सहज मिळत असल्याने या पानांचा उपयोग घेता येतो.
हल्ली पानाचे तांडे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने अनेक जण आता आपल्या घराच्या कुंड्यांमध्येही खाऊच्या पानांचा वेल लावून ती पाने वापरतात. या विड्याच्या पानांचा गरम पाण्यात काढा करून घेतल्याने श्वास मार्ग मोकळा होतो. लहान मुलांना सर्दी, खोकला झाल्यास नागवेलीच्या पानांना तिळाचे तेल लावून थोडे कोमट करून ते मुलांच्या छातीवर ठेवले तर कफ सुटण्यास ही लवकर मदत होते.
नागवेलीचे पान चघळल्याने पचनक्रिया सुधारते. तोंडाला चव नसणे, घसा खवखवणे, यावरही हे पान उपयुक्त आहे. यामध्ये रोगप्रतिकारक गुणधर्म आहेत.त्यामुळे हे पान त्वचाविकारांवर आणि जखमांवर प्रभावी व गुणकारक आहे. नागवेलीचे पान चघळल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होतेच परंतु त्यचबरोबर दात व हिरड्या सुद्धा मजबूत होतात.

नागवेलीची हिरवीगार पाने त्यात चुना, काथ वेलदोड्याची दाणे,घरी फोडलेली बारीक केलेली सुपारी,बडीशेप, गुलकंद, सुकं ओले खोवलेले खोबरं, लवंग लावून विडा बनवला जातो. हा विडा विशेष म्हणजे आजी आजोबांचा पानपुडा म्हणून त्याची आपल्या घरा-घरात अजूनही ओळख आहे.
हल्ली लोकसंख्या वाढली दळणवळणाची साधनेही भरपूर प्रमाणात वाढली. तेव्हा असलं काही नव्हतं. त्यामुळे कमी गरजांमधे मस्त साधंसुधं जिवन हे लोकं जगायची.तेव्हा प्रत्येक खेडेगाव हे स्वयंपूर्ण होतं.कारण गावपातळीवर कारागीर गावातील लोकांच्या गरजा गावातच भागवत असत.त्यामुळे इतर ठिकाणी जाण्याची त्यांना गरजच भासत नसे.
गावरहाटीमध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असल्याने व आपापल्या परीने कामधंदा करून समाजव्यवस्थेला हातभार लावायचे. त्यामधे कुंभार सुतार,तेली, लोहार, चांभार,न्हावी ,कोळी, गुरव,मातंग समाजाचे लोक असायचे. परंतु गावे जर मोठी असतील तर त्यामध्ये पाणभरी कोळी, तेली, तांबोळी, कुंभार,महार, परीट, गुरव व मातंग समाजाचे लोक असायचे.त्यांची काम करण्याची एक वेगळी पद्धत होती.
त्यांनी पुरविलेल्या सेवेच्या बदल्यात रोख रक्कम वा पैसा न देता समाजात वस्तुविनिमय प्रणाली अस्तित्वात होती. समाजव्यवस्था त्यांना धान्याच्या किंवा इतर वस्तूंच्या रूपात मोबदला मिळायचा. जो त्यांच्या दैनंदिन उपजिवीका भागवण्यासाठी पुरेसा असायचा. या गावगाडयाचा महत्वाचा घटक हा ता़ंबोळी समाज होता. त्यांचे नाग वेलींच्या पानांचे तांडेच्या,तांडे होते.
बारा बलुतेदार म्हणून त्यांना समाजात मान्यता होती. गावामध्ये असणाऱ्या लग्नसमारंभ
सण,पोथीपारायणांचं उद्यापणं,धार्मिक पूजा, उत्सव, यात्रा,चातुर्मास, अधिकमास इत्यादी धार्मिक कार्यासाठी नागवेलीच्या म्हणजे कात,चुना टाकून खाण्याचा विडा किंवा पानांची मोठ्या प्रमाणावर विक्री करून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्या समाजाला विशेष महत्त्व होते.
त्याचप्रमाणे अनेक सण समारंभात, लग्नकार्यांत जेवणानंतर विड्याची पाने खाण्याची म्हणजे तांबुलविडा खाण्याची प्रथा अस्तित्वात होती.व अजूनही आहे.देवीला सुद्धा तांबूलविडा देण्याचं पारंपरिक काम या समाजाकडे आवर्जून आहे. त्यासाठी विड्याची पाणी पुरवण्याचे काम हे तांबोळी समाजाला करावं लागायचं. गावापातळीवर मोठमोठया खटल्यात वा लोकांच्या घरोघरी पानांची पेटारे डोक्यावर घेऊन खाण्याची पानं पुरविणं वा बाजारहाटी विकणे यावर त्यांचा प्रपंच चालायचा.
● हे वाचा – नाट्यप्रेमी करजगाव
यासाठी त्यांना वर्षभरातून एकदा धान्यरूपाने बलुतं द्यावं लागायचं. जनग्रामीण जनजीवनाशी निगडित असलेली बलुतेदारी ही पद्धत गावगाडयाची प्रमुख रक्तवाहिनी होती. त्या काळात शेती हीच लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याने शेतकरी स्वतासाठी पिकवून उर्वरित अन्नधान्य,भाजीपाला इतरांना देऊन किंवा उसनवारी करून गावगाडयातील लोक त्या बदल्यात पैशाच्या रूपाने म्हणा किंवा धान्याच्या रूपाने या लोकांना वाटायचा.
या गावपातळीवर महत्वाची सेवा देणाऱ्या लोकांना तेवढाच घरप्रपंच व दैनंदिन चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनाही या गोष्टींचा आधार असायचा.अडल्या,नडल्याच्या जिवनावश्यक गरजा गावातच भागल्या जात असल्याने कोणी उपासी झोपला असं कधी ऐकिवात नाही. जातीधर्माच्या भिंती झुगारून गावरहाटीचा मुख्य घटक राहिलेला भोज्याभाईही ईमान इतबारे वंशपरंपरागत हे वहिवाटीचं काम करत होता.
लगनघरी पै-पावणे रावणे असल्याने लगन वारासार होईपर्यंत दोनतीन दिवस विडयाची पाने पुरवण्यासाठी पाच कोसाचं अंतर पायी तुडवत तो आठवणीनं गावात चक्कर मारायचा. कोणं आठान्या,रूपयाची मागो की विस, पंचवीस चिल्लर पैशाची,तरी कधीही त्रागा वा चिडचिड न करणाऱ्या व गावरहाटीची इमान- इतबारे चाकरी करणाऱ्या व वयोमानानं काळाच्या उदरात गडप झालेल्या भोज्याभाईची जागा अद्याप मात्र कोणीही घेतली नाही हेही तितकंच खरं.!

– विजय जयसिंगपुरे, अमरावती
भ्रमणध्वनी – ९८५०४४७६१९
• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
