• Mon. Jun 5th, 2023

लंपी चर्मरोग प्रतिबंधासाठी बाधित क्षेत्रातील सर्व जनावरांचे लसीकरण – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.विवेक घोडके

    * गोवर्गीय जनावरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील तीन तालुक्यातील 12 गावांमधील गोवर्गीय पशुधनामध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळल्याने या परिसरातील सर्व जनावरांचे वेगाने लसीकरण व पशुपालकांमध्ये दक्षतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गुरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले असून आंतराज्य व आंतरजिल्हा गोवर्गीय पशु वाहतूकीला प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.विवेक घोडके यांनी आज येथे दिली.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके, पशुधन विकास अधिकारी डॉ.उदय देशमुख व डॉ.रमेश राऊत यावेळी उपस्थित होते.

    डॉ.घोडके म्हणाले की, राज्यातील जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, उस्मानाबाद, सांगली, सोलापूरबरोबरच अमरावती जिल्ह्यातही गायवर्गीय पशुधनामध्ये लंपी या चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसा अहवाल पुणे येथील पशुरोग अन्वेषण विभागाच्या सहआयुक्तांकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे गोवर्गीय जनावरांची आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा वाहतूकही प्रतिबंधित करण्यात आली आहे. बाधित झालेले सर्व क्षेत्र नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला आहे. गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

    गोजातीय प्रजातीची गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हास्तरीय कार्यदल स्थापित करण्यात आले असून त्यांनी तात्काळ रोग प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रास भेट देऊन आवश्यक कार्यवाही होत असल्याची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 14 शीघ्र कृती दले स्थापन करण्यात आली आहेत, अशी मा‍हिती त्यांनी दिली.

    * बाधित क्षेत्रातील 25 हजार गुरांचे लसीकरण

    पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.कावरे म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेत या आजाराची सुरुवात झाली. भारतात ओरिसात 2013 मध्ये सर्वप्रथम आजाराची लागण झाल्याचे आढळले. महाराष्ट्रात 2019-20 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात प्रादुर्भाव आढळला. यंदा महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील पशुधनात दि.4 ऑगस्ट रोजी या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले.

    जिल्ह्यात सर्वप्रथम धारणी तालुक्यातील झिल्पी व पडिदाम येथील जनावरांमध्ये दि. 31 ऑगस्ट रोजी जनावरांमध्ये या रोगाची बाधा आढळून आली. तेथील 20 जनावरांना लागण झाल्याचे आढळले. अद्यापपर्यंत झिल्पी, पडिदामसह धारणी तालुक्यातील सावलखेड, सोनबर्डी, बाबंदा, धाराकोट, धूळघाट रोड, हिराबंबई या आठ गावांसह चिखलदरा तालुक्यातील अंबापाटी व पिपादरी, तसेच अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी व वडगाव फत्तेपूर अश्या तीन तालुक्यातील बारा गावांमधील पशुधनात या आजाराची लागण झाल्याचे आढळले आहे. आतापर्यंत 314 जनावरांना लागण झाल्याचे आढळले.

      मेळघाटात हा आजार देवीचा आजार असल्याची समजूत असल्याने योग्य उपचार तत्काळ मिळू न शकल्याने तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात दलांतर्फे वेगाने लसीकरण व पशुपालकांपर्यंत पोहोचून समुपदेशन व जनजागृती करण्यात येत आहे. या गावांमधील 5 कि.मी. अंतरातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. या परिसरात सुमारे 25 हजार जनावरे असून त्यांचे लसीकरण करण्यासाठी ‘गोट फॉक्स’ लसीच्या 30 हजार मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. आतापर्यंत 6 हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे, असे त्यांनी सांगितले. बाधित जनावरांचे विलगीकरण करण्याच्या सूचना पशुपालकांना देण्यात येत आहेत. सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत, पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये औषधसाठा उपलब्ध असून कुठेही बाधा झाल्याचे आढळल्यास दवाखान्यात तसेच पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र. 18002330418 किंवा मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेच्या 1962 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ.कावरे यांनी केले.

      * डास व गोचीडापासून प्रसार

      प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये अधिसूचित केलेल्या रोगांमध्ये लम्पी चर्मरोग (LSD-LumpySkin Disease) या रोगाचा अनुसूचित रोग जाहीर करण्यात आला आहे. लंपी चर्मरोगाचा फैलाव बाह्य कीटकांद्वारे मच्छर, गोचीड, गोमाशी याद्वारे आजारी पशुंच्या त्वचेवरील व्रणामधून वाहणारा स्त्राव, नाकातील स्त्राव, दूध, लाळ, वीर्य यातून होत असल्याने पशुपालकांनी मच्छर, गोचीड व गोमाशा याचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. हा झोनॅटिक डिसिज नाही. पशूपासून मानवाला होणारा आजार नाही, असेही डॉ.सोळंके यांनी सांगितले.

    ● हे वाचा -देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!

      * लक्षणे

      या आजारात पशुंना ताप येणे, पूर्ण शरीरावर 10-15 मि.मी. व्यासाच्या कडक गाठी येणे, तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होणे, चारा चघळण्यास त्रास होणे, अशक्तपणा, भूक कमी होणे, खाणे बंद होणे, वजन कमी होणे, दूध उत्पादन कमी होणे, डोळ्यातील व्रणामुळे दृष्टी बाधित होणे, काही वेळा फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह, पायावर सूज येऊन लंगडणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात होणे अशी लक्षणे दिसून येतात, उपचार केल्याने या रोगाने बाधित जनावरे दोन-तीन आठवड्यामध्ये बरी होतात, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

      * पशुपालकांनी घ्यावयाची काळजी

      चारा कमी खाणाऱ्या जनावराचा ताप मोजून दवाखान्यात उपचार द्यावेत. बाधित जनावरे वेगळी ठेवावीत. डास, माश्या, गोचिड, किटक यांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषध फवारणी करून बंदोबस्त करावा. आजारी जनावरांवर विषारी औषध फवारु नये. त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जंतू पडू नये म्हणून औषधी मलम लावावा. लसीकरण करुन घ्यावे. जनावरात या रोगाची लक्षणे आढळल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी माहिती जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेला लेखी कळविणे बंधनकारक आहे, असे डॉ.राऊत यांनी सांगितले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *