• Sun. Jun 11th, 2023

अराजकाच्या सावल्या आणि झोपलेल्या मुंग्या..!

    अराजकाच्या सावल्या हळू हळू स्पष्ट होत आहेत. गडद होत आहेत. मोठ्या होत आहेत. हिंसक होत आहेत. सापांच्या कळपाने मुंग्यांची सारी वारुळं घेरून टाकलेली आहेत. सारे साप सहकुटुंब, सहपरिवार मोहिमेवर लागलेले आहेत. पुढची पन्नास वर्षे त्यांचीच सत्ता असणार या मस्तीत ते आहेत. पुढच्या छप्पन पिढ्यांची सोय व्हावी, अशी व्यवस्था आधीच करण्यात आलेली अहे. सरकारी पैशातून अनेक ’उंदीर फार्म’ सापांच्या सोयीसाठी त्यांच्या नावाने करून दिले गेले आहेत. नवे ’उंदीर फार्म’ वाटणे सुरूच आहे. अनेकांच्या नावाचे सात – बारा तयार झालेले आहेत.

    पण केवळ उंदीर खाऊन लाईफ एन्जॉय करणे एवढेच सापांना नको आहे. त्यात मनासारखी झिंग नाही. मनासारखी नशा नाही. खरं तर सापांना त्यांच्या राज्यात मुंग्यांचे अस्तित्वच नको आहे! त्यासाठी त्यांनी काही मूर्ख मुंगळ्यांना हाताशी धरले आहे. त्यांच्या पोटापाण्याची कायम सोय केली आहे. असे मुंगळे सापांच्या आरत्या गाण्यात व्यस्त आहेत. आणि ज्यांच्या हातात लोकशाही वाचविण्याची सूत्र आहेत, त्यातील बहुसंख्य मुंग्या मात्र बिनधास्त घोरत पडल्या आहेत.

    एकूण चित्र विदारक आहे. परिस्थिती भयानक आहे. खरी लढाई सापांच्या विरुद्ध तर आहेच, पण ती दलाल ’मुंग्या विरुद्ध कष्टकरी मुंग्या किंवा प्रामाणिक मुंग्या’ अशीही आहे. सापाविरुद्ध लढायच्या लढाईपेक्षा ’दलाल मुंग्या’च्या विरुद्ध लढावी लागणारी लढाई कठिण आहे. आत घुसलेले सजातीय दलाल ओळखणे कठीण आहे.

    समजा, प्रत्यक्ष लढाई सुरू झाली तर मुंग्याच मुंग्यांना मारतील. इकडच्या मुंग्या मरोत की तिकडच्या मुंग्या मरोत, सापांना तेच हवे आहे. दोन्ही परिस्थितीत त्यांची दिवाळीच होणार आहे. जेवढ्या जास्त मुंग्या मारल्या जातील, तेवढी जास्त वारुळं आयतीच सापांच्या मालकीची होतील, हा साधा सरळ हिशेब आहे.

    मुंग्यांच्या संपूर्ण अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला असताना आपले खरे शत्रू कोण, याची ओळख मुंग्यांना होणे गरजेचे आहे. त्यासाठी दलाल मुंग्या, मूर्ख मुंग्या, अंधभक्त मुंग्या, बुद्धिजीवी मुंग्या, मुर्दाड मुंग्या आणि शहाण्या मुंग्या अशी त्यांची विभागणी आपल्याला साधारणपणे करता येईल.

    १) दलाल मुंग्या – ह्या स्वार्थी असतात. नीच असतात. हलकट असतात. निर्लज्ज असतात. बेवकूफ देखील असतात. स्वार्थाने आंधळ्या झालेल्या असतात. वेळप्रसंगी त्या स्वतःच्या कुटुंबाचा बळी द्यायला देखिल मागेपुढे पहात नाहीत.

    २) मूर्ख मुंग्या – ह्या मुळातच मूर्ख असतात. अकलेशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नसतो. यांचा मेंदू नेहमीच रिकामा असतो. गॅस नसलेले सिलेंडर गॅस भरल्यावर कामात येते. पण यांच्या मेंदूत बाहेरून काही भरण्यासाठी तशी व्यवस्थाच केलेली नसते. डोके वापरणे हा त्यांचा स्वभाव नसतो. सर्वात आधी ह्याच मुंग्या सापांच्या जाळ्यात अडकतात. ’सापच आपले कल्याण करू शकतो’ यावर त्यांचा विश्वास असतो. ’हर हर साप, घर घर साप’ असा यांचा आवडता नारा असतो. हाच यांचा ध्यास असतो. त्यातच त्यांना पुरुषार्थ वाटतो.

    ३) अंधभक्त मुंग्या – मुंग्यांची ही जात अलिकडे पैदा झालेली दिसते. मूर्ख मुंग्यांची सारी लक्षणे या प्रजातीमधे नैसर्गिक रित्या असतातच. पण विकृती हा यांचा विशेष गुण असतो. ही प्रजाती शिखंडी पंथातील असते. स्वतः काहीही निर्माण करण्याची यांची लायकी नसते. त्यामूळे इतरांनी निर्माण केलेल्या गोष्टीवर डल्ला मारणे, हा यांचा खानदानी धंदा असतो. ह्यांच्यात मानसिक रूग्ण भरपूर असतात. ही प्रजाती खुनशी असते. पण तेवढीच मुर्दाड देखिल असते. भडवेगिरी हा यांचा जगण्याचा मुख्य आधार असतो.

