महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रजांचा २७ फेबुवारी जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला.मराठी राजभाषा दिन हा मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. मराठी राजभाषा दिन अर्थात मराठी भाषा गौरव दिन हा महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांचे योगदान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रामध्ये अनमोल आहे.मराठी राजभाषा दिनी मराठी भाषेचा गौरव करावा आणि तिच्या समृद्ध परंपरेचे स्मरण करावे.मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा प्रसार करावा. मराठी भाषेचे संवर्धन करावे त्यासाठी लोकांना मराठी भाषेच्या वापरासाठी लोकांनी आग्रही असणे आवश्यक आहे. कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या विविध साहित्यकृती आणि मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेले योगदान या विषयाला अनुसरून मराठी राजभाषा दिनी विविध कार्यक्रमातून त्यांच्या साहित्यिक व सांस्कृतिक कार्याचे स्मरण करणे आवश्यक आहे . शाळा-कॉलेजमध्ये तथा विविध साहित्य संस्थांनी मराठी भाषेसंबंधी विविध कार्यक्रम व मराठी भाषेतील ग्रंथप्रदर्शनीचे आयोजन करून मराठी भाषेचे संगोपन आणि संवर्धन केले पाहिजे.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? तर अभिजात भाषा हा भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. हा दर्जा मिळाल्याने भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते.अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे जे निकष आहेत ते मराठी भाषेने पूर्ण केले. उदा . संबंधित भाषा प्राचीन असावी आणि त्यातील साहित्य श्रेष्ठ असावे.भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे लागते. त्या भाषेला स्वत:चे स्वयंभूपण असावे.प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा लागतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठीच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल, संशोधन आणि साहित्यसंग्रह करण्याच्या दृष्टीने चालना
मिळेल.सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील ४०० पेक्षा जास्त विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. मराठीतील प्राचीन ग्रंथांना अनुवादित करण्यात सुरुवात होऊ शकते. राज्यातील १२ हजार ग्रंथालयांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या भाषेच्या उत्कर्षासाठी, जपण्यासाठी, त्याच्या संवर्धानासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळू शकेल. मराठी अभिजात भाषेतील साहित्यिकांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील. पुढच्या वर्षीपासून 3 ऑक्टोबर हा मराठी अभिजात भाषा दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत.
“माझा महऱ्हाठाचि बोलु कौतुके ।
परि अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसि अक्षरे रसिके मिळवीन ।।”
मराठी भाषेचे महत्त्व संतकवी ज्ञानेश्वर माऊलीने येथे स्पष्ट केले आहे ते टिकून ठेवणे मराठी माणसाचे आद्यकर्तव्य आहे. सूत्रात ओवलेल्या मण्याप्रमाणे समाजजीवनाच्या सर्व धारणा आणि विकासाच्या प्रेरणा भाषेत ओवलेल्या असतात म्हणून मराठी भाषेवरील संकट हे तिच्या शब्दकोषावरील अथवा सााहित्यावरील संकट नाही तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरील मराठीपणावरील आणि येथील लोकांच्या भवितव्यावरील संकट आहे .
“मराठी असे आमुची मायबोली। जरी आज ती राजभाषा नसे । हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू। हिला बैसवू वैभवाचे शिरी ।।”
असे कवी श्रेष्ठ माधव ज्युलियन म्हणतात. कागदोपत्री मराठी ही राजभाषा झाली आहे पण व्यवहारात अधिकार मान्य झाल्याचे फारसे दिसत नाही.
राज्यभाषेला स्पर्शही न होता आज विद्यार्थी अंतिम पदवीपरीक्षेपर्यंत पोहचू शकतो. हा एक चमत्कारच मानावा लागेल.
“माझ्या मराठी मातीचा।
लावा ललाटास टिळा ।
हिच्यासंगे जागतील।
मायदेशातील शिळा ।।”
असे श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज म्हणतात. झाडाची मुळे जोपर्यंत मातीमध्ये घट्टपणे रूजलेली असतात, तोपर्यंत ते झाड धैर्याने उभे असते. वादळवाऱ्यालाही तोंड देते पण एकदा का त्याच्या पायातली माती ढिली झाली की झाड आपोआप कलंडते. तेव्हा त्याला कोणीही सावरू शकत नाही, मराठी भाषेच्या झाडाचे नेमके असेच झाले आहे. हे झाड ज्या मराठी मातीत रूजले ती माती गेल्या काही वर्षात धुपून निघू लागली आहे. अन्य भाषिकांचा लोंढा महाराष्ट्राच्या सामाजिक पात्राचे काठ कातरू लागला आहे. त्यामुळे मराठी माती ढिली होऊ लागली आहे. साहजिकच मुळं सुटावल्याने या मातीतले मराठी भाषेचे झाड कलंडणार नाही याची दक्षता आपण अजूनही घेऊ शकतो कारण तेच आपले आद्यकर्तव्य आहे.मराठी भाषा टिकली तरच मराठी माणूस टिकेल आणि मराठी माणूस टिकला तरच मराठी संस्कृती टिकेल हे आपण नीट लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच मराठी भाषेचे संरक्षण करणे, संगोपण करणे आणि संवर्धन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.
आज संपूर्ण ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी प्रवेश केला.या शाळेतील विद्यार्थी मातृभाषा मराठी असूनही ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे त्याना मराठी भाषा द्वितीय भाषा म्हणून शिकावी लागते ही शोकांतिका आहे. त्यांची मराठी बाबतची परिस्थिती ना घर का ना घाट का अशी होते.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
मराठी ही आपली मातृभाषा आहे. मागच्या पिढ्यांनी मराठी भाषा वापरली जिवंत ठेवली व तिचा वारसा आपल्याला दिला त्यामुळेच त्यांच्याशी आपले भावनिक नाते आहे. पुढच्या पिढ्यांनी ही भाषा वापरली तरच त्याचे आपलेही नाते टिकून राहील.पुढच्या पिढ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांचे मातृभाषेला म्हणजे मराठीला अनुक्रम देण्याबाबत तात्त्विक दृष्ट्या सर्वांचे एकमत आहे. मायबोलीचे गोडवे शिक्षणतज्ज्ञ गाताना दिसतात;पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र मराठीबाबतची मानसिकता ही उदासिनतेची आहे. त्यात बदल होणे आवश्यक आहे.मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल तर मराठी माणसाने मराठी भाषेच्या वापराविषयी आग्रही असले पाहिजे अर्थात बोलण्यासह त्याने सर्व व्यवहार मराठीतूनच केले पाहिजे.आपली स्वाक्षरी सदैव, सर्वत्र आवर्जून मराठीतच करावी.आपल्या सर्व प्रकारच्या नोंदी टिपणे मराठीतच लिहावी. आपला मराठी शब्दसंग्रह, ग्रंथसंग्रह प्रयत्नपूर्वक वाढवावा. आपल्या भाषणात वा संभाषणात अन्य भाषिक शब्द कमीत कमी वापरावे.
मराठी माणसाने आपल्या घराचे,व्यवसायाचे नाव मराठीतच लिहावे.आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांशी मराठीतच बोलावे.मराठी नियतकालिके विकत घ्यावी. महाराष्ट्र भूमीचे पर्यटन करावे. मराठी माणसाने शुभप्रसंगी आप्त मित्रांना मराठी पुस्तके भेट द्यावी. शुभेच्छा पत्रे मराठीतच पाठवावी. भ्रमणध्वनीवरून पाठवतानाही मराठीतच लिहावी. मराठी संमेलनांना उपस्थित राहावे.भाषासंगोपनाचे व संवर्धनाचे वेगवेगळे उपक्रम राबवावे.मराठी भाषासंवर्धनासाठी उपाय करून मराठी भाषा अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा.मराठी भाषेच्या संगोपनाचे, संरक्षणाचे आणि संवर्धनाचे कार्य प्रत्येक मराठी माणसाने हाती घ्यावे तेव्हाच ‘मराठी असे आमची मायबोली’ हे सार्थ ठरेल.मराठी राजभाषा दिनी असे सर्वांनी ठरवले पाहिजे.मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥ आणि कवी श्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
समाजभूषण पुरस्कार प्राप्त
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर,जि.अमरावती.
भ्र.ध्व.८०८७७४८६०९