अर्ध्या तिकिटाच्या मागे पूर्ण वेदना.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

अर्ध्या तिकिटाच्या मागे पूर्ण वेदना.!

नेहमीप्रमाणे काल मी एस. टी.ने प्रवास करत होतो.धाराशिव ते छत्रपती संभाजी नगर या बसने मी निघालो होतो.गाडीत गर्दीही बरीच होती. कंडक्टर साहेब तिकीट काढत होते.त्यांचा चेहरा त्रासलेला होता.उन्हामुळे गडी घामाघूम झालेला होता.अधून मधून खांद्यावर टाकलेल्या रुमालाने घाम पुसत पुसत तिकीट काढण्याचे काम सुरूच होते…

       गेल्या चार महिन्यापूर्वी एस. टी ने तिकीट दरात वाढ केलेली आहे.पण ही वाढ करताना एक मूर्खपणा केला आहे.आधी तिकीट दर राऊंड फिगर मध्ये असायचा.म्हणजे की जसे पंचावन्न रुपये,साठ रुपये असे..पण आता वाढ झाल्यापासून सत्तावन रुपये त्रेसष्ट रुपये असा दर लागतो.यामुळे सुट्टे पैसे यावरून भरपूर वाद होतात.आणि असा वाद घालत घालत कंडक्टर तिकीट काढत होता. बऱ्याच लोकांकडे वरचा एक रुपया दोन रुपया अशी चिल्लर नसल्यामुळे कंडक्टर वाद घालून वरचा एक दोन रुपया तसाच सोडून पुढे पुढे येत होता.महिलाना अर्धी तिकीट आहे.पण एकही महिला राहिलेलं दोन चार रुपये सोडत नव्हती.ती भांडून पैसे घेत होती.महिला असल्यामुळे कंडक्टर ही जास्त वेळ न घालवता पैसे परत करत होता.

     तो तिकीट काढत काढत माझ्याजवळ आला.आणि माझं तिकीट चारशे एक्यानव झालं.माझ्याकडे ही वरचा एक रुपया नव्हता.मी पाचशे रुपये काढले.तो केविलवाणे मला म्हणाला “साहेब,एक रुपया बघा असेल तर…मी नाही म्हणालो…पण पेमेंट ऑनलाइन करू शकतो असे सांगितले.त्यावर त्याचा चेहरा खुलला आणि स्कॅनर उघडून त्याने मशीन समोर केलं.मी पेमेंट केलं..

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

       मी त्याला सहज म्हणालो,जर माझ्याकडे एक रुपया नसता.ऑनलाइन ही सुविधा नसती तर काय केलं असतं…? तो त्रासून म्हणाला आता पाहिले असेल की तुम्ही… वरचे सगळे पैसे माझ्याच खिशातून भरले मी…दिवसभरात असे आमचे पन्नास साठ रुपये खिशातले जातात… डेपोत तिकिटाप्रमाणे सगळा हिशोब व्यवस्थित द्यावा लागतो.लोकांसोबत वाद घालून डोकं गरम करून घेत नाही…असे बोलून त्याने आलेला घाम पुसला…

         तेवढ्यात त्याच्या खिशातला फोन वाजला.त्याने फोन उचलला.बहुतेक त्याचा घरातून त्याच्या बायकोचा फोन आलेला होता..ती काय म्हणाली माहित नाही .पण हा गडी वैतागून बोलला…”काय , ग तुझी किटकिट…आधीच इथ पगार नीट झाला नाही…आणि वरून तुझं हे ऐकून घेऊ का…? असे बोलून त्याने फोन ठेवला..मी हळूच त्याला विचारलं, “साहेब पगार झाला नाही का..? त्यावर त्याचा हुंदका जो दाटून आलेला होता तो बाहेर पडला आणि म्हणाला, ” साहेब भावाच्या मुलीचं लग्न तोंडावर आलेलं आहे.चुलता म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे.पण पगाराची वाट पाहून जीव आंबून गेला आहे ओ…” 

     डोळ्यात आलेलं पाणी आणि कपाळावरून ओघळत आलेला घाम रुमालाने पुसत तो तिकीट काढण्यासाठी पुढच्या प्रवाशांकडे निघाला…स्वतःच्याच खिशातून एक दोन रुपये भरत महामंडळाचा हिशोब बरोबर देता यावा म्हणून स्वतः रिकामा होत होता.. आणि पगाराचा मेसेज अधून मधून मोबाईलवर चेक करत होता.. आमच्या एस. टी. कामगाराची ही आजची अवस्था मनाला वेदना देत राहिली..

       लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ असणाऱ्या या सरकारला विनंती आहे, ताबडतोब या एस.टी.कामगारांचा पगार त्यांच्या खात्यात जमा करा.लग्नाचा मौसम आहे.अनेकांच्या पोरी अंगाला हळदी लावून तयार आहेत.पण त्यांच्या खात्यात त्यांचा घामाचा मोबदला टाकला नाहीत तर पोरींच्या अंगाला लागलेली हळद पिवळी न होता लालभडक होईल.

      आणखी एक…तेवढ त्या तिकीट दराचा नक्की विचार करून रक्कम राऊंड फिगर  करा…

ही विनंती…

– नितीन चंदनशिवे.

(एक एस. टी.वर प्रेम करणारा सर्वसामान्य प्रवासी.)

कवठेमहांकाळ 

सांगली.

070209 09521

1 thought on “अर्ध्या तिकिटाच्या मागे पूर्ण वेदना.!”

  1. दादा तुमचे सर्व एस टि कर्मच्यार्यांच्या वतीने खुप खुप आभार

Leave a comment