    ४) बुद्धिजीवी मुंग्या – ह्या मुंग्या तशा विचार वगैरे करतात. कुणी कविता लिहितात, कथा – कादंबऱ्या लिहितात, वैचारिक लेख लिहितात, साहित्य संमेलने घेतात, त्यात सहभागी होतात. सामजिक संस्था काढतात. साहित्य संघ काढतात. सरकारी अनुदान लाटतात. आयोजकांच्या किंवा सरकारी खर्चाने दारू ढोसतात, मटण खातात, चिकन खातात. आणि मग.. रात्री बेरात्री काही प्रसिद्ध मुंगळे निवडक मुंग्यांना ’व्हॉट्स अप’ वगैरे करतात. अर्थात ह्या राष्ट्रीय कामासाठीच त्यांना वेळ अपुरा पडत असल्यामुळे आंदोलन, संघर्ष याच्याशी त्यांचे काही देणेघेणे नसते. ’आम्हाला राजकरण आवडत नाही. राजकारण हा बदमाश लोकांचा धंदा आहे’ हा त्यांचा आवडता सिद्धांत असतो. त्या आडून त्यांना आपला नेभळट पणा सहज झाकून नेता येतो. तात्विक मुलामा चढवता येतो. यातल्याच काही मुंग्या आपण क्रांतिकारी असल्याचा, विद्रोही असल्याचा देखावा वगैरे करतात. थातुर मातुर तशी एखादी कविता वगैरे लिहितात. पण अंधारात सापांशी ’गुलुगुलू’ करणे हा त्यांचा आवडता छंद असतो. सापांना चोळण्यासाठी लोण्याचा डबा सदैव यांच्या सोबत असतो. त्यातूनच मग सापांच्या हातून पुरस्कार वगैरे मिळण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होतो. अनेकांना छाट छूट पुरस्कार मिळाले तरी धन्य धन्य वाटते!

    ५) मुर्दाड मुंग्या – ’काम के ना काज के, दुश्मन अनाज के!’ या प्रकारात मोडणाऱ्या ह्या मुंग्या असतात. त्यांना कितीही समजावून सांगा, काहीही बोला, तरी ह्या ढिम्मच असतात. यांचा मुर्दाडपणा पाहून आपल्यालाच संताप येतो, पण त्यांना मात्र काहीही फरक पडत नाही. मूर्तिमंत कोडगेपणा हा यांचा विषेश गुण असतो. आपल्या दुर्गतीला केवळ साप जबाबदार आहेत, हा त्यांचा आवडता सिद्धांत असतो. आपल्या अपयशाचे खापर इतरांच्या माथी मारून स्वतः नामानिराळे राहणे, यालाच हुशारी समजतात. स्वतः काहीही न करता इतरांच्या नावाने खडे फोडणे हा यांचा आवडीचा छंद असतो.

    ६) शहाण्या मुंग्या – काही मुंग्या शहाण्या असतात. प्रामाणिक असतात. इतरांचे नीट ऐकून घेतात. चर्चा करतात. आपले मत नम्रपणे मांडतात. आपले काही चुकले तर त्यात बदल करण्यासाठी त्या सदैव तयार असतात. सदैव कामात असतात. सामजिक भान जपतात. जगात सारे गुण्या गोविंदाने राहावेत, अशी त्यांची स्वच्छ भावना असते. त्यासाठी आपापल्या परीने जमेल तसे काम करत असतात. इतरांच्या आनंदात सुखी आणि दुखामध्ये दुःखी होण्याची त्यांची वृत्ती असते. त्यामूळे त्या अन्यायाविरुद्ध नेहमीच बंड करून उठतात. पण अलिकडे अशा मुंग्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. हल्लीचा काळ अशा मुंग्यासाठी सर्वात मोठा कसोटीचा काळ आहे. सापांच्या नजरेत त्या सारख्या खुपत असतात. कुठल्याही क्षणी त्यांच्यावर सामुहिक कत्तलीची वेळ येऊ शकते. पण तरीही त्या आपल्या तत्वावर ठाम असतात. त्या मरायला घाबरत नाहीत. त्या नेहमी सत्याच्या बाजूने उभ्या असतात. त्यासाठी हवी ती किंमत मोजायला त्या नेहमीच तयार असतात. अशा मुंग्या असतात, म्हणूनच समाज चालत असतो. अर्थात अशा मुंग्यांनी संख्या नेहमीच कमी असते.

    अर्थात्, साप आणि मुंग्यांची लढाई सुरू झाली आहे. अंतिम टप्प्यावर आली आहे. आपण सापांना सामील व्हायचे, गंमत बघत उभे राहायचे की न्यायाच्या बाजूने लढणाऱ्या मुंग्यांना बळ द्यायचे, हे आपले आपण ठरवायचे आहे!

    तूर्तास एवढेच..
    -ज्ञानेश वाकुडकर
    अध्यक्ष
    लोकजागर
    9822278988
    (दैनिक देशोन्नती | ०५. ०६. २०२२ | साभार)
    •••
    • ‘लोकजागर’ मिशन समजून घेण्यासाठी ‘समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत’ हे पुस्तक वाचा. इतरांना भेट द्या.
    • पुस्तकांसाठी संपर्क – 9503144234 (पता आणि पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट व्हॉट्स ॲप करण्यासाठी)
    • फोन पे साठी – 9822278988
    • किंमत – २८० + ३० पोस्टेज = ३१० मध्ये घरपोच
    •••
    टीप – माझा सोशल मिडीयावरील कोणताही लेख/कविता/साहित्य सामाजिक हेतूनं (व्यावसायिक उपयोग वगळून) अर्थातच.. माझ्या नावाने.. सोशल मीडिया किंवा अन्यत्र प्रकाशित करण्यासाठी, शेअर करण्यासाठी खुली परवानगी आहे. वेगळ्या परवानगीची गरज नाही.
    •••
    संपर्क –
    लोकजागर अभियान
    • 8446000461 • 8275570835 • 8605166191• 9422154759 • 9773436385 • 8806385704 • 9960014116

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